अथर्व किरण सप्रेने जमवली देश-विदेशातील १००० हून अधिक नाणी

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव केतकर गल्ली येथे राहणाऱ्या अथर्व किरण सप्रेने वयाच्या एकविसाव्या वर्षी देश, विदेश, इतिहासकालीन अशी एक हजाराहून अधिक नाणी आणि २५० हून अधिक नोटा जमविल्या आहेत.

अथर्व सप्रे याने तिसरीमध्ये असल्यापासून हा छंद जोपासला आहे. वडिलांच्या दुकानात बसलेला असताना पैशाच्या गल्ल्याध्ये मिळालेल्या विदेशातील नाण्यांविषयी त्याला विशेष कुतूहल वाटले. त्यातून ती नाणी संग्रही ठेवण्याचा मानस जपत त्याने आपल्या छंदाला प्रारंभ केला.

अथर्व २०२१मध्ये विशेष श्रेणीत फार्मसीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्यानंतर स्वतःचा औषध दुकानाचा व्यवसाय आणि अधिकृत विविध ब्रँड विक्रीचा त्याचा व्यवसाय त्याने सुरू केला. हे दोन्ही व्यवसाय सांभाळत त्याने आपला छंद सुरूच ठेवला आहे. ऐतिहासिक नाणी आणि नोटा, देशी-विदेशी चलन, शिवराई चलन, पोर्तुगीज गोव्यातील नाणी, इंग्रज राजवट, पेशवे राजवट, हंपी राजवटीतील नाणी, मुघल सल्तनत, भारतातील जुनी नाणी त्याच्या संग्रहात आहेत. चांदी, तांबे, पितळेच्या धातूपासून बनविण्यात आलेली नाणी, दगडी नाणी त्याच्याकडे आहेत. जुने चलनसुद्धा अतिशय सुंदर आणि सुबक असल्याचे त्याने सांगितले.

त्याला हा छंद जोपासण्यामध्ये आई, वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी साथ दिल्याचे तो आवर्जून सांगतो. त्याच्याकडे ७० हून अधिक देशांमधील चलनी नोटा आहेत. हत्ती, गरूड, बेलाचे पान, शिवपिंडी असलेली नाणीसुद्धा त्याचाकडे आहेत. जुनी नाणी, चलन एक ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरता येत असल्याचे सिद्ध होते, असे त्याने सांगितले. त्यावर असणारे विविध आकार, चित्रे त्या काळातील संस्कृती दर्शवितात. म्हणून हे चलन जतन होणे गरजेचे आहे, असेही तो म्हणाले. बेंड बार चलन पद्धत पूर्वकाळापासून सुरू झाली, असे त्याच्या अभ्यासात आले आहे. अधिकाधिक देशांची नाणी जतन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply