उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्य शासनाच्या उद्योग विभागाने पुढाकार घेऊन राज्यभर रोजगार मिळावे आयोजित केले आहेत. या मेळाव्यांचा प्रारंभ रत्नागिरीत १२ फेब्रुवारीला होणार आहे. पाचवीपासून उच्च शिक्षण घेतलेल्या कोणाही तरुणाला नोकरी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या मेळाव्यामध्ये आहे. मेळाव्यांमध्ये राज्यभरातील पावणेदोनशेपेक्षा अधिक उद्योग आणि कंपन्या त्यांना आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची भरती या मेळाव्यातून करणार आहेत. विशेष म्हणजे हा मेळावा केवळ उमेदवार आणि नोकरी देणाऱ्यांचा संवाद घडवून आणण्यासाठी नव्हे, तर प्रत्यक्ष नियुक्तिपत्रे देण्यापर्यंतची प्रक्रिया पार पाडण्यासाठी होणार आहे. दिवसभराचा मेळावा संपेल तेव्हा किमान दोन हजार तरुणांच्या हातात त्यांच्या नोकरीची नियुक्तिपत्रे असतील. हा अशा तऱ्हेचा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात येत आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.
मेळाव्यामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आणि कोकणातील हातावर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. इतर सर्व कंपन्या मुंबई, पुणे, औरंगाबाद इत्यादी महानगरांमधल्या असतील. याचाच अर्थ कोकणातील तरुणांना नोकरीसाठी आपल्या गावातून स्थलांतर करून त्या त्या गावी जावे लागणार आहे. नोकरीसाठी स्थलांतर करू नये, असे नाही. पण स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, असा जो धोशा सातत्याने विविध राजकीय पक्ष लावत असतात, त्याच्याशी हे काहीसे विसंगत आहे. कारण या मेळाव्याच्या निमित्ताने कोकणातील तरुण रोजगाराकरिता बाहेर जाणार आहे. तो जाऊ नये असे नाही. पण फरक एवढाच की सध्या तरुण एकेकटा मुंबई-पुण्याला जातो. त्याच्या सोयीनुसार नोकरी पत्करतो. त्या नोकरीमध्ये तो स्थिरस्थावर झाला, की नंतर तेथे स्थायिक होतो. ते हळूहळू होणारे स्थलांतर आहे. पण या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने अनेक तरुणांचे स्थलांतर एका समूहाने होणार आहे.
म्हणूनच या मेळाव्याच्या निमित्ताने आणखी एक मुद्दा विचारात घेतला गेला पाहिजे. कोकणात मोठ्या प्रमाणावर पडीक राहिलेली शेती, तिचा विचार करून करोनाच्या संकटाच्या काळात मुंबईतून कोकणात पुन्हा आलेल्या तरुणांनी राबविलेले स्वयंरोजगाराचे प्रयत्न, कोकणात स्थानिक शेतमाल आणि फळांपासून प्रक्रिया उद्योग राबविण्याची असलेली प्रचंड मोठी संधी या साऱ्याचा विचार केला तर कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार असूनही त्यासाठी तरुण मिळत नाहीत. उद्योग विभागाने जसा रोजगार मेळावा आयोजित करून तरुणांना संधी दिली, तसाच प्रयत्न कोकणात जे छोटे-मोठे उद्योग आहेत, त्यांना आवश्यक असलेल्या रोजगाराभिमुख तरुणांची जंत्री तयार करायला हवी. स्थानिक स्वरूपातच त्यांना हे तरुण पुरविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करायला हवी. उद्योग विभागाच्या पुढाकाराने राज्यभर रोजगार मेळावे घेतले जाणारा असले, तरी त्या मेळाव्यामधून औद्योगिकीकरण झालेल्या भागातच ग्रामीण तरुणांचे स्थलांतर होणार आहे. साहजिकच ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होणार आहेत. त्याचा विचार करायला हवा. कोकणात कोकणाचे प्रश्न असतील, तसेच विदर्भात विदर्भाचे म्हणून काही प्रश्न असतील, मराठवाड्याचेही काही प्रश्न असतील. सर्वच ठिकाणी स्थानिक उद्योगांना, लघुउद्योगांना गरज असलेल्या तरुणांची उपलब्धता करून देण्यासाठीही उद्योग विभागाने तसे अभियान राबवायला हवे. मोठ्या उद्योगांप्रमाणेच या छोट्या उद्योगांनाही कामगार-कर्मचाऱ्यांची गरज असते. ती स्थानिक स्वरूपातच भागविली गेली, तर स्थलांतर रोखले जाईलच, पण त्याचबरोबर त्या त्या स्थानिक उद्योगांची आणि पर्यायाने त्या विभागाचीही भरभराट होईल. हा समन्वय साधला जाणे आवश्यक आहे. स्थलांतर रोखणाऱ्या नोकऱ्या मिळवून देण्याच्या विचारालाही चालना मिळायला हवी.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ३ फेब्रुवारी २०२३)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडियाचा – ३ फेब्रुवारी २०२३ रोजीचा अंक

मॅग्झटर लिंक : https://bit.ly/kokanmedia3feb
या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : स्थलांतर रोखणाऱ्याही नोकऱ्या हव्यात https://kokanmedia.in/2023/02/03/skmeditorial3feb/
मुखपृष्ठकथा : अर्थसंकल्पात कोकण, कोकणचा अर्थसंकल्प : एक फेब्रुवारीला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कोकणाच्या दृष्टिकोनातून वेध घेणारा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख…
कोकणच्या फायद्याच्या १० योजना – प्रा. उदय बोडस, रत्नागिरी
साडी – सौंदर्याची महाराणी : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख…
यासह व्यंगचित्र, वृत्त, आदी…

