सह्याद्री रँडोनिअर्सच्या रायडर्सचे घवघवीत यश

रत्नागिरी : सह्याद्री रँडोनिअर्स या रत्नागिरी जिल्ह्यातील क्लबच्या अमित कवितके (रत्नागिरी) यांनी एकाच वर्षात तीन वेळा सुपर रँडोनिअर्स, तर अहमद अली शेख (चिपळूण) यांनी एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्स हे मानांकन मिळवून सह्याद्री रँडोनिअर्सची कीर्ती भारतभर पसरवली आहे. असे यश मिळवणारे हे दोघेही कोकणातील पहिले रायडर्स आहेत. त्यामुळे क्लबतर्फे, तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांकडून या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सशी संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स या रत्नागिरी जिल्ह्यातील क्लबच्या माध्यमातून दीर्घ पल्ल्याच्या अंतराच्या बीआरएमचे आयोजन करण्यात येते. क्लबच्या स्थापनेपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातील व नजीकच्या जिल्ह्यातील रायडर्सनी प्रत्येक बीआरएममध्ये आपला सहभाग नोंदवला आहे.

कोकणातील विषम हवामान, चढ-उतारांचे रस्ते यांवर मात करत आजपर्यंत सह्याद्री रँडोनिअर्सचे चौदा रायडर्स सुपर रँडोनिअर्स या मानांकनाने सन्मानित झाले आहेत. २०० (१३.५ तास), ३०० (२० तास), ४०० (२७ तास), ६०० (४० तास) किलोमीटर्सच्या राइड्स नेमून दिलेल्या वेळेत पूर्ण कराव्या लागतात. या सर्व राइड्स एकाच सीझनमध्ये पूर्ण करणाऱ्या रायडरला सुपर रँडोनिअर (SR) म्हणून सन्मानित केलं जातं. सह्याद्री रँडोनिअर्सच्या अमित कवितके (रत्नागिरी) यांनी एकाच वर्षात तीन वेळा सुपर रँडोनिअर्स, तर अहमद अली शेख (चिपळूण) यांनी एकाच वर्षात दोन वेळा सुपर रँडोनिअर्स हे मानांकन मिळवले आहे. असे यश मिळवणारे हे दोघेही कोकणातील पहिले रायडर्स आहेत.
या दोघांसह अन्य सर्व रायडर्सनी सह्याद्री रँडोनिअर्सच्या आयोजकांवर दाखवलेल्या विश्वासामुळे सर्वाधिक सुपर रँडोनिअर्सच्या क्रमवारीमधे सह्याद्री रँडोनिअर्स क्लब भारतात दहाव्या स्थानावर येऊन पोहोचला आहे.

नागपूर-अमरावती-नागपूर-चंद्रपूर-नागपूर-जबलपूर-नागपूर अशी १२०० किलोमीटर्सची LRM पूर्ण करणारे अहमद शेख कोकणातील पहिले रँडोनिअर बनले आहेत. हे बाराशे किलोमीटर्स अंतर कापण्यासाठी ९० तासांचा अवधी दिला होता; मात्र शेख यांनी हे अंतर ९० तासांच्या आत कापून विक्रम घडवला आहे. या दोघांबरोबर कोकणातील पहिली महिला सुपर रँडोनिअर बनण्याचा मान मिळविणाऱ्या सौ. धनश्री गोखले यादेखील याच क्लबच्या रायडर आहेत.

सह्याद्री रँडोनिअर्ससाठी या सर्व रायडर्सचे योगदान अमूल्य असून, त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात किमान शंभर रायडर्स सुपर रँडोनिअर्स होतील असा विश्वास सह्याद्री रँडोनिअर्सचे संस्थापक मनोज भाटवडेकर आणि श्रीनिवास गोखले यांनी व्यक्त केला आहे. नोव्हेंबर २०२३पासून बीआरएमचा नवीन सीझन सुरू होत आहे. ऑक्टोबर २०२४पर्यंतचे इव्हेंट कॅलेंडर लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या सर्व इव्हेंटमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त रायडर्सनी सहभागी व्हावे असे आवाहन सह्याद्री रँडोनिअर्सतर्फे करण्यात येत आहे. महिलांचा सहभाग वाढावा यासाठी विशेष सवलत योजनादेखील जाहीर करण्यात येईल, असे क्लबतर्फे नमूद करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply