रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन केंद्राला नुकतीच भेट दिली. ही भेट घडवून आणणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेबद्दल त्या विद्यार्थ्याने व्यक्त केलेली कृतज्ञता.
…………..
प्रिय,
जिल्हा परिषद, रत्नागिरी
आता तुला नमस्कार लिहायचा की नक्की काय ते मला कळत नाही, पण माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील, असे मला वाटते. आतापर्यंत तुझ्या अधिकाऱ्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या नावे होणारा पत्रव्यवहार तुला सवयीचा ला असेल. पण मी चक्क तुलाच पत्र लिहितोय, थेट तुलाच!

अरे हो!! माझे नाव, गाव सांगायचे राहिलेच, नाही का?
मी आयुर… आयुर महेश मुलूख. दापोली तालुक्यातील तुझ्याच अखत्यारीत असलेल्या चंद्रनगर गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकतो. यंदा इयत्ता सातवीत आहे मी.
तुला नवल वाटले असेल, आता या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलाचे माझ्याकडे काय काम बरे? तर, आहे माझे तुझ्याकडे काम. तुझ्याकडेच आहे! मला माझ्या मनातल्या भावना थेट तुझ्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, तुझ्या काळजापर्यंत!
तुला माहीतच असेल की, तुझ्या मराठी शाळेत मी शिकतोय म्हणजे मी खेड्यातला गरीब मुलगा असेन. होय, मी अगदी तसाच आहे. माझे आजोबा नेहमी सांगतात, पूर्वी अनेकजण गुरुजींकडे बोट दाखवून म्हणायचे, मिळत नाही भीक तर मास्तरकी शिक!
तसे माझे आजोबादेखील तेव्हा मास्तर झाले असते. पण त्यांनी तेव्हा मास्तरकी नाकारून शेतीभाती सांभाळली. मास्तर बनून काय करायचे, हा यक्षप्रश्न त्यांना तेव्हा पडला होता म्हणे! ते जाऊ दे!
…… तर, मी पत्र लिहायला का घेतलेय, त्याचे कारण सांकतो. यंदा तू तुझ्या कारकिर्दीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आगळा वेगळा उपक्रम राबविलास. ‘ जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची नासा, इस्रोस भेट!’ खरे तर अशा प्रकारचे अनेक अभ्यासदौरे आयोजित करायची तुला सवय आहेच. पण, यावर्षीचा हा उपक्रम होता फक्त जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी. नासा, इस्रो या खरे तर केवढ्या मोठ्या अवकाश संशोधन संस्था! त्यांचे नाव वाचून तेथील काल्पनिक चित्र डोळ्यांसमोर आणले, तरीही आपण कधी स्वप्नातही प्रत्यक्ष तेथपर्यंत पोहोचू शकणार नाही, असे आमच्यासारख्यांना वाटणे साहजिकच नाही का? कारण तेथे जाणे, तेथील कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणे म्हणजे सारा पैशांचा खेळ! हजारो, लाखो रुपये मोजूनही संधी न मिळणाऱ्या या संस्थांपर्यंत कधीकाळी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी झेप घेतील असा विचार यापूर्वी कधी कुणी स्वप्नातही केला नसेल. पण आतापर्यंत स्वप्नवत वाटणारा हा खेळ तू यावर्षी प्रत्यक्षात उतरविलास.

इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठीच्या चाळणी परीक्षेस बसवून तू हे शिवधनुष्य उचललेस. शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विज्ञान विषयाच्या घटकांवर आधारित असलेल्या सामान्यज्ञान परीक्षेस आम्ही बसलो. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी या परीक्षेच्या दृष्टीने आमची तयारी करून घेतली असली, तरी ही परीक्षा काही साधी सोपी नसेल याची मला जाणीव होतीच. … आणि झालेही तसेच! परीक्षा खरोखरच आमच्या अभ्यासाचा ‘ कस’ पाहणारी होती. मात्र केंद्र स्तरावर मी पहिल्या क्रमांकावर आलो, तेव्हा कुठे मला थोडा धीर आला. आता आपण चांगला अभ्यास केला तर नासा नाहीतर इस्रोपर्यंत जाऊ शकतो ही अंधुकशी आशा माझ्या मनात जागी झाली. केंद्र, प्रभाग, तालुका आणि पुढे जिल्हास्तरावरही मला चांगले गुण मिळाले आणि मी इस्रो येथे जाण्यासाठी पात्र ठरलो! पहिल्यांदा त्या यादीत माझे नाव पाहताना माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
इस्रो येथे जाण्याआधी मी या चाळणी परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल माझे समाजाच्या सर्व थरांतून फार कौतुक झाले. अनेकांनी खास कार्यक्रमात बोलावून माझे अभिनंदन केले आणि १३ मार्च २०२३ रोजी आमची इस्रो वारी सुरू झाली. आमच्या कपड्यांपासून ते चप्पल, शूजपर्यंतचा सारा खर्च तूच केलास ना! आमचे जाणे-येणे, राहणे, जेवण, नास्ता सगळा खर्च तुझाच! याशिवाय आमची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक, डॉक्टर यांचीही सारी व्यवस्था तूच केलीस. केवळ तुझ्यामुळेच इस्रोसारख्या संस्थेस प्रत्यक्ष भेट देणे, तेथील कामकाज पाहणे, संशोधन पाहणे, अवकाशयान, रॉकेट, क्षेपणास्त्र यांची अगदी जवळून माहिती घेणे शक्य झाले. तेथील शास्त्रज्ञांशी संवाद साधता आला. तेथील संग्रहालयही आम्हाला पाहता आले. आम्हाला इस्रोकडून फार मोलाची माहिती मिळाली.
आपणही पुढे असेच काहीतरी अचाट संशोधन करायला हवे आणि तेही इथेच! अशी एक दुर्दम्य इच्छाशक्ती तेव्हापासूनच माझ्या मनात निर्माण झाली आहे. याचे सारे श्रेय तुलाच बरे का! इस्रोसारख्या संस्थेस इतक्या लहान वयात प्रत्यक्ष भेट देणारा आमच्या पंचक्रोशीतील मी पहिलाच मुलगा असेन, असे मला वाटते.
मी किंवा माझ्या आईवडिलांनी कधी विचारसुद्धा न केलेले स्वप्न केवळ तुझ्या कृपेने असे अवचित पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकणाऱ्या ग्रामीण भागातील गरीब पण हुशार मुलांना त्यांच्या खिशातला एक रुपयादेखील खर्च न करता नासा, इस्रोसारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था प्रत्यक्ष दाखविणाऱ्या तुझे आभार मानावे तितके कमीच. आज तुझ्याबद्दल कितीही लिहिले तरी ते कमीच होईल, अशी माझ्या मनाची अवस्था झाली आहे. तूर्तास पत्र पुरे करतो.
तुझाच लाडका विद्यार्थी,
कु. आयुर महेश मुलूख
जि. प. शाळा चंद्रनगर,
ता. दापोली
(इयत्ता- सातवी)