मालवण : गोवा राज्य सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे नाट्य क्षेत्रातील भरीव आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीतील समन्वयक नंदकिशोर (नंदू) गजानन जुवेकर यांना महाराष्ट्र कला, नाट्य सन्मान येथे बहाल करण्यात आला.
कला, पर्यटन आणि सिंधुदुर्ग सांस्कृतिक महोत्सव समितीने कला नाट्य उत्सव मालवण येथे मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित केला होता. या महोत्सवात महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध क्षेत्रात भरीव आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लोककला, संस्कृती, नाट्य, संगीत, नृत्य, व्यवस्थापन, शिक्षण, प्रशासकीय सेवा, सामाजिक कार्य, कायदा आणि सुव्यवस्था, आरोग्य, अर्थशास्त्र, ग्रामविकास अशा विविध स्तरावरील मान्यवरांना गौरविण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातून केवळ रत्नागिरीमधील नंदू जुवेकर यांचा समावेश होता. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
गोव्याचे कला, संस्कृती आणि ग्रामविकास मंत्री गोविंद गावडे, आमदार प्रेमेंद्र शेठ, प्रसिद्ध सिने कलाकार अनिल गवस, गोवा कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप तसेच, महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या उपस्थितीत हा सत्कार झाला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात मालवणच्या नाट्य रसिकांनी नाटकांचा आस्वाद घेतला.
Follow Kokan Media on Social Media

