राजीवभाई दीक्षित स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये

रत्नागिरी : राजीवभाई दीक्षित स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन नोव्हेंबरमध्ये होणार असून त्यात कोकणवासीयांनीही सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त येत्या ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आसू (ता. फलटण, जि. सातारा) येथे हे तेरावे साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये काव्य लेखन, निबंध लेखन, प्रकाशित पुस्तक, दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाणार आहे.

स्पर्धांचा तपशील असा – काव्य लेखन – राष्ट्रभक्तीपर काव्यलेखन करायचे आहे. कवितेचा कुठलाही प्रकार चालेल. कविता चार ते पाच चरणाची किंवा २० ओळींची असावी. दीर्घ कविता स्पर्धेसाठी घेतली जाणार नाही. कविता स्वलिखित असावी. तसे स्वसाक्षांकित पत्र जोडावे.

निबंध लेखन : ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर निबंध असावा. शब्दमर्यादा नाही. निबंध कागदाच्या एकाच बाजूला लिहावा. त्यात आपले आपल्या देशाबद्दलचे विचार, देश कसा असावा, त्यासाठी मी काय करेन यावर विचार मांडावेत. मागील इतिहास अभिप्रेत नाही. फक्त आपले विचार मांडावेत.

प्रकाशित पुस्तक : आपले नुकतेच प्रकाशित पुस्तक स्पर्धेसाठी पाठवू शकता. त्यात सर्व प्रकारचे साहित्य चालेल. प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात.

दिवाळी अंक स्पर्धा : यावर्षीचे दिवाळी अंक स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जातील.

साहित्य पाठवण्याचा पत्ता असा : प्रकाश दिनकर सकुंडे (सचिव, श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान) आसू, ता. फलटण, जि. सातारा. ४१५५२३ (संपर्क क्रमांक ९८८१०३७४९१). आपले साहित्य फक्त पोस्टाने पाठवावे. कुरियर सेवा उपलब्ध नाही. व्हॉट्स अॅपवर पाठवलेले साहित्य स्पर्धेसाठी घेतले जाणार नाही. साहित्यासोबत दोन ओळखपत्र आकाराची छायाचित्रे पाठवावीत. सहभागासाठी स्वःहस्ताक्षरातील अर्ज असावा.

प्रत्येक विभागातील तीनस्पर्धकांना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२२ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि वृक्षाचे रोप असे असेल.

कार्यक्रम ३० नोव्हेंबर २०२३ रोजी आसू येथे दोन सत्रात होईल. प्रथम सत्रात राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित जयंती- पुण्यतिथी, त्यानंतर पुरस्कार वितरण होईल. दुसर्‍या सत्रात सर्व कवींचे खुले काव्यसंमेलन होईल. त्यासाठी आवडीची एक रचना सादर करता येईल. साहित्य ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत पोहोचेल, अशा बेताने पाठवावे. स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे सहभाग शुल्क नाही. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply