
दापोली : येथे येत्या ६ नोव्हेंबर रोजी विंटर सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यातील सोडतीत १ लाखाची बक्षिसे, २ सायकल आणि खूप काही जिंकण्याची संधीही सायकलपटूंना मिळणार आहे.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी आणि सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी दापोली विंटर सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. ही सायकल स्पर्धा दापोलीतील आझाद मैदानातून सकाळी साडेसहा वाजता सुरू होईल.
ही स्पर्धा सिटी शॉर्ट रूट आणि कोस्टल सिनिक रूट अशी २ मार्गांवर असून यासाठी प्रवेश शुल्क ३०० आणि ४०० रुपये आहे. सिटी शॉर्ट रूट आझाद मैदान- केळसकर नाका- नर्सरी रोड- नवभारत छात्रालय- पांगारवाडी जालगाव – लालबाग – उदयनगर – आझाद मैदान असा ५ किमीचा आहे. त्यामध्ये फेऱ्या मारून ५ ते ७५ किमी अंतर पूर्ण करता येणार आहे. कोस्टल सिनिक रूट आझाद मैदान, उंबर्ले- ओळगाव- बुरोंडी- लाडघर- कर्दे- मुरूड- सालदुरे- पाळंदे- हर्णै- पाजपंढरी- आसूद- दापोली असा ७५ आणि ५० किमीचा असेल. हे अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धकांमधून सोडतीने बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यासाठी २ सायकल, हेल्मेट अशी १ लाखाची बक्षिसे वाटण्यात येणार आहेत. सायकल राइड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, एनर्जी स्नॅक्स, अॅम्ब्युलन्स मेडिकल मदत असेल.
या स्पर्धेत पुणे, मुंबई, सातारा अशा अनेक ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले आहेत. तसेच दापोलीतील अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, पोलीस इत्यादी तंदुरुस्त आरोग्य व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, सायकल चालवत सहभागी होणार आहेत.
स्पर्धेची नोंदणी ऑनलाइन आणि ऑफलाइन करता येईल. ऑफलाइन नोंदणी अर्ज समर्थ कुशन एजन्सी, अर्बन कॉलेजजवळ, सुनील ऑटोमोबाइल, विनी इलेक्ट्रिकल, फॅमिली माळ, श्री सायकल शॉप या ठिकाणी सादर करता येतील. अधिक माहितीसाठी अंबरीश गुरव (८६५५८७४४८६), पराग केळसकर (९४२२४३३२९१) यांच्याशी संपर्क साधावा. यासाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असेल असे आयोजकांनी सांगितले आहे.
स्पर्धेची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी लिंक –
https://www.townscript.com/e/dapoli-winter-cyclothon-2022
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
