हाडाच्या कार्यकर्त्याचं हृदयद्रावक निधन

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अजित नाडकर्णी (वय ६८) यांचं शुक्रवारी (दि. २८ एप्रिल २०२३) अचानक झालेलं निधन चटका लावणारं आहे.

……………

अजित नाडकर्णी यांची सुमारे ४५ वर्षांपूर्वी भेट झाली. तेव्हा मी डोंबिवलीचा रहिवासी होतो. शिवसेनेच्या डोंबिवली शाखेनं स्वातंत्र्यवीर सावरकर बालवाचनालय सुरू केलं, त्या चळवळीत माझा अल्पसा सहभाग होता. त्याच निमित्तानं नाडकर्णी यांची भेट होत होती, नंतर ती वाढत घेतली आणि कायम झाली.

सुरुवातीच्या काळात नाडकर्णी वृत्तपत्र वितरणाचं काम डोंबिवलीत करत असत. खरं तर त्यातूनच त्यांची ओळख झाली. नंतर ती वाचनालयाचे निमित्ताने वाढत गेली. या वाचनालयातर्फे संकल्प नावाचं त्रै मासिक सुरू करण्यात आलं होतं. त्रैमासिकाचा विशेषांक २६ जानेवारी १९८६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. शिवसेनाप्रमुख प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला होता. अजित नाडकर्णी कट्टर शिवसैनिक आणि त्यातही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम कार्यकर्ते आणि त्यांचे लाडके शिवसैनिक होते.

शिवसेनाप्रमुखांच्या विश्वासातले डोंबिवलीतले एक ज्येष्ठ, निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. डोंबिवलीत झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा बाळासाहेब ठाकरे आवर्जून उल्लेख करत असत. पुढच्या काळात पक्षीय पातळीवर पदाधिकारी म्हणून नसल्या तरी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी नाडकर्णी यांच्यावर सोपविल्या होत्या. शिवसेनेच्या शैक्षणिक विभागाचं काम ते करत होते. डोंबिवलीतल्या सावरकर बालवाचनालयाच्या उपक्रमातूनच पुढे त्यांची शिवसेनेच्या शैक्षणिक विभागाकरिता निवड झाली होती. संकल्प त्रैमासिकाच्या निमित्तानं जो विशेषांक प्रसिद्ध झाला होता, त्याकरिता शिवसेनाप्रमुखांची मुलाखत घेण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. नाडकर्णी यांच्या अक्षरशः एका शब्दावर तेव्हा बाळासाहेबांची त्यांच्या मातोश्री या कलानगरमधल्या निवासस्थानी मुलाखत घेण्याची संधी मला तेव्हा मिळाली होती. ही मुलाखत संकल्प त्रैमासिकात प्रसिद्ध झालीच, पण तेव्हा मी काम करत असलेल्या मुंबई सकाळमध्येही त्यातला संक्षिप्त भाग तेव्हा प्रसिद्ध झाला होता.

विजय प्रधान हे संकल्प त्रैमासिकाचे संपादक होते. पोलिओमुळे त्यांना विशिष्ट प्रकारचं अपंगत्व प्राप्त झालं होतं. पण त्यांना प्रचंड वेगळ्या कल्पना सुचत. वाचनालयाच्या माध्यमातून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी जी मंडळी धडपडत होती, त्यामध्ये अजित नाडकर्णी प्रमुख होते. वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्याची कामगिरीही नाडकर्णी यांनी या वाचनालयाच्या माध्यमातून पार पाडली. दहावीसाठी व्याख्यानमाला हा त्यातलाच एक उपक्रम होता. शिवसेनाप्रमुखांचा २३ जानेवारी हा वाढदिवस आणि १९ जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन हे दोन्ही दिवस तेव्हा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात प्रचंड गर्दीत साजरे होत असत. या दोन्ही कार्यक्रमांत विजय प्रधान आणि त्यांच्या मित्रमंडळींसह अजित नाडकर्णी यांच्या पुढाकारानं डोंबिवलीतले शिवसैनिक आवर्जून सहभागी होत असत. अपंग असूनही प्रधान यांना लोकलमधून कार्यक्रमांना घेऊन जाणं आणि सुखरूप पुन्हा घरापर्यंत पोहोचवणं याची सर्वांत मोठी जबाबदारी नाडकर्णी सांभाळत असत. हे कार्यक्रम मीही त्यांच्या बरोबरीने तेव्हा अनुभवले आहेत.

नंतरच्या काळात नाडकर्णी यांनी इंटीरियर डेकोरेशनचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला ते रंगकाम करत असत. पक्षीय राजकारणात ते आले तो काळ मात्र मी अनुभवला नाही. कारण तेव्हा मी रत्नागिरीला आलो होतो. पण अधूनमधून त्यांचा संपर्क येत होता. पत्नी ऐश्वर्या यांनी तबलापटू म्हणून मिळविलेलं यश, मुलगा नितीशचं वैद्यकीय शिक्षण आणि त्यातली प्रगती अशा कौटुंबिक बाबीही ते सांगत असत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ ते २००० या कालावधीत ते नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती होते. ते करत असलेल्या कामाची माहितीही मिळत होती. कल्याणच्या पत्री पुलाजवळ नवी जोड पूल उभारणीचा प्रस्ताव आणि ते काम नाडकर्णी यांच्या कारकिर्दीत पूर्ण झालं. अलीकडेच तो जुना पत्री पूल पाडण्यात आला आहे. तेव्हा नाडकर्णींच्या पुढाकारानं नवा पूल उभारला गेला नसता, तर आज ते काम खूपच कठीण झालं असतं. डोंबिवलीतल्या बालभवन उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. शहरातली काही विकासकामं मार्गी लावण्यात त्यांचं महत्त्वाच योगदान होतं. सुधीर जोशी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समितीचं कामही नाडकर्णी करत असत. याशिवाय डोंबिवलीतल्या अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध होता. विशेष म्हणजे ते रंगमंचावर कधीही दिसत नसत. कार्यकर्त्यांच्या आणि कामाच्या मागे उभं राहणं अशीच त्यांच्या सामाजिक कामाची पद्धत होती. खुद्द शिवसेनाप्रमुखांशी थेट संबंध असल्यानं कोणतंही पद ते सहज मिळवू शकले असते. पण पडद्यावर राहण्यापेक्षा पडद्यामागे राहणंच त्यांना पसंत होतं.

रत्नागिरीत डॉक्टर संजय लोटलीकर यांच्या रामनाथ हॉस्पिटलचं बांधकाम आणि नूतनीकरणाचं काम नाडकर्णी यांच्या देखरेखीखालीच पार पडलं. त्यानंतर रुग्णालयाचं व्यवस्थापनही नाडकर्णी सांभाळत असत. त्यानिमित्तानं त्यांच्या रत्नागिरीत फेऱ्या होत असत. त्यामुळे अलीकडच्या काळात त्यांच्याशी संपर्क वाढला होता, पण पक्षीय राजकारणापासून मात्र ते अलग झाले होते. तरीही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना याबाबतीत ते अत्यंत एकनिष्ठ होते. अनौपचारिक चर्चेमध्येही ते नेहमीच उद्धव ठाकरे यांची बाजू घेत असत. शिवसेनाप्रमुखांचे ते खरे वारसदार आहेत आणि आम्ही त्यांचे अनुयायी आहोत, असं ते आवर्जून सांगत असत. खऱ्या अर्थाने ते शिवसेनेचे हाडाचे कार्यकर्ते होते.

रत्नागिरीत त्यांचा वावर वाढल्यानंतर काही रुग्णांना त्यांच्याकडे मी पाठवलं होतं. त्या प्रत्येकाची सर्व ती व्यवस्था ते सांभाळत असत आणि रुग्णाच्या प्रगतीची किंवा अधोगतीची माहिती ते फोनवरून आवर्जून देत. शासनाच्या योजनांचा लाभ त्या रुग्णाला होणार असेल, तर त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं पूर्ण करून घेण्यासाठीही ते कळवत असत. खऱ्या अर्थाने त्यांच्यातला कार्यकर्ता तेव्हा ते काम करवून घेत असे.

डॉक्टर संजय लोटलीकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमेय आमोणकर, खुद्द मुलगा नितीश असे हृदयरोगाशी संबंधित तज्ज्ञ अत्यंत जवळचे नातेवाईक असूनही हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं नाडकर्णी यांचं जागीच निधन झालं. त्यांच्यावर कोणतेच उपचार करण्याची संधी कुणालाही मिळाली नाही, हा खरोखरच दैवदुर्विलास म्हणावा लागेल. एक जवळचा सुहृद, मित्र गमावल्याचं दुःख विसरता येणार नाही.

अजित नाडकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

  • प्रमोद कोनकर

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply