विघ्नहर्ता आला, रस्त्यांचे विघ्न कायम!

कोकणवासीयांचा लाडका गणेशोत्सव सुरू झाला आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर येणारा यावर्षीचा पहिलाच उत्सव असल्यामुळे चाकरमान्यांच्या उत्साहाला भरते आले आहे. त्यामुळे यावर्षी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. कोकण रेल्वेने ३०० पेक्षा अधिक जादा गाड्या सोडून किंवा असलेल्या गाड्यांना जादा डबे जोडून चाकरमान्यांची सोय करण्याचा प्रयत्न केला, पण एकेरी मार्गामुळे कोकण रेल्वेच्या गाड्या वाढवायला मर्यादा आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणावर मुंबई-गोवा महामार्गावरून एसटी, खासगी वाहने किंवा स्वतःच्या मोटारींनी चाकरमानी गावाला आले आहेत. त्याच मार्गाने ते उत्सव संपल्यानंतर परत जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण अनेक कारणांनी रखडले. त्यामुळे ज्या अवस्थेत आता महामार्ग आहे, त्यावर चांगल्या रस्त्यापेक्षा खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. हे खड्डे बुजवावेत, म्हणून राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणाचा धावता दौरा केला. सूचना दिल्या, पण या सूचनांची अंमलबजावणी होण्याची शक्यता नसल्याचे मंत्रिमहोदयांनाही चांगलेच माहीत होते. तरीही उत्सवासाठी म्हणून आपण काहीतरी करत आहोत, करणार आहोत, हे दाखविण्यासाठी त्यांनी तातडीने दौरा केला. रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश दिले.

महामार्गावरील या खड्ड्यांचे सोडा, कारण महामार्ग एक येत्या एक-दोन वर्षांत पूर्ण होईल. त्यानंतर रस्त्यावरचे खड्डे बुजतील. चांगले रस्ते तयार होतील. आता ठिकठिकाणी वळण रस्ते असल्यामुळे जुन्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. नाही तरी त्या रस्त्यांचे नूतनीकरण करायचे असल्यामुळे दुरुस्ती कशासाठी करायची, असा विचार ठेकेदारांनी केला असेल, तर तो तितकासा चुकीचा आहे, म्हणता येणार नाही. कारण जो रस्ता पुन्हा पूर्णपणे तयार करायचा आहे, त्या रस्त्याच्या दुरुस्तीवर करावयाचा खर्च हा अतिरिक्त खर्च असणार आहे. तो त्यांच्या बांधकामाच्या कंत्राटात नसेल. या साऱ्यावर मात करून महामार्ग एक-दोन वर्षांत पूर्ण होईल. पण अंतर्गत रस्तेही नादुरुस्त आहेत. याच खड्डेमुळे रस्त्यामधून चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी यावे लागले आहे. आणि तेच खड्डे तुडवत पुन्हा ते मुंबईला परतणार आहेत. या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काय, हा प्रश्न कायम आहे. गणेशोत्सवाची धामधूम संपली की या रस्त्यांकडे आणि अर्थातच त्यातील खड्ड्यांकडे कोणीही लक्ष देणार नाही.

हे नादुरुस्त रस्ते नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यातील आहेत किंवा राज्य शासनाचे आहेत. ते रस्ते खड्डेमय झाले आहेत. महामार्गावरून मोजक्या तासात मुंबईतून कोकण गाठणे शक्य असले, तरी महामार्गाच्या आतील भागात असलेल्या या नादुरुस्त रस्त्यांवरून मुंबईतून यावयाच्या प्रवासापेक्षा कितीतरी अधिक तास प्रवास करावा लागतो. ज्या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी कोणतेही आश्वासन दिले नसते, कोणतेही आदेश दिले नसते, तरी फार फरक पडला नसता. पण अंतर्गत रस्त्यांचे काय, हा प्रश्न राहतो. त्याबाबतचे कोणतेही आश्वासन देण्याची तसदी मंत्र्यांनी घेतलेली नाही. कारण ते रस्ते दुरुस्त होण्याची शक्यता नाही. लोक कंटाळतात आणि तक्रार करायचे थांबतात. नंतर त्यांनाही त्याची सवय होते आणि लोकांच्या अल्पस्मृतीचीच ही सवय शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांना माहीत असते. अनेक वर्षे हे असेच सुरू आहे. यापुढेही तसेच चालणार आहे. विघ्नहर्ता आला. त्याच्यासोबत सण साजरा करून गणपती गावाला जाईल, चाकरमानी मुंबईला परततील. रस्त्यांमधील खड्ड्यांचे विघ्न कायम राहणार आहे.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, २ सप्टेंबर २०२२)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply