सुमंगल लोकोत्सवात विक्रीसाठी हजारावर स्टॉल

कोल्हापूर : पर्यावरण जागृतीचा जागर, सेंद्रिय शेतीचा प्रचार, पंचमहाभूतांच्या महतीचे सादरीकरण, स्वास्थ्य, शिक्षण आणि कृषी यांच्या आधुनिकीकरणासाठी दिली जाणारी माहिती याबरोबरच छोटे-मोठे उद्योजक, व्यावसायिकांना आपला व्यवसाय आणि उद्योगवाढीसाठी मोठे व्यासपीठ ‘सुमंगलम लोकोत्सवा’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत.

पूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली कणेरी मठ येथे २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ होत आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तयारीची पाहणी केली. अतिशय चांगली तयारी सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या. यामुळे नियोजनाला आणखी गती आली आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पंचमहाभूतांची गॅलरी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सहाशे मूर्तींचा वापर करत सोळा संस्कार दाखविण्यात आले आहेत.

पारंपरिक ग्रामीण समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक कार्यपद्धतीची माहिती या लोकोत्सवातून देण्यात येणार आहे. पर्यावरण जागृतीबरोबरच युवकांसह सर्वांनाच उद्योग क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक स्टार्टअप प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दहा हजारावर व्यावसायिकांचे संमेलन होणार आहे. देशभरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. उद्योग, व्यवसाय कसा वाढवावा याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या अनुभवाची शिदोरी नवउद्योजकांना मिळणार आहे.

सामान्य शेतकरी, व्यावसायिकांपासून प्रथितयश उद्योजकांनाही त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी मोठे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेती औजारे व इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी हजारावर स्टॉल उभारण्यात आले आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना उपयोगी पडतील, अशी छोटी छोटी औजारेही तेथे उपलब्ध असतील. बियाण्यांचे स्टॉलही आहेत. सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू याशिवाय पर्यावरणपूरक वस्तूही येथेही मिळतील. शेतकरी आणि उद्योजकांना राज्य सरकारच्या योजनांची, अनुदानाची माहिती मिळावी म्हणून पन्नासपेक्षा अधिक स्टॉल आहेत. औद्योगिक प्रकल्पांची माहिती देण्यासाठी एमआयडीसी हब उभारण्यात आले आहे. युवकांना उद्योग क्षेत्रातील नवनव्या संशोधनाची माहिती मिळावी, यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहेत.

रोज चार ते पाच लाख लोक या महोत्सवाला भेट देतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे उत्पादनांना मोठा ग्राहकवर्ग मिळणार आहे. बचत गटाच्या महिलांनाही त्यांच्या वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीची सोय करून देण्यात आली आहे.

केएमटीची विशेष मोफत बससेवा
सुमंगलम् पंचमहाभूत महोत्सवाकरिता उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने गंगावेश येथून केएमटीच्या विशेष मोफत जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बसेसचे जाण्याकरिता दोन आणि येण्याकरिता एक मार्ग आहे. त्यांचा तपशील असा –
पहिला मार्ग (जाताना) : गंगावेश – छत्रपती शिवाजी महाराज चौक – एस. टी. स्टँड – ताराराणी चौक – ओपल हॉटेल – शिवाजी विद्यापीठ – शाहू नाका – कणेरी मठ फाटा – एमएसईबी कार्यालयापासून कार्यक्रम स्थळाजवळ.

दुसरा मार्ग (जाताना) : गंगावेश – छत्रपती शिवाजी महाराज चौक – उमा टॉकीज – रेल्वे फाटक – राजारामपुरी – सायबर इन्स्टिट्यूट – शिवाजी विद्यापीठ – शाहू नाका – कणेरी मठ फाटा – एमएसईबी कार्यालयापासून कार्यक्रम स्थळाजवळ.

येतानाचा मार्ग : कार्यक्रमस्थळावरून येताना एकेरी मार्ग असल्याने सर्व बसेस कंदलगाव – कंदलगाव नाका – रिंग रोड – शांतीनिकेतन – शिवाजी विद्यापीठ – ओपल हॉटेल – ताराराणी चौक – एस. टी. स्टँड – रेल्वे स्टेशन – छत्रपती शिवाजी महाराज चौक – गंगावेश असा असेल.

या महोत्सवाकरीता सर्व प्रवाशांना मोफत बससेवा उपलब्ध राहणार आहे. ही बससेवा सातही दिवस सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. या विशेष बससेवेचा सर्व लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply