रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतिशिल्पाचे उद्घाटन सात ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झाले. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या टागोरांच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवन समृद्ध होईल आणि त्यांच्या भित्तिचित्राचे स्मृतिशिल्प प्रेरक ठरेल, असे ते म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला व्हायला हवे, असं सांगून त्याबाबत उच्च न्यायालय सकारात्मक विचार करील, असेही ते म्हणाले. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनायक जोशी, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष विवेक घाटगे, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य संग्राम देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
न्यायमूर्ती गवई म्हणाले, ‘गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे आयसीएस असणारे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे रत्नांची खाण असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा न्यायाधीश होते. या कालावधीत गुरुदेव टागोरांनी या ठिकाणी काव्यलेखन केले. आठव्या वर्षी त्यांनी कविता करायला सुरुवात केली. सोळाव्या वर्षी त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. कविमनाच्या टागोरांनी शेक्सपिअरच्या साहित्याचे अध्ययन केले. मुक्त शिक्षणाची संकल्पना आणून शांतीनिकेतन सुरू केले.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना समितीसमोरील भाषणे वाचली, तर देशाची घटना काय आहे, याची कल्पना येईल. बाबासाहेबांची या देशाकरिता, नागरिकांकरिता काय तळमळ होती, हे या भाषणांतून दिसून येते. सर्वसामान्य जनतेला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळायला हवा, हे त्यांचे ब्रीद होते,’ असेही ते म्हणाले.
‘हार्बर लिंकमुळे पुण्याचा माणूस मुंबईला दोन तासांत जाऊ शकतो. परंतु, चंदगडसारख्या टोकाच्या तालुक्यातील, तसेच कर्नाटक सीमेवरील गावांतील व्यक्तींना मुंबईला इतका प्रवास करून जाणे अत्यंत खर्चिक आहे. हा वेळ आणि खर्च वाचविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हायला हवे. त्याबाबत उच्च न्यायालय सकारात्मक विचार करील,’ असेही न्या. गवई म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय म्हणाले, ‘आजचा सोहळा ऐतिहासिक आहे. कोकण ही पवित्र भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांची ही भूमी वीर सावरकरांची आठवण करून देणारी आहे. देशाचे आयकॉन असणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले. आपल्या देशाचे आणि बांग्लादेशाचे राष्ट्रगीत त्यांनी लिहीले. ‘विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर, ही माझी प्रार्थना नाही, विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये, एवढीच माझी इच्छा,’ अशी प्रार्थना गुरुदेवांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचलं तर चांगले आणि चांगले काम कसे करावे, हे शिकायला मिळते.’
उद्योगमंत्री सामंत म्हणाले, ‘रत्नागिरीकरांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. मंडणगड येथील कामकाजाला आणि इथल्या कार्याला निधी देण्याचे भाग्य मला मिळाले, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. न्यायव्यवस्था नम्र असते, हे देशाच्या न्यायव्यवस्थेने दाखवून दिले आहे. बार कौन्सिलसाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी शासनस्तरावर निश्चित प्रयत्न केला जाईल.’
बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे हे शिल्प सदैव प्रेरणा देत राहील, असे विचार पालक न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी व्यक्त केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. जोशी यांनी स्वागत व प्रास्ताविक करून पार्श्वभूमी सांगितली. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष श्री. घाटगे, सदस्य श्री. देसाई, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिलीप धारिया यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक आर. एन .जोशी, माजी न्यायमूर्ती पी. आर. बोरा, प्रबंधक निरीक्षक ए. डी. बिले, माजी न्यायाधीश एम. डी. केसरकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार आदींसह अनेक वकील उपस्थित होते.
स्मृतिशिल्पाची पार्श्वभूमी
‘युनेस्को’ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अलीकडेच समाविष्ट केलेले शांतिनिकेतन ज्यांनी उभारले, तसेच भारत आणि बांगलादेश या दोन देशांच्या राष्ट्रगीतांची रचना ज्यांनी केली, ते महान व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. नोबेलविजेत्या ‘गीतांजली’सह जगाला भुरळ पाडणाऱ्या अनेक साहित्यरचना केलेल्या टागोरांचे रत्नागिरीशीही नाते आहे. रवींद्रनाथांचे ज्येष्ठ बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे ब्रिटिश काळातल्या भारतीय नागरी सेवेत अधिकारी (आयसीएस) झालेले पहिले भारतीय होते. ते कवी, बहुभाषाकोविद आणि समाजसुधारकही होते. लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ आणि संत तुकारामांचे अभंग यांचा बंगाली अनुवाद सत्येंद्रनाथांनी केला होता. ते १८८६-८७ या कालावधीत रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश होते. त्या वेळी रवींद्रनाथ त्यांच्याकडे काही काळ वास्तव्याला आले होते.
जिल्हा न्यायाधीशांच्या बंगल्याच्या आवारात उभारलेल्या जांभ्या दगडांच्या बाकांवरून समोर दिसणारे अरबी समुद्राचे सुंदर दृश्य नजरेत साठवत रवींद्रनाथांनी अनेक काव्यरचना केल्या. जिल्हा न्यायालयाच्या संदर्भसाहित्यात त्याचा उल्लेख आढळतो. त्या रचना नेमक्या कोणत्या याबद्दलची माहिती नसली, तरी जगविख्यात कवीच्या सर्जनशील आविष्कारात इथली भूमीही साक्षीदार असल्याची भावना रत्नागिरीकरांसाठी अभिमानास्पद आहे.
टागोर यांच्या साहित्याचे अभ्यासक असलेले पुखराज बोरा यांची २००९ साली रत्नागिरीचे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. टागोरांच्या इथल्या वास्तव्याबद्दल माहिती मिळताच त्यांनी त्यांचे उचित स्मारक उभारण्याची संकल्पना जिल्हा वकील संघासमोर मांडली. जिल्हा वकील संघासह न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी त्या संकल्पनेला सक्रिय पाठिंबा दिला. ती संकल्पना आता प्रत्यक्षात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मार्गदर्शन आणि राज्य शासनाच्या मुख्य आर्थिक सहभागातून हे स्मृतिशिल्प साकारले आहे. ‘गीतांजली’मधली न्यायालयीन परिसराला अनुरूप ठरेल अशी प्रार्थनेच्या आशयाची एक बंगाली कविता आणि तिचा मराठी अनुवाद, तसेच रवींद्रनाथांची प्रतिमा या स्मृतिशिल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. कोल्हापूरचे मूर्तिकार किशोर पुरेकर यांनी आर्किटेक्ट राहुल देसाई यांच्या मदतीने हे ब्राँझ शिल्प साकारले आहे. हे शिल्प म्हणजे टागोरांच्या स्मृतींना वंदन तर आहेच; पण इथल्या भूमीतल्या लेखक-कवींना ते नक्कीच मोठी प्रेरणा देणारे ठरेल. तसेच, त्या माध्यमातून पूर्व आणि पश्चिम भारताचे सांस्कृतिक बंध दृढ होण्यास मदत होणार आहे.

