कोकणात सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हजारो चाकरमानी गावी येऊन भक्तिभावानं हा उत्सव साजरा करतात. या उत्सवात अनेक प्रथा श्रद्धेनं आणि परंपरागत पाळल्या जातात. अशांपैकीच एक म्हणजे कोंडगाव-साखरपा (ता. संगमेश्वर) गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा. या परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव-साखरपा परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे, गद्रे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत. त्यांपैकी अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे ही घराणी थेट विशाळगडावरून आली आहेत. पेशवाईच्या काळात विशाळगडावर ही घराणी अधिकारी पदावर होती. त्यापैकी अभ्यंकर घोड्यांची पागा सांभाळत होते, केतकर यांच्या घराण्यात सुभेदारी होती, तर केळकर हे दिवाण होते. आजही या घराण्यांचा उल्लेख पागे अभ्यंकर, सुभेदार केतकर, दिवाण केळकर असा होतो. सरदेशपांडे यांचे घराणे विशाळगड परिसरात महसुली प्रमुख होते. त्यांच्या घराण्यात पूर्वापार खोतकी चालत आली होती. रेमणे घराणे विशाळगडावर आणि परिसरातील बारा गावांत ग्रामोपाध्येपण करत असे. विशाळगडावर अधिकारी पदे सांभाळत असताना या घराण्यांना गडाखाली कोंडगाव-साखरपा परिसरात जिमनी इनाम म्हणून मिळाल्या होत्या.
पेशव्यांच्या अस्ताबरोबर मराठेशाहीचा अस्त झाला. त्याच सुमारास देशात इंग्रजांनी सत्ताविस्तार केला आणि गडांवर राहणार्या या घराण्यांचे अधिकार अस्ताला गेले. उदरनिर्वाहासाठी ही कुटुंबे त्यांना मिळालेल्या जमिनी कसण्यासाठी म्हणून गडउतार झाली आणि कोंडगाव-साखरपा येथे येऊन स्थायिक झाली. गडावरून येताना ते घोड्यावरून आले म्हणून घराण्यातील गणेशमूर्ती घोड्यावरून आणण्याची प्रथा सुरू झाली. आजही ही प्रथा या घराण्यांमध्ये सांभाळली जात आहे. त्यांच्याखेरीज जोगळेकर, नवाथे, रेमणे, पोंक्षे, पुरोहित यांच्या घराण्यांच्याही गणेशमूर्ती पूर्वापार अश्वारूढ आहेत.
गणेशोत्सवासाठी या घराण्यांमधे पूर्वी लाकडी घोडे तयार केले होते. हे घोडे मूर्तिकारांकडे पाठवले जात असत. मूर्तिकार थेट त्या घोड्यांवरच गणेशमूर्ती तयार करत असत. घोडे तयार करताना त्याच्या पाठीवर लोखंडी सळी घालण्यात आली आहे. त्या सळीच्या आधाराने मूर्तिकार गणेशमूर्ती साकारतात. त्यानंतर काळाच्या ओघात काही घराण्यांमधील हे घोडे जुने होऊन नष्ट झाले. लाकडी घोड्यावरून गणपती आणणे आणि विसर्जन करणे अवघड जात असल्यामुळे काही घरात लाकडी अश्व असतानाही त्यांनी अश्वासह गणेशमूर्ती मातीतून साकारण्यास सुरुवात केली.
सरदेशपांडे यांच्या घरी आजही लाकडी घोडा अस्तित्वात असून त्यांची गणेशमूर्ती त्यावरूनच आणली जाते. साखरपा गावाला लागून असलेल्या भडकंबा गावात जामसंडेकर यांची गणेशमूर्तीशाळा आहे. तेथे सरदेशपांडे यांची मूर्ती गेल्या सत्तर वर्षांपासून अधिक काळ साकारली जाते. सरदेशपांडे यांचा अश्व दर वर्षी नागपंचमीला मूर्तिशाळेत नेऊन देण्याची प्रथा आहे. त्या काळी सरदेशपांडे यांच्या घरातील शिपायांना विसर्जनाचा मान दिला जात असे. सामान्यत: गणपतीची स्थापना घरात दर्शनी भागात होते. पण सरदेशपांडे यांचा अश्वारूढ गणेश मात्र घरातल्या मूळ देवघरात स्थापन केला जातो. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गणपतीला कधीही कृत्रिम सजावट केली जात नाही. त्यासाठी कायमस्वरूपी लाकडी मंडप आणि देव्हारा तयार करण्यात आला आहे. त्यातच मूर्तीची प्रतिष्ठापना होते.
कोंडगाव येथील जोगळेकर कुटुंबीयांचा लाकडी अश्व सुमारे १०० वर्षांचा आहे. गावातील सुतारकाम करणारे विश्राम ऊर्फ बाबू पांचाळ यांनी हा अश्व तयार केला आहे. आजही हा अश्व सुस्थितीत आहे. हाही अश्व नागपंचमीलाच मूर्तिकारांकडे नेऊन दिला जातो. तृतीयेच्या दिवशी सायंकाळी अश्वारूढ गणेशाचे आगमन होते. या घराण्यातील आरत्यांचे खास वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणपणे घराघरातून आरत्या उभ्याने केल्या जातात. पण जोगळेकर यांच्या गणपतीची आरती बैठकीवर बसून होते. पूर्वी त्यासाठी पाट वापरले जात असत, पण आता बैठका घालून त्यावर बसून लोक आरत्या म्हणतात. विभक्त कुटुंब पद्धतीत जोगळेकर कुटुंबाची आता तीन घरे झाली आहेत. त्यापैकी कांचन जोगळेकर यांच्या घरी लाकडी अश्व ठेवण्याची प्रथा आहे. तेच हा अश्व मूर्तिकाराकडे पोचवतात. त्यानंतर अश्वारूढ गणेशाचे आगमन त्यांच्या बाजूला असलेल्या मकरंद जोगळेकर यांच्या घरात होते. जोगळेकर कुटुंबाचे ते मूळ घर. गणेश विसर्जनानंतर लाकडी अश्व पुन्हा कांचन जोगळेकर यांच्या घरात ठेवला जातो.
अभ्यंकर (पागे) यांच्या घराण्यातील पूर्वापार लाकडी अश्व आजही आहे. हा अश्व शंभर वर्षांपासूनचा जुना आहे. हा अश्वही नागपंचमीलाच मूर्तिकाराकडे दिला जातो.
साखरप्यात राहणारे रेमणे घराणे हेही मूळचे विशाळगडावरचे. पेशवे काळात या घराण्याला गड घेर्यातील पंधरा गावांचे पौरोहित्य करण्याचा मान मिळाला. या घराण्याचे वंशज विशाळगडावरून उतरले आणि लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावात स्थायिक झाले आणि कालांतराने साखरप्यात आले. आजही प्रभानवल्लीनजीकच्या शिपोशी या गावाच्या नकाशावर रेमण कोंड नावाचे ठिकाण दिसते. ते ठिकाण त्यांना इनाम मिळाले होते. रेमणे घराण्याचा गणेशही अश्वारूढ. शंभरएक वर्षांपूर्वी त्यांचा हा अश्व लाकडापासून तयार करण्यात आला. आजही तो सुस्थितीत आहे. पण आता त्यावरून गणेशमूर्ती आणणे, विसर्जनासाठी नेणे काहीसे कठीण होऊ लागल्यामुळे तो अश्व न वापरता गणपतीबरोबरच अश्वही मातीचाच साकारण्यात येतो. गेल्या सहा-सात वर्षांपासून हा बदल करण्यात आला आहे.
साखरप्यातील अश्वारूढ गणेशमूर्ती आणणारे आणखी एक घराणे म्हणजे नवाथे घराणे. त्यांच्याही घराण्याची तीन घरे साखरप्यात आहेत. पण त्यांचा गणपती मात्र एकच आहे. मूळ घरात हा गणपती प्रतिष्ठापित केला जातो. या घराण्याच्या गणेशाचे वेगळेपण म्हणजे पूर्वी या घराण्याचा गणेश बैठा होता. नंतर कधीतरी तो अश्वारूढ रूपात आणण्यास सुरुवात झाली. गेली दीडशे वर्षे ही परंपरा सुरू आहे. या घराण्याचे वंशज जयराम गोविंद नवाथे यांनी तेव्हा लाकडी अश्व करून घेतला. कोंडगाव येथील सुतारकाम करणारे रत्नोबा पांचाळ यांनी हा अश्व करून दिला. या अश्वावरून गणपती आणला जात असे. पण रेमणे घराण्याप्रमाणेच नवाथे यांनीही पाच-सहा वर्षांपासून या अश्वाऐवजी मातीचा अश्व असलेली गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात केली. नवाथे यांच्या यंदाच्या गणेमूर्तीची खासियत म्हणजे यंदा या मूर्तीच्या गळ्यात पांढर्या दुर्वांचा हार घालण्यात आला आहे.
रेमणे आणि नवाथे यांचे अश्व शंभर वर्षांपूर्वीचे जुने असले तरी आजही सुस्थितीत आहेत. अभ्यंकर आणि पोंक्षे यांचे लाकडी अश्वावरचे गणेश लक्ष्मण ऊर्फ काका पांचाळ यांच्या मूर्तिशाळेत पूर्वांपार तयार केले जातात. सरदेशपांडे, नवाथे, रेमणे यांचे अश्वारूढ गणेश हे भडकंबा गावातल्या जामसंडेकर मूर्तिशाळेत पूर्वांपार साकारले जातात. याच मूर्तिशाळेत पूर्वी त्यांच्या लाकडी अश्वावर मूर्ती साकारली जायची आणि आता इथेच मातीच्या अश्वासह गणेशमूर्ती तयार केली जाते. या मूर्तिशाळेचे मूर्तिकार संतोष ऊर्फ बाळू जामसंडेकर या मूर्ती साकारतात. लाकडी तयार घोड्यावर गणेशमूर्ती तयार करणे खूप कठीण असल्याचे जामसंडेकर सांगतात. अशी मूर्ती तयार करताना मूर्तीचा तोल सांभाळणे सर्वांत कठीण काम असते.
(या लेखासाठी तसेच छायाचित्रांसाठी चैतन्य सरदेशपांडे यांचे साह्य लाभले.)
- अमित पंडित,
कनकाडी, ता. संगमेश्वर
ameet293@gmail.com
(संपर्क : 9527108522) - (पूर्वप्रसिद्धी : साप्ताहिक कोकण मीडिया, २ सप्टेंबर २०२२)






