एकाहून अधिक भाषा येणे हे भारतीयांचे वैशिष्ट्य – प्रा. अब्दुस सत्तार दळवी

वाशी (नवी मुंबई) : मराठी आणि उर्दू या माझ्या दोन्ही मातृभाषा असल्याचे मी विविध मुलाखतींतून अभिमानाने सांगतो. एकाहून अधिक भाषा येणे हे आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे. कोणतीही बोलीभाषा छोटी नसते आणि भाषा कुणाची मक्तेदारीही नसते, असे ठाम प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी उर्दू भाषा विभागप्रमुख प्रा. अब्दुस सत्तार दळवी यांनी वाशी येथे केले.

वाशी येथील गुरव ज्ञाती सभागृहात प्रा. दळवी यांच्या हस्ते तळोजा येथील साहित्यिक इकबाल शर्फ मुकादम लिखित ‘धागा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह भिकू बारस्कर, साहित्यप्रेमी सुधीर कदम, कोमसाप-खेडचे कार्यकारिणी सदस्य रौफ खतीफ, दै. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत उपस्थित होते.

मुकादम यांच्या या मराठीतील साहित्य रचनेचे कौतुक करतानाच उर्दू आणि मराठी या भाषांमधील पुस्तकांचे एकमेकांच्या भाषांमध्ये भाषांतर वाढत्या प्रमाणावर होत जावे, अशी अपेक्षा व्यक्त करून आपण ज्येष्ठ साहित्यिक विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ या कादंबरीचे, पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’चे तसेच ‘पसायदाना’चे उर्दूत भाषांतर केल्याचे समाधान वाटते, असेही प्रा. दळवी यावेळी म्हणाले.

अशा भाषांतरांतून भारतीय सभ्यता, संस्कृतीचे इतरांना दर्शन होईल, असे त्यांनी सांगितले. भावना, वेदनांना भाषेची बंधने नसतात. जाति-धर्माच्या भिंती ओलांडून त्यांचे आवाहन सर्वांनाच होत असते, असे सांगून राजेंद्र घरत यावेळी म्हणाले की साहित्य हिंदू, मुस्लिन, ख्रिश्चन वगैरे नसते. ते निव्वळ साहित्य असते. त्याची भाषा भले वेगवेगळी असेल. मात्र रसिक वाचकांनी चांगल्या साहित्याला दाद द्यायला हवी. ते उत्तम झाले आहे हे त्या त्या साहित्यिकाला आवर्जून कळवायला हवे. ‘धागा’ या पुस्तकातील भाषा ओघवती, प्रवाही, संवादी असल्याचे मत त्यांनी मांडले.

आपल्या गावी, रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्‍यातील कोळथरे येथे काही सुविधांचा अभाव असल्याचा उल्लेख करून लेखक श्री. मुकादम म्हणाले की, करोना काळात आपण अनेक माणसे गमावली. अनेकांना उपचार घेऊन आर्थिक दुरवस्थेचा सामना करावा लागला. याचा अनुभव दाहक आहे.

भिकू बारस्कर, सुधीर कदम, रौफ खतीफ यांनीही आपल्या भाषणांतून मुकादम यांच्या कवितासंग्रहास शुभेच्छा देऊन त्यांची अनेक पुस्तके येवोत, असे विचार मांडले. धागा पुस्तकातील कवितानुरूप विविध वेधक रेखाचित्रे काढणाऱ्या गणेश म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी सूत्रसंचालन केले, तर इकबाल मुकादम यांची कन्या निशात मुकादम हिने आभार मानले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply