चिपळूण : जनशिक्षण संस्थान आणि उमा सोशल वेल्फेअर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणमधील कारेकर सभागृहात जीवन समृद्धी शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
जन शिक्षण संस्थान योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात कौशल्याधारित प्रशिक्षणे सुरू झाली आहेत. याच प्रक्रियेचा भाग म्हणून प्रशिक्षणार्थींच्या व्यक्तिमत्त्व आणि ध्येय-उद्दिष्टांना एक दिशा देण्यासाठी जीवन समृद्धी शिक्षण सत्राचे आयोजन चिपळूणमध्ये करण्यात आले होते. कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करताना सगळ्यांना सॉफ्ट स्किल्सची आवश्यकता असते. हाच विचार करून या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जनशिक्षण संस्थानच्या संचालिका सीमा यादव, कार्यक्रम अधिकारी निधी सावंत, उमा सोशल वेल्फेअर इन्स्टिट्यूटच्या संस्थापिका उमा म्हाडदळकर, ध्येय अॅकॅडमीच्या संस्थापक पूजेश्ववरी कदम, आरपीज अॅकॅडमी संस्थापक राधेय पंडित, दिशान्तर संस्था अध्यक्ष राजेश जोष्टे उपस्थित होते.
जनशिक्षण संस्थान ही योजना भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयातर्फे राबविण्यात येत आहे. माजी मंत्री सुरेश प्रभू आणि त्यांच्या पत्नी सौ. उमा प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी होत आहे. त्याद्वारे औपचारिक शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या युवकांना तसेच महिलांना आवश्यक व्यावसायिक कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाभरात सुरू आहे. आज कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी भविष्यात कौशल्याधारित उपक्रम राबवणार आहेत. एखादा व्यवसाय ते सुरू करतील वा नोकरी करतील. पुढील स्पर्धेसाठी या प्रशिक्षणार्थींनी तयार व्हावे, यासाठी जन शिक्षण संस्थानने ही कार्यशाळा आयोजित केली होती.
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अंगी काही कौशल्यांची आवश्यकता असते. प्रश्नांवर उत्तरे शोधण्याची तयारी, समयसूचकता, समयोचित संवाद, कष्ट करण्याची तयारी, आत्मविश्वास, नवे तंत्र आणि बदलत्या बाजारपेठेतला मंत्र अशा साऱ्याची आवश्यकता असते. म्हणूनच जन शिक्षण संस्थानने आपल्या लाभार्थ्यांसाठी ही कार्यशाळा आयोजित केली. केवळ व्यावसायिक कौशल्य देऊन जनशिक्षण संस्थान थांबणार नाही, तर यातून व्यावसायिक उभे राहावे, यासाठी प्रयत्नशील राहील, असे उद्गार संचालिका सीमा यादव यांनी काढले.
व्यावसायिक मूल्य म्हणजे नेमके काय, त्याचे मूलभूत नियम अशा संदर्भाने पूजेश्वरी कदम यांनी मार्गदर्शन केले. राधेय पंडित यांनी सोशल मीडिया व्यावसायिक यशासाठी कशा पद्धतीने प्रभावी वापरता येऊ शकतो, याचे सुंदर विवेचन केले. जगात उपलब्ध होणारे ज्ञान स्मार्ट फोनमधून मिळवता येईल. त्याचा उपयोग आपण व्यवसाय वृद्धी करिता करायला हवा, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले. दिशान्तर संस्थेचे राजेश जोष्टे यांनी सांगितले की, मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमुळे आपण आपल्या समृद्ध शिक्षण पद्धतीला बाजूला सारलेच, पण महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या थ्री एचलाही (हेड, हार्ट अँड हँड) विससलो. त्यामध्ये एक एच हा कौशल्याचा पुरस्कर्ता आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा एकवार कौशल्याधारित शिक्षणाला उत्तेजन जनशिक्षण संस्थानच्या माध्यमातून मिळते आहे, हे शुभसूचक आहे.
उमा म्हाडदळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला चिपळूणमधील प्रशिक्षक सुनील डिंगणकर, ऋतुजा डिंगणकर, मृणाल सावंत, वैष्णवी भोसले, अर्पिता परब, समरीन सरगुरो, तस्लिमा मुकादम, इफ्रा झोंबरकर, करिष्मा सागवेकर, स्नेहल धांगडे आदी उपस्थित होते.




