रत्नागिरीतील सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

रत्नागिरी : येथील आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन, पुण्यातील किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजिकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या संस्थांच्या विद्यमाने पहिल्या सागर महोत्सवाचे उद्घाटन आज येथे झाले. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनील कुमार सिंह यांनी उद्घाटन केले.

यावेळी डॉ. सिंह म्हणाले की, महासागरांनी जगाचा ७० टक्के भाग व्यापला आहे आणि महासागर आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. सुमारे ९५ टक्के खोल महासागर असे आहेत की त्यांचा आतापर्यंत शोध लागला नाही. लोह, मॅंगेनीज, निकेल आणि कोबाल्ट अशी खनिजद्रव्ये समुद्रात आहेत. पन्नास टक्के ऑक्सीजन समुद्रातून तयार होतो. कार्बनडाय ऑक्साइडचे नियंत्रण समुद्र करतो. जैवविविधता समुद्रामुळे टिकून आहे. समुद्रातील द्रव्यांचा उपयोग औषधे, कॉस्मेटिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. मत्स्य खाद्यावर बरेचसे जग अवलंबून आहे. त्यावर अर्थव्यवस्थाही अवलंबून आहे. दैनंदिन जीवनात आपण समुद्राशिवाय जगू शकत नाही. भारतातील मान्सून समुद्रावर अवलंबून आहे. समुद्र सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. पृथ्वीच्या वातावरणबदलांचे चक्र समुद्रावरच आधारलेले आहे. वातावरणातील वाढते तापमान समुद्र पुन्हा पुन्हा नियंत्रित करत असतो. हे चक्र बिघडले तर बर्फ वितळू लागेल, उष्णता वाढेल आणि जगणे मुश्किल होऊन जाईल.

प्रास्ताविकामध्ये आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले की, आसमंतने गेल्या ११ वर्षांत निसर्ग संवर्धन, विद्यार्थी आणि शास्त्रीय संगीत याविषयीचे अनेक कार्यक्रम केले आहेत. हा पहिला सागर महोत्सव आहे. या माध्यमातून समुद्राविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत. डॉ. गुरुदास नूलकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारत आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले की, समुद्र सखा आहे. त्यामुळे त्याला वाचवले पाहिजे. ही जबाबदारी मानवाचीच आहे. अनेक धातू, द्रव्ये, सुंदर जैवविविधता, जलचर प्राणी समुद्रात आहेत. विद्यार्थी आणि समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांनी आणि सर्वांनीच समुद्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी आसमंतचे संचालक सीए नितीन करमरकर, सीए पुरुषोत्तम पेंडसे, समुद्र विज्ञान संस्थेचे डॉ. सुनील डामरे उपस्थित होते.

मान्यवरांचा सत्कार पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन नंदकुमार पटवर्धन यांनी केला. आरजे दुहिता सोमण-खेर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विवांत मुंबईचे डॉ. संजीव शेवडे, मुंबईच्या कोस्टल कॉन्झर्वेशन चे प्रदीप पाताडे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी, संशोधक पुणे, मुंबईसह विविध भागांतून आले आहेत.

विवांत अनटेम्ड फौंडेशनतर्फे सागर माझा सखा या विषयावर छायाचित्र प्रदर्शन मांडण्यात आले आहे. या प्रदर्शनात जलचर, किनाऱ्यावर आढळणारे छोटे जीव, मासे, प्रवाल आदींची विविध छायाचित्रे झळकली आहेत. हे प्रदर्शन उद्या (दि. १५) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply