कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सावादरम्यान मठातील सुमारे पन्नास गाईंचा अचानक मृत्यू झाला. कालपासून या घटनेला सुरवात झाली. गाईंचा मृत्यू हा अनपेक्षित अपघात असून ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचा खुलासा श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठाने केला आहे.
याबाबत श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवादरम्यान काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू हा अनपेक्षित अपघात आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. एकीकडे आम्ही गाईंचा जिवापाड सांभाळ करत असताना अचानक काही गाईंचा झालेला मृत्यू हा मनाला वेदना देणारी बाब आहे. कणेरी मठाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून हजारो गाईंचा सांभाळ केला जातो, त्यासाठी गोशाळेची स्थापना करण्यात आली आहे. भाकड आणि भटक्या गाईंना कोणी वाली नाही, अशा जनावरांनाही कणेरी मठ येथील गोशाळेत आणून त्यांचे पालनपोषण केले जाते. त्यामुळे ही गोशाळा देशभर आदर्शवत आहे. वर्षाला त्यावर काही कोटी रुपये खर्च केला जातो. तसेच लम्पीच्या साथीमध्ये हजारो जनावरांना मोफत औषधे देऊन त्यांचे प्राण मठाने वाचवले आहेत. भटक्या कुत्र्यांच्यासाठीही नुकतीच निवारा आणि सेवा शाळा सुरू करण्यात आली आहे.
पर्यावरण रक्षणाबरोबरच जनावरांवरील निष्ठआ आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीच पंचमहाभूत लोकोत्सव साजरा केला जात आहे. यातूनच देशभरतील दुर्मिळ होत असलेल्या देशी प्रजातीच्या गाई, बैल, शेळी, अश्व, गाढव, मांजर यांचे प्रदर्शन आणि स्पर्धाही घेतल्या जात आहेत. देशी प्रजाती टिकाव्यात, हाच या महोत्सवाचा हेतू आहे.
अशा वेळी काही गाईंचा अचानक झालेला मृत्यू मठाच्या दृष्टीने अतिशय वेदनादायीच आहे. कुणाच्या तरी अज्ञानातून ही गोष्ट घडलेली आहे. ती नेमकी कशी घडली याबाबत वैद्यकीय शवविच्छेदन अहवाल लवकरच बाहेर येईल. झालेल्या घटनेबाबत कुणीही गैरसमज करून घेऊ नये इतकीच विनंती आहे, असेही मठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पत्रकाराला मारहाण, संघटनांकडून निषेध
कणेरी येथील सिद्धगिरी मठाने आयोजित केलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवात वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराला मारहाण करण्यात आली. मठात अचानक झालेल्या गाईंच्या मृत्यूबाबतची माहिती घेण्यासाठी गेलेल्या या पत्रकाराला तेथील स्वयंसेवकांनी मारहाण केली. पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा कोल्हापूरमधील पत्रकारांनी तीव्र निषेध केला आहे.
श्रीक्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ येथे सुरू असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सावादरम्यान मठातील सुमारे पन्नास गाईंचा कालपासून आजपर्यंत अचानक मृत्यू झाला. अन्नातून विषबाधा झाल्याने गाईंचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्याबाबतची माहिती मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी मठाच्या स्वयंसेवकांकडून एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण झाली. मात्र त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार झाल्याचे वृत्त नाही.
या मारहाणीबाबत कोल्हापूरमधील पत्रकारांनी आणि पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. पत्रकार संरक्षण समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुभाष माने यांनी म्हटले आहे की, पत्रकाराला मारहाण ही घटना फारच चुकीची आहे. कोणत्याही परिस्थितीत या घटनेचा छडा लावण्याची गरज आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ आबाधित राहिला नाही, तर सर्वत्र स्वैराचार माजेल. एकाही पत्रकाराचा अर्वाच्च भाषेत उपमर्द करू नये अथवा मारहाण होऊ नये. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये. मारणाऱ्याला शासन व्हावे. या घटनेचा कोल्हापूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे.
गाईंच्या मृत्यूची घटना नेमकी काय घडली आहे, यांची खरी माहिती द्यायला हवी. कोणत्या गाई, कशामुळे विषबाधा झाली, गाईंना पिण्यासाठी पाणी कोणते दिले जात होते, ते पाणी शुद्ध होते का, माणसांचे अन्न जनावरांना द्यावे लागत होते, तर जनावरांच्या चाऱ्याची सोय केली नव्हती का, माणसांच्या जेवणाची सोय मोठ्या प्रमाणात केली होती, जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्यात अडचणी येत होत्या काय, कणेरी मठाकडे चारा कमी आहे म्हणून माणसांचे जेवण जनावरांना घातले जात होते का, जनावरांच्या देखभालीसाठी कोणी मठाला मिळाले नाहीत का, इत्यादी संपूर्ण खरी प्रसिद्ध करावी, अशी अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
कणेरी मठावरील गाईंच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात येणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने संजय पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पत्रकाराला झालेल्या मारहाणीबाबत सिद्धगिरी मठाने खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे, मठाने नेहमी पत्रकार बांधवांचा सन्मान केला आहे, तसेच पत्रकार बांधवांनीही नेहमी मठाच्या विविध सामाजिक उपक्रमांत बहुमूल्य योगदान केले आहे. नेहमीच अमूल्य सहकार्य केले आहे आणि करत आहेत. आज कोणी खोडसाळपणे पत्रकार बांधवांच्या बाबतीत गैरप्रकार केला, त्याबद्दल आम्ही व्यवस्थापनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहोत, असे श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानच्या उत्सव समितीने पत्रकात म्हटले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

