दापोली : पैसे देऊन विष विकत घेऊन आजाराला बळी पडण्यापेक्षा सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे. नैसर्गिक शेती केली पाहिजे, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दापोलीत आयोजित केलेल्या पहिल्या कोकण प्रांत ॲग्रीव्हिजन संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोंभळणे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील रहिवासी असलेल्या राहीबाई सोमा पोपेरे यांना बीजमाता म्हणतात. त्यांनी १५४ देशी वाणांचे बियाणे जतन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन २०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना देशाचा सर्वोच्च चौथा पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. पोपेरे यांना मदत करण्यासाठी “बास” संस्थेने संस्थापिका राहीबाईंसह विविध बचतगटांच्या महिलांच्या मदतीने कळसूबाई बीज संवर्धन समिती स्थापन केली आहे.
राहीबाईंचे कार्य लक्षात घेऊन त्यांना दापोलीत अभाविप प्रणित ॲग्रीव्हिजन कोकण, कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट आणि दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पहिल्या ॲग्रीव्हिजन कोकण प्रांत संमेलनासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या पुढे म्हणाल्या, देशी बियाणे प्रत्येकाच्या शेतात बांधापर्यंत गेले पाहिजे. प्रत्येकाच्या घरात किचन गार्डन असले पाहिजे. प्रत्येकाच्या डब्यात घरचे पिकवलेले अन्न पाहिजे. पद्मश्री पुरस्कार घ्यायला जाताना काळ्या आईची आठवण झाली. कारण हा पुरस्कार माझा नव्हे, तर काळ्या मातीचा आहे, असेही त्या नम्रतेने म्हणाल्या.
कृषी विद्यापीठाच्य विश्वेश्वरय्या सभागृहात झालेल्या या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. संजय सावंत, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य विनायक काशीद, अधिष्ठाता डॉ. बी. जी. देसाई, डॉ. पी. ए. सावंत, डॉ. संजय भावे, भारतीय किसान संघ प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, संमेलन संयोजक डॉ. अमित देवगिरीकर, विद्यापीठ मंत्री प्रथमेश दिघे, राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य अक्षय जंगम हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलन सचिव डॉ. प्रशांत बोडके यांनी केले, तर ॲग्रिव्हिजन परिचय कोकण प्रदेश संयोजक प्रथमेश रासकर, अभाविप परिचय अभाविप कोकण प्रांत सहमंत्री अमोल शिंदे, अमोल शिंदे यांनी करून दिला. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोसेसिंग, मार्केटिंग आणि उद्योजकतेसाठी नवकल्पना डॉ. नितीन पाटील यांनी मांडल्या. चंदन पाटील यांनी सामाजिक उद्योजकता या विषयाची मांडणी करून विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. संमेलनात आभासी पद्धतीने अमेरिकेतून डॉ. हर्ष किकेरे यांनी रोबोटिक आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उद्योजकतेसाठी नवकल्पना मांडल्या.
कार्यक्रमाच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धा व रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये २२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. संमेलनात २५ महाविद्यालये, ९ कृषी विद्यापीठांमधून ३४० विद्यार्थी, १६ प्राध्यापक आणि ३४ शेतकरी महिला सहभागी झाल्या होत्या. संयोजक डॉ. अमित देवगिरीकर यांनी आभार मानले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




