साठ हजाराच्या देणग्या देऊन बोडस दांपत्याचा साठावा वाढदिवस

रत्नागिरी : सात सामाजिक संस्थांना साठ हजार रुपयांच्या देणग्या देऊन येथील प्रा. उदय बोडस दांपत्याने आपला साठावा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला.

शाळेचा उंबरठा ओलांडून महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून १९७८ पासून आजपर्यंत सुमारे ४५ वर्षे एकमेकांना साथ देणाऱ्या निवृत्त प्राध्यापक उदय बोडस आणि त्यांच्या पत्नी सौ. साधना बोडस यांनी आपला साठावा वाढदिवस आगळ्या प्रकारे साजरी केला. दोघांच्या वयात अवघे २ दिवसांचे अंतर आहे. उदय बोडस यांचा जन्म २० एप्रिल १९६३ चा तर सौ. साधना (जोशी) बोडस यांचा जन्म २२ एप्रिल १९६३ चा. दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

सामान्य कुटुंबातून पुढे येऊन स्वकष्टाने दोघांनी जीवनातला मोठा पल्ला गाठला आहे. आता दोघांचा वयाचा हीरकमहोत्सव पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी आगळा पायंडा पाडला आहे. वर्गमित्रच असल्याने दोघांचाही मित्रपरिवार मोठा आहे. तसेच सामाजिक कामामुळे जनसंपर्कसुद्धा भरपूर आहे. तरीही दोघांनी आपला हीरक महोत्सवी वाढदिवस आगळ्या प्रकारे साजरा करायचे ठरवले आणि तो संकल्प प्रत्यक्षात उतरवला. केक, पार्टी, मित्र-मैत्रिणींचे गेट टुगेदर, हॉटेलिंग, नवीन खरेदी किंवा लांबचा प्रवास असा कोणताही खर्च न करता आपल्या वयाच्या पूर्ण झालेल्या वर्षाइतकी ६० हजाराची रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करायचे दोघांनी ठरवले आणि ती रक्कम दान केली.

गेली १० वर्षे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आजपर्यंत दोघांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील ६५ व्यक्ती आणि ८ सामाजिक/ शैक्षणिक संस्थांना पुरस्कार आणि देणग्यांच्या मार्गाने रुपये ४ लाख ८६ हजाराची रक्कम वितरित केली आहे. यावेळी हीरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दिव्यांग, मतिमंद, निराधार मुले, महिला आणि वृद्ध यांच्यासाठी काम करणाऱ्या ७ सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांना मिळून देणगी रूपाने साठ हजाराची देणगी देण्याचे दोघांनी ठरवले. या ७ संस्थांची निवड त्यांनी स्वत: केली. गेल्या महिन्यात त्यांच्या बँक खात्यांची माहिती मागवली. स्नेहदीप संस्थेचे इंदिराबाई बडे कर्णबधिर विद्यालय (दापोली), ग्रामआधार स्वयंसेवी संस्था संचालित जीवन ज्योती विशेष शाळा व मतिमंद पुनर्वसन केंद्र, शृंगारतळी (गुहागर), सांदीपनी गुरुकुल कुडवली-ताम्हाने (संगमेश्वर), जिल्हा परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटनेचे अभ्यंकर निरीक्षणगृह – बालगृह (जुने रिमांड होम, रत्नागिरी), कै. श्रीमती जानकीबाई (अक्का) तेंडुलकर महिलाश्रम (लांजा), स्वस्तिक फाऊंडेशन संचालित दिवीजा वृद्धाश्रम, असलदे (कणकवली) आणि जीवन आनंद संस्था संचालित संविता वृद्धाश्रम, पणदूर (कुडाळ) या ७ संस्थांना मिळून साठ हजाराची देणगी दोघांनी आपल्या बँक खात्यातून पाठवून आपला संकल्प पूर्ण केला आहे.

कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट देणगी देऊन दोघांनी संबंधित संस्थांना सुखद धक्का दिला आहे. दोघांनी आगळा वेगळा हीरकमहोत्सव साजरा करून नवा पायंडा पडल्याबद्दल या संस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply