रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये भव्य, दिव्य असे श्रीराम मंदिर उभे झाले आहे. या मंदिरामध्ये येत्या २२ जानेवारी रोजी श्रीरामांची प्रतिष्ठापना आणि श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा होणार आहे. संपूर्ण देशात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. देशात ठिकठिकाणी आपापल्या परीने विविध कार्यक्रमांचे आयोजन विविध संस्था करीत आहेत. रत्नागिरीतही अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.
रत्नागिरीत गेली ९० वर्षे कार्यरत असलेल्या आणि दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फेही श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी, दि. २२ जानेवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम मंडळाच्या जोशी पाळंद येथील श्रीमंत बाजीराव पेशवे संकुल इमारतीतील सभागृहात होणार आहे.
त्या दिवशी सकाळी ८ वाजता श्रीराम प्रतिमा पूजन होणार असून त्यानंतर सकाळी ९ वाजेपर्यंत पवमान पंचसूक्ताचा जप, सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत “श्रीराम जयराम जय जय राम” या श्रीरामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप तसेच श्री रामरक्षा व श्री हनुमान स्तोत्राचे पठण केले जाणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भगिनी वर्गासाठी हळदीकुंकू व तिळगूळ समारंभ आयोजित केला आहे. सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत भावगंध निर्मित गीत रामायणातील निवडक गीतांचा कार्यक्रम चैतन्य पटवर्धन आणि त्यांचे सहकारी सादर करणार आहेत. यामध्ये मुख्य गायक अभिजित नांदगावकर आणि सौ. करुणा पटवर्धन असून इरा गोखले, स्वरा लाकडे, स्वरा लिंगायत सहगायक आहेत. हार्मोनियम साथ-चैतन्य पटवर्धन, तबला साथ- राजू धाक्रस, ताल वाद्य साथ – अद्वैत मोरे, राघव पटवर्धन करणार असून कार्यक्रमाचे भक्तिरसपूर्ण निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत.
सर्व श्रीराम भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने केले आहे.
Follow Kokan Media on Social Media

