रत्नागिरीतील मॅरेथॉनमध्ये दीड हजाराहून अधिक नागरिकांची दौड

रत्नागिरी : येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरून पालकमंत्री उदय सामंत आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फिट रत्नागिरी हॅप्पी मॅरेथॉनमध्ये दीड हजाराहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. विविध ११ गटांमध्ये ही स्पर्धा झाली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी ते म्हणाले, माणसामधील खिलाडू वृत्ती जागरूक ठेवण्यासाठी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणे महत्त्वाचे आहे. यामुळे हार पचविण्याची आणि विजयानंतर उन्माद न बाळगण्याची मानसिकता तयार होते. यापुढे दरवर्षी शिवजयंतीला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करव्यात, अशी सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना करतो. वर्षाच्या प्रत्येक महिन्यात एका क्रीडाप्रकाराची स्पर्धा यापुढे आयोजित करण्यात येतील. शासनाने मिनीऑलिम्पिक स्पर्धाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील तसेच देशातील खेळाडू ऑलिम्पिकमध्ये नाव कमावतील.

स्पर्धा संपल्यानंतर श्री. सामंत यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. मॅरेथॉनमध्ये जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी २१ किलोमीटर अंतर धावून पूर्ण केल्याने पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले की, पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम करण्यात आला असून मॅरेथॉनमध्ये अत्यंतकमी कालावधीमध्ये १ हजार ५५५ जणांनी नोंदणी केली. हा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विजेतेपद मिळविण्यापेक्षा स्पर्धेतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या सहभागातून आनंद मिळावा, याकरिता या मॅरेथॉनचे नाव हॅप्पी मॅरेथॉन ठेवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, पदक आणि प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आले.

गटनिहाय गुणानुक्रमे विजेते असे :
२१ कि. मी. महिला – प्रमिला पांडुरंग पाटील, शिल्पा केंबळे, योगिता तांबडकर.
२१ कि.मी. पुरुष – सिद्धेश बर्जे, ओंकार बैकर, समाधान पुकळे.
१० कि.मी. महिला – साक्षी संजय जड्याळ, प्रिया करंबेळे, शमिका मणचेकर.
१० कि.मी. पुरुष – स्वराज संदीप जोशी, अमेय धुळप, ओंकार चांदिवडे.
५ कि.मी. महिला- श्रुती दुर्गवळे, अमिता कुडकर, सिद्धी इंगवले.
५ कि.मी. पुरुष- प्रथमेश चिले, ऋतुराज घाणेकर, नितेश मायंगडे.
अठरा वर्षांखालील मुले-मुली गट-
मुली- रिया स्वरूप पाडळकर, सांची कांबळे, आर्ची नलावडे, राखी थोरे.
मुले गट- अथर्व चव्हाण, श्रेयस ओकटे, सुशांत आगरे, सौरभ घाणेकर.
दिव्यांग गट- सादिल नाकाडे.
चौदा वर्षांखालील मुली – अनुजा पवार, हुमेरा सय्यद, कार्तिकी भुरवणे.
मुले – साईप्रसाद वराडकर, वीर मेटकर, ओम भोरे.

स्पर्धेला नागरिक, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply