मालगुंडकर परिवाराने साकारली जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती

रत्नागिरी : येथील प्रसिद्ध छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांच्या कुटुंबीयांनी दिवाळीनिमित्ताने मुरूड-जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे.

दिवाळी आणि किल्ला हे समीकरण होऊन गेले आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे दिव्य स्मरण होते. त्याच निमित्ताने मालगुंडकर यांच्या मुलांनी किल्ला साकारायचे ठरविले. त्यांनी किल्ला साकारायला घेतला तेव्हा लक्षात आले की शिक्षण फक्त कागदोपत्री उपयोगाचे नाही, तर दगडीमातीमध्ये हात मिसळून आपल्या मातीशी प्रेम करणे म्हणजे एक प्रकारे शिक्षण घेणे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचे मनात आणले, त्यावेळी प्रत्येक किल्ल्याची निर्मिती करताना त्यांना भंडारी समाजाचा मोठा हातभार लागला. महाराजांचे पहिले आरमार प्रमुख भंडारीच होते. आपल्या समाजाविषयी अभिमानास्पद ही गोष्ट श्री. मालगुंडकर यांनी मुलांना सांगितली. त्यानंतर जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचे ठरवले.

मुलांनी उत्साहाने किल्ला साकारण्याचे मनावर घेतले. अगदी तटबंदी, बुरूज आणि तोफा हे त्यांनी स्वतःच्या हाताने निर्माण केले. दगड, माती आणण्यापासून सर्व गोष्टी त्यांनी आवडीने केल्या. किल्ला बांधल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद एखादा गड जिंकल्यासारखा होता. किल्ला साकारायला सोसायटीतील मुलांनीही हातभार लावला.

रत्नागिरीत टिळक आळीतील सुरेश स्मृती अपार्टमेंटमध्ये हा किल्ला श्रावणी मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, सार्थक चव्हाण, यश मयेकर यांनी साकारला आहे. तो पाहण्याचे निमंत्रण मालगुंडकर कुटुंबीयांनी दिले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply