कोल्हापूर : पर्यावरण वाचविण्याबरोबरच निरोगी पिढी घडविण्यासाठी येत्या २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूर येथे पंचभूत महोत्सव होत आहे. तो खऱ्या अर्थाने लोकोत्सव व्हावा, यासाठी गेले दोन महिने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या महोत्सवाचे संयोजन कणेरी सिद्धगिरी मठ महासंस्थान करत असले तरी संयोजनातील घटक मात्र केवळ परिसरातील ग्रामस्थच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकसह विविध राज्यातील भक्तगण करत आहेत. हा आमचा लोकोत्सव आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात असल्याने दोन महिन्यांपासून सारे मनापासून योगदान करत आहेत. मठावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे महोत्सवात योगदान राहावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
महोत्सवादरम्यान, सात दिवसात मठावर पन्नास लाखांवर लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली आहे. रोज पाच लाखांवर लोकांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे. यासाठी पत्रावळी अथवा प्लास्टिक न वापरण्याचे ठरले आहे. त्यामुळे भक्तांनी ताट-वाटी आणि तांब्या द्यावे, असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार मठावर रोज शेकडो ताट-वाट्या येत आहेत. सुशोभीकरणासाठी जुन्या साड्यांचा वापर करण्यात येत आहे. यासाठी महिलांकडून रोज हजारो साड्या दिल्या जात आहेत. आलेल्या लोकांना रोज काय जेवण द्यायचे, त्यामध्ये आपण कोणता पदार्थ द्यायचा याचा निर्णय गावागावांनी घेतला आहे. याशिवाय प्रत्येक घरातून सात दिवस चार ते पाच लाख भाकऱ्या येणार आहेत. शिधाही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यांतील संयोजन समित्या कार्यरत आहेत.
उत्सवासाठी पंचवीस राज्यातून भक्तगण येणार आहेत. त्यातील बहुतांशी लोकांच्या राहण्याची सोय परिसरातील गावांत असलेल्या घराघरांत करण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामस्थांनीच पुढाकार घेतला आहे. मठावर प्लास्टिक कचऱ्याचे विघटन करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकाने एक किलो कचरा आणावा, असे आवाहन केले आहे. महोत्सव काळात परिसरात मोठी गर्दी होणार असल्याने रस्ते रुंदीकरण करण्यात येत आहे, त्यासाठी अनेकांनी आपली जमीन दिली आहे. पार्किंगसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी आपले शेत मोकळे करून दिले आहे. रोज शेकडो भाविक सध्या मठाला भेट देत आहेत, त्यामध्ये प्रत्येकाजण आम्ही काय देऊ, अशी विचारणा करत आहेत. काहीजण तर रिकाम्या हाताने न येता काहीना काही वस्तू घेऊनच येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण या महोत्सवात सक्रिय सहभागी होत आहे. हा लोकोत्सव होण्यात प्रत्येकजण खारीचा वाटा उचलत असल्याचे सांगत आहे.








शिवजयंतीला मिरवणुकीसह पंचगंगा नदी महाआरती
येथे सोमवारपासून होणार असलेल्या पंचमहाभूतम् लोकमहोत्सवाचा प्रारंभ उद्या (दि. १९ फेब्रुवारी) शिवजयंती दिनी भव्य मिरवणुकीसह पंचगंगा नदी महाआरतीने प्रारंभ होणार आहे.
सिद्धगिरी कणेरी मठावर चमहाभूत लोकोत्सव आयोजित केला आहे. शिवजयंतीदिनी भव्य मिरवणुकीसह पंचगंगा नदीवर सामुदायिक आरतीने प्रारंभ होईल. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलेले आहे.
कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील महात्मा गांधी मैदानामधून या मिरवणुकीचा प्रारंभ होणार असून त्यामध्ये बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड पापाची तिकटी मार्गे गंगावेश, पंचगंगा नदी या ठिकाणी गेल्यानंतर मिरवणूक विसर्जित होईल. त्यावेळी तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आरती होणार आहे. विविध चौदा राज्यांतील पारंपरिक लोकवाद्यांसह कलाकारांचा सहभाग आणि त्यांचे सादरीकरण तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवना आधारित चित्रे, त्यांचे पर्यावरणविषयक विचार यांचे प्रदर्शन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील गोजेगाव येथील ११ जणांचे घडशी-गुरव समाजाचे सामुदायिक तुतारी वादनपथक हे मुख्य आकर्षण असणार आहे.
या सर्वांचा नागरिकांनी स्वतःहून सहभाग घेऊन लाभ घ्यावा आणि येत्या २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान कणेरी येथे होणाऱ्या या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी व्हावे. त्यासाठी केएमटीची मोफत प्रवास सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचाही लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

