नलिनी प्रताप कानविंदे स्मृती पारंपरिक आरती गायन स्पर्धा

रत्नागिरी : लवकरच सुरू होणार असलेल्या गणेशोत्सवानिमित्ताने येथील आर्ट सर्कलतर्फे नलिनी प्रताप कानविंदे स्मृती पारंपरिक आरती गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात दणक्यात म्हटल्या जाणाऱ्या आरत्या हा घराघरातला, वाडीवाडीतला, गावागावातला जिव्हाळ्याचा विषय असतो. बहुतांश ठिकाणी एका ठरावीक चालीतच आरत्या म्हटल्या जातात. पण काही घरे, काही वाड्या, काही गावे वेगळ्या आरत्या म्हणतात किंवा प्रचलित आरत्या अत्यंत पारंपरिक पद्धतीने म्हटल्या जातात. अशाच आरत्या एकत्र करण्याचा प्रयत्न म्हणून आरती गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विजेत्यांना अनुक्रमे ४ हजार, २ हजार ५०० आणि एक हजार ५०० रुपये अशी पहिली तीन पारितोषिके दिली जातील. त्याशिवाय जास्त लाइक्स असलेल्या समूहाला एक हजार रुपये दिले जातील. सर्व विजेत्यांना प्रमाणपत्रेही दिली जाणार आहेत.

स्पर्धेत आपल्या घरात, वाडीत म्हटल्या जाणाऱ्या आरत्या व्हिडीओ करून पाठवायच्या आहेत. त्यामध्ये वाद्यांचा आवाज मर्यादित असावा, जेणेकरून शब्द आणि चालीचे सौंदर्य उठून दिसेल. एका स्पर्धक समूहाकडून जास्तीत जास्त दोन आरत्या अपेक्षित आहेत. शक्यतो आरत्या सामुदायिक स्वरूपात म्हणण्यासारख्या असाव्यात. व्हिडीओ ५ सप्टेंबर २०२२ पर्यंत 8669082727 या व्हॉट्स अॅप नंबरवर किंवा artcirclertn@gmail.com या ईमेलवर पाठवावा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply