रत्नागिरीतील कीर्तनसंध्यामध्ये जानेवारीत “आले रामराज्य”

रत्नागिरी : येत्या १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात ययेणार असलेल्या कीर्तनसंध्या महोत्सवात श्रोत्यांना अयोध्याधीश प्रभू श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र अनुभवायला मिळणार आहे.

रत्नागिरीत २०१२ सालापासून चालू असलेल्या कीर्तनसंध्येत आजवर कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजीमहाराजांपासून सर्जिकल स्ट्राइकपर्यंतचा भारतीय इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. यावर्षी त्याहूनही ऐतिहासिक आणि भारतीयांचा मानबिंदू असलेल्या रामजन्मभूमीच्या मुक्ततेचा विषय हाताळण्यात येणार आहे. मुगल साम्राज्याने भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली अयोध्येची रामजन्मभूमी भारतीयांपासून जणू हिरावून घेतली होती. त्यामुळे पाचशे वर्षांहून अधिक काळ भारतात नकारात्मक शक्तीची भावना खोलवर रुजली होती. ती नष्ट करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू होते. त्याला यश आले असून पुन्हा एकदा संपूर्ण भारतदेशालाच नाही, तर जगाला अभिमान वाटेल असे भव्यदिव्य राम मंदिर अयोध्येत उभे राहत आहे. त्यामुळे देशभरात विविध प्रसंगांमधून आनंद व्यक्त होत आहे.

याच मंगल घटनेचे औचित्य साधून रत्नागिरीतील कीर्तनसंध्या परिवाराने रत्नागिरीत जानेवारीत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्यावाचस्पती राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळे बुवा यांच्या अभ्यासपूर्ण रामकथेचे आयोजन केले आहे. आफळे बुवांच्या सुमधुर आवाजातील कीर्तनातील रामकथा, बरोबरीने पुण्यातील मंचातर्फे गीतरामायणातील निवडक गाणी ऐकण्याचा सुवर्णयोग ही या रामकथेच्या निमित्ताने रत्नागिरीकरांना अनुभवायला मिळणार आहे. आठवडाबाजार रत्नागिरी येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलाच्या भव्य जागेत “आले रामराज्य अर्थात राम मंदिर ते राष्ट्र मंदिर” (अपरिचित रामायण, राम मंदिर संक्षिप्त इतिहास) या विषयावरील कीर्तनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. दि. १० ते १४ जानेवारी २०२४ असे सलग पाच दिवस रोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ही कीर्तनसंध्या होणार आहे.

कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत असताना समाजात विविध क्षेत्रात काम करत असलेल्या मान्यवरांचा सत्कारही कीर्तनसंध्याच्या व्यासपीठावरून केला आहे. नगर परिषदेतील सफाई कामगार, गणपतीपुळे येथील जीवरक्षक, मतिमंदांची आशादीप संस्था नेटाने चालविणारे दिलीप रेडकर, झाशीच्या राणीचे वंशज नेवाळकर, कीर्तन परंपरेतील सर्वोच्च व्यक्तिमत्त्व हभप दत्तदासबुवा घाग, हभप ढोल्ये बुवा, गोरक्षक मुकेश गुंदेचा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे वंशज सात्यकी सावरकर, निवृत्त सेनाधिकारी राजेंद्र निंभोरकर, सौ. निंभोरकर,निवृत्त पोलीस राजेंद्र भोसले, महिला वृद्धाश्रम चालवणाऱ्या गायत्री फडके, सामाजिक कार्य करणाऱ्या आफळे बुवांच्या पत्नी सौ. शुभांगी आफळे, रत्नागिरीतील माजी सैनिक समूह अशा अनेकांचा सन्मान कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आला. आपले आगळेपण जपणाऱ्या कीर्तनसंध्या परिवारातर्फे आत्तापर्यंत सहा सामाजिक, तीन सांस्कृतिक, तीन विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार केला आहे.

दरवर्षीप्रमाणेच भव्य दिव्य रंगमंचावर अनोख्या स्वरूपात यावर्षी कीर्तनसंध्या येत आहे, भारतीय बैठक मोफत असेल, तर खुर्चीसाठी देणगी सन्मानिका उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी (9011662220) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply