मराठी दिवाळी अंक यावर्षी पोहोचणार इंदूर आणि अमेरिकेत

मुंबई : वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दिवाळी अंक हा मराठी भाषेचा, परंपरेचा ठेवा संस्थेच्या वतीने बृहन्महाराष्ट्रात इंदूर येथे आणि परदेशात अमेरिकेत लॉस एन्जेलिस येथे सातासमुद्रापार पोहोचविला जाणार आहे.

दिवाळी अंक हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित आहे. दिवाळीतील फराळ, फटाके दोन दिवसांत संपतात. अंकांच्या निमित्ताने दिवाळीची आठवण वर्षभर ताजी राहते. आजच्या काळाचे प्रतिबिंब त्यामध्ये पडलेले असते. आशाआकांक्षा, साद-पडसाद व ध्येय-स्वप्ने यांची अपेक्षापूर्ती करण्याचे वार्षिक काम उत्सवी स्वरूपात दिवाळी अंकांच्या माध्यमातून पहिल्या मनोरंजन दिवाळी अंकापासून होत आले आहे. दिवाळी अंक सर्वसामान्य वाचकांना चौकस आणि बहुश्रुत करीत असतात. त्याचप्रमाणे सुजाण रसिकजनांची अभिरुची संपन्न करीत असतात. मराठी भाषेची ११४ वर्षांची ही वैभवशाली “दिवाळी अंक” परंपरा मुंबईतील मराठी वृत्तपत्र लेखक संघ स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून गेली ४८ वर्षे निरंतर जोपासत आली आहे.

मध्य प्रांतातील मराठ्यांचे राज्य असलेल्या माळवा प्रांतात इंदूर येथील १०९ वर्षांची म्हणजे १९१५ मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र साहित्य सभा इंदूर, ग्वाल्हेर, देवास येथील मराठी प्रेमींसाठी दिवाळी अंकांचे प्रदर्शन आयोजित करणार आहे. या उपक्रमात अमेरिकेतील लॉस एन्जेलिस येथे एमसीएफ फाउंडेशन – मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल marathicultureandfestivals.com ही संस्था पारितोषिके घोषित करून सहभागी होत आहे. एमसीएफच्या वतीने मुंबई आणि इंदूरमधील दोन्ही कार्यक्रम त्यांच्या संपर्कात असलेल्या परदेशातील हजारो मराठी भाषिकांपर्यंत पॉडकास्टद्वारे पोहोचविणार आहे.

वृत्तपत्र लेखक संघातर्फे १९७६ पासून दिवाळी अंक स्पर्धा विनामूल्य घेतली जाते. या मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय स्पर्धेसाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही अंक येत असतात. स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकांना – सर्वोत्कृष्ट अंकासाठी मनोरंजनकार का. र. मित्र स्मृती पुरस्कार, आवाजकार मधुकर पाटकर पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विनोदी अंक, साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट मुलांचा अंक, सर्वोत्कृष्ट धार्मिक अंक, मराठी विचारधारा प्रतिष्ठान पुरस्कृत वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित सर्वोत्कृष्ट अंक, कृष्णराव भानुसे स्मृती उत्कृष्ट ललित दिवाळी अंक, पास्कल लोबो पुरस्कृत गणेश केळकर स्मृती उत्कृष्ट अंक, मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल लॉस एंजेलिस पुरस्कृत सातत्याने प्रकाशित होणारा सर्वांत जुना दिवाळी अंक, मराठी कल्चरल अँड फेस्टिव्हल लॉस एंजेलिल्स पुरस्कृत सर्वोत्कृष्ट विशेषांक पुरस्कार, यासह उत्कृष्ट आणि उल्लेखनीय अंक म्हणून स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या अंकांचा पारितोषिक देऊन मराठी भाषा दिनी २७ फेब्रुवारी रोजी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येतो. निकालानंतर हे अंक ग्रामीण भागातील शाळा-वाचनालयांना मोफत दिले जातात. यावर्षी संपूर्ण १ संच इंदूर येथील मराठी भाषिकांसाठी देण्यात येणार आहे.

दिवाळी अंकांच्या संपादक-प्रकाशकांनी अंकाच्या दोन प्रती रवींद्र मालुसरे, अध्यक्ष-मराठी वृत्तपत्र लेखक संघ (मुंबई), घरकुल सोसायटी, रूम नं. ६१२, ६ वा मजला, सेंच्युरी बाजार लेन, भुस्सा इंडस्ट्रियल इस्टेटसमोर, प्रभादेवी, मुंबई – ४०० ०२५ (मोबाइल – ९३२३११७७०४) येथे पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक राजन देसाई (८७७९९८३३९०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply