मोफत नको, सुखकर प्रवास हवा

सत्तेवर आल्यानंतर लोकप्रिय घोषणा केलीच पाहिजे, असा राज्यकर्त्यांचा समज असतो. बऱ्याच घडामोडींनंतर महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळातील पूर्ण वेळेचे पहिले विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अशीच एक लोकप्रिय घोषणा केली. एसटीतून ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा देण्याची ही घोषणा होती. अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना असल्यामुळे त्यावर टीका होण्याची शक्यता नाही, पण अशी लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षाही इतर अनेक बाबतीत सरकारने लक्ष द्यायला हवे होते.

मुळात ७५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक एसटीतून प्रवास करण्याची शक्यता कमी असते. एवढ्या वयाच्या व्यक्तींना मोफत प्रवासापेक्षाही सध्या सुरू असलेली निम्म्या तिकिटावर प्रवासाची सुविधा देतानाच सुलभ आणि सुकर प्रवासाची अधिक गरज आहे. महानगरे, शहरे, तालुक्याची ठिकाणे आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्ता तिथे एसटी असे कोणे एकेकाळी एसटीचे ब्रीदवाक्य होते. आता रस्ता तेथे खड्डे अशी स्थिती आहे. कोकणापुरता विचार केला तरी कोकणात भरपूर पाऊस पडतो, असे कारण खड्ड्यांसाठी दिले जाते. पण पाऊस हे कोकणाचे वैशिष्ट्यच आहे. ते लक्षात घेऊनच रस्ते केले गेले पाहिजेत. पण तसे होत नाही. रत्नागिरी शहरात गेल्या जानेवारी महिन्यात दुरुस्त केलेले रस्ते सहाव्या महिन्यात म्हणजेच जूनमध्येच खड्डेमय झाले. ग्रामीण भागाला तर कोणी वालीच नसतो. त्यामुळे तेथील खड्ड्यांची चर्चाच होत नाही. अशा स्थितीत एसटीतून मोफत प्रवास करता येणार असला तरी या खड्डेमय रस्त्यांमधून त्या एसटीतून प्रवास करणे फारच त्रासदायक आणि काही वेळा जीवघेणेही आहे. कारण एसटीच्या गाड्या या खड्ड्यांमधूनही वेगाने चालविल्या जातात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकच काय, सर्वसामान्य प्रौढ आणि तरुण मुलेसुद्धा जायबंदी होण्याची शक्यता असते. सतत प्रवास करणारे नागरिक हाडाच्या डॉक्टरांकडे किती वेळा जातात, याचाही एक आढावा घ्यायला हवा.

ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीतून मोफत प्रवासाची सुविधा जाहीर करणाऱ्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या इतर समस्यांकडेही लक्ष द्यायला हवे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात ज्येष्ठ नागरिकांची समस्या अधिक गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणी भेडसावत असतात. मरण येत नाही, म्हणून जगणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. करोनाच्या काळात अशा ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या संस्था आणि संघटनांच्या स्वयंसेवकांनी व्यक्तिगत मदत पोहोचविली होती. पण करोना संपल्यानंतर ही मदतही थांबली आहे. अनेक घरांमध्ये ज्येष्ठ पतीपत्नी दोघेच असतात. काही ठिकाणी एकट्यालाच घरात राहण्याची वेळ आली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले आहेत, ती नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने तसेच कौटुंबिक कारणामुळे इतरत्र राहतात. काहीवेळा ती त्याच शहरात राहतात किंवा मुंबई-पुण्याला असतात. अनेकांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत. त्यापैकी काही जण आपल्या पालकांकडे लक्ष देत असतात, पण खूप ज्येष्ठ नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांना अपत्य नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांची तर पार दैनाच उडालेली असते. औषधोपचार तर दूरच, पण जेवणखाण, वैयक्तिक स्वच्छता, आंघोळ, झोपणे-उठणे स्वच्छतागृहात जाणे अशा सर्वच बाबतीत त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते. पण ती त्यांना उपलब्ध होत नाही. अशा ज्येष्ठांच्या आयुष्याचा राहिलेला प्रवास सुखकर नसला तरी सुकर होण्याच्या दृष्टीने एखादी योजना राज्य शासनाने जाहीर करायला हवी. मोफत एसटी प्रवासापेक्षा त्याची अधिक आवश्यकता आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १९ ऑगस्ट २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply