कोकणाची स्मृतिचित्रे

पालघरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या कोकणाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. ऐतिहासिक गडकिल्ले, डोंगरदऱ्या, भुयारे, लाकूड तसेच विविध धातूंपासून बनविलेली उपकरणे, ती तयार करण्यासाठी वापरली जाणारी अवजारे आणि हत्यारे, त्यापासून तयार करण्यात आलेली पुरातन मंदिरांमधील कलाकुसर, अनेक घरगुती उपकरणे, शिवाय अलीकडेच प्रकाशात आलेल्या दहा ते वीस हजार वर्षांपूर्वीच्या कातळखोद शिल्पांपर्यंत किती तरी प्रकारचा समृद्ध वारसा कोकणाला लाभलेला आहे. अत्यंत श्रद्धावान, कष्टाळू आणि समाधानी अशा कोकणी माणसाने आतापर्यंत हा वारसा जपून ठेवला आहे, आपल्या परीने तो वाढवलाही आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी ‘आठवणीतलं कोकण’ असा विषय या वर्षीच्या ‘कोकण मीडिया’च्या दीपोत्सव विशेषांकासाठी निवडण्यात आला आहे.

कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण, विविध प्रकल्प इत्यादी अनेक विकासकामांमुळे कोकणाच्या मूळ स्वरूपात भरपूर फरक पडला आहे. कोकणाची दुर्गमता तर केव्हाच पुसली गेली आहे. यापुढील काळातही हा बदल होतच राहणार आहेत. काळानुरूप अनेक बदल होत असतात. ते अपरिहार्यही असतात. तरीही प्रत्येकाने लहानपणी, तरुणपणी अनुभवलेल्या अनेक घटना, घडामोडी लक्षात राहण्यासारख्या असतात. त्यातून मिळालेला संदेश बोधप्रद असतो. अनेक घटनांमधून आता कालबाह्य ठरलेल्या प्रथांच्या आठवणींना उजाळा मिळतो. कदाचित पुढच्या काळात त्याच वस्तू, गोष्टी नव्याने प्रचलित होण्याची शक्यता असते. पूर्वी सायकल हे प्रवासाचे प्रमुख साधन होते. नंतर स्वयंचलित आणि वेगवान वाहनांचा वापर सुरू झाला. तो सार्वत्रिक झाला. सायकल घरी असली, तरी श्रीमंती मानली जात असे, असाही एक काळ होता. आता चौघांचेच कुटुंब असलेल्या एकाच घरात चारपेक्षा अधिक वाहने वापरली जात आहेत. कालांतराने अशी वाहने सातत्याने वापरल्याने निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधीमुळे पुन्हा एकदा सायकलीला चांगले दिवस आले आहेत. घरी सायकल असणे आणि ती वापरणे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. घरे, घरांमधील चुली, रस्ते, पाण्याची साधने अशा अनेक बाबतीत कमालीचे बदल झाले आहेत. हे आणि असे अनेक बदल सातत्याने घडत असतात. ते लक्षात घेता आता सध्या दिसत असलेले आणि अगदी जवळच्या आठवणीतील कोकण शब्दबद्ध व्हावे, हा या वर्षीच्या कोकण मीडियाच्या दीपोत्सव विशेषांकाचा हेतू होता. त्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मूळचे कोकणवासी आणि आता मोठ्या शहरांमध्ये स्थायिक झालेल्या चाकरमान्यांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. त्यातून कोकणाविषयीची अनेक स्मृतिचित्रे साकारली आहेत. त्यातून अनेकांना स्मरणरंजनाचा आनंद तर मिळेलच, पण नव्या पिढीलाही कोकणाविषयीची अधिक माहिती मिळू शकेल. अजूनही अस्पर्शित असलेल्या कोकणाचा शोध घ्यायला ती प्रवृत्त होईल. त्यातून आणखी भरपूर माहितीही उजेडात येऊ शकेल.

या विशेषांकाबरोबरच ‘कोकण मीडिया’ने आठव्या वर्षात पदार्पण केले आहे. ‘कोकण मीडिया’चा हा आठवा दिवाळी अंक वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. त्याचे कारण म्हणजे कोकणवासीयांनी जपलेल्या कोकणाविषयीच्या आठवणी त्या निमित्ताने संकलित करता आल्या. कोकणाविषयीची ही माहिती लिहिणारे स्मृतिवाहक, ती माहिती संकलित करून अंक प्रकाशित करण्यासाठी साह्यभूत ठरलेले जाहिरातदार, माहिती वाचणारे वाचक, अंकाचे वितरक या सान्यासह सर्वांनाच दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १० नोव्हेंबर २०२३)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

बुकगंगा, गुगल प्ले बुक्स, तसेच मॅग्झटरवर दिवाळी अंक ई-बुक स्वरूपात उपलब्ध आहे.

बुकगंगा : https://www.bookganga.com/R/8TAUO

गुगल प्ले बुक्स : https://play.google.com/store/books/details?id=eX7gEAAAQBAJ

मॅग्झटर : https://www.magzter.com/IN/Kokan-Media-Consultancy–Services/Kokan-Media-/News/1492183

तसेच, बुकगंगावरून अंक घरपोचही मागवता येऊ शकतो.

कोकण मीडिया दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मान्यवर
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply