वानर-माकडांच्या त्रासाविरोधातील अविनाश काळे यांचे उपोषण मागे

रत्नागिरी : वानर, माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होण्याकरिता शेतकरी अविनाश काळे यांनी सुरू केलेले उपोषण पालकमंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर स्थगित केले आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार परदेश ते दौऱ्यावरून आल्यानंतर २० ऑक्टोबरपूर्वी त्यांच्यासमवेत रत्नागिरीतील शेतकऱ्यांची बैठक घेऊ. वानर, माकडांचा त्रास होत असल्याची समस्या मी शेतकऱ्यांच्या वतीने मांडेन आणि त्यावर तोडगा काढू या. हा धोरणात्मक निर्णय असल्याने वनमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

अविनाश काळे यांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. मात्र मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आज दुपारी साडेबारा वाजता त्यांनी उपोषण स्थगित केले.

वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. या प्रश्नासाठी गेल्या वर्षी काळे यांनी एक दिवसाचे उपोषण केले होते. तसेच रत्नागिरीत बैठक घेतली होती. अधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांनाही निवेदने दिली होती. यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. परंतु आता वनमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर पुढील भूमिका ठरवू. अन्यथा उपोषण पुन्हा सुरू करू, असे काळे यांनी यावेळी जाहीर केले.

दरम्यान, काल दिवसभरात सुमारे पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. आजही सकाळपासून सुमारे दोनशे शेतकरी जमले होते. सांगलीतील शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांनीही खास उपस्थित राहून श्री. काळे यांना पाठिंबा जाहीर केला होता.

आज पालकमंत्र्यांशी बोलताना श्री. काळे यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशमध्ये वन्य प्राणी नीलगाईंचा त्रास होत असल्याने सरकारने अध्यादेश काढला. बिहारमध्येही माकडांमुळे त्रास होत असल्याने त्यांना सरकार मारत आहे. महाराष्ट्रातही अशा प्रकारे कायदा करण्यात यावा. यापूर्वी निवेदने देऊनही त्याला उत्तरसुद्धा देण्यात आले नाही.

पत्रकारांशी बोलताना अविनाश काळे यांनी सांगितले की, मी कालपासून उपोषण सुरू केले होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी विनंती केली, हा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न बरोबर आहे, मी पाठीशी आहे, हा धोरणात्मक आहे, वनमंत्री परदेश दौऱ्यावर असल्याने निर्णय होऊ शकत नाही. येत्या २० तारखेच्या आत आपण त्यांच्यासमवेत बैठक घेऊन तोडगा काढू. ते आमची बाजू मांडणार आहेत. उपोषण स्थगित करा. मंत्री महोदयांनी आश्वस्त केल्यामुळे मी उपोषण स्थगित करत आहे. वनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पालकमंत्री सामंत आमच्यासमवेत असतील आणि ते शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगतील. यातून तोडगा निघावा. तोडगा न निघाल्यास पुन्हा उपोषण करू.

उपोषणादरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उदय बने, आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश साळवी, सहकारतज्ज्ञ अॅड. दीपक पटवर्धन आले होते. त्यांच्याशिवाय विविध संघटनांनी श्री. काळे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून तशी पत्रे त्यांनी श्री. काळे यांना दिली आहेत. वानर आणि माकडे हा कोकणातील शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न असून तो सोडविण्यासाठी आवश्यक तेथे आंदोलनात सहभागी होण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply