कोकण मराठी साहित्य परिषदेचे शनिवारपासून जिल्हा साहित्य संमेलन

रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा मराठी साहित्य संमेलन ६ आणि ७ एप्रिलला मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकात आयोजित करण्यात आले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनुपमा उजगरे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन होणार असून, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कोमसापच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर आणि संमेलन संयोजन समितीचे प्रमुख रमेश कीर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

संमेलनात शनिवारी सकाळी साडेआठ वाजता माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येईल. सकाळी १० वाजता होणार असलेल्या उद्घाटन समारंभाला संस्थापक पद्मश्री मधुमंगेश कर्णिक, स्वागताध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, साहित्यिक-समीक्षक प्रा. सुरेश जोशी, मालगुंड सरपंच श्वेता खेऊर, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील मयेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

दुपारी साडेबारा वाजता पुस्तकं… सांगतात खूप काही या परिसंवादात प्रा. बाळासाहेब लबडे, जयू भाटकर, मदन हजेरी, जयश्री बर्वे सहभागी होतील. अध्यक्षस्थान साहित्यिक प्रा. सुरेश जोशी भूषवतील. दुपारी ३ वा. कविता पद्य पदन्यासात अमेय धोपटकर व सहकारी सादरीकरण करतील. सायंकाळी साडेचार वाजता युवक आणि समाजमाध्यमांवरील लेख या विषयावरील परिसंवादात माधव अंकलगे, अरुण मोर्ये, राजेश गोसावी, शाहीद खेरटकर, युयुत्सु आर्ते संवाद साधतील. अध्यक्षस्थानी गोविंद राठोड आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता नैर्ऋत्येकडील वारा या कविसंमेलनात प्रा. एल. बी. पाटील, सुधीर शेठ, प्रवीण दवणे, रुजारियो पिंटो, उषा परब, लता गुठे, आकांक्षा भुर्के व गझलकार देवीदास पाटील आणि त्यांचे सहकारी सहभागी होतील. त्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर भूषवणार असून, अरुण म्हात्रे संवादक आहेत. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलाकार सादर करणार आहेत. यात कोळीनृत्य, जाखडी, मंगळागौर, नमन, समई नृत्य, पोवाडा व इतर कार्यक्रम आहेत.

रविवारी, दि. ७ एप्रिलला सकाळी ९ वाजता बदलते कोकण या परिसंवादात पर्यटन व उद्योगावर रमेश कीर, सांस्कृतिक बदलांबाबत नितीन जोशी, शैक्षणिक क्षेत्राबाबत डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, पत्रकारितेवर पत्रकार सतीश कामत सहभागी होतील. ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर परिसंवादाचे संवादक आहेत. संमेलनाचे समारोप सायंकाळी साडेचार वाजता होईल.

रविवारी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी १ या वेळेत कवितेच्या गावा जावे कार्यक्रमात ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, एल. बी. पाटील, अनुपमा उजगरे कविता सादर करतील. बालसाहित्याच्या प्रांगणात हा दुपारी १ ते २ विशेष कार्यक्रम भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचे विद्यार्थी कथा, कविता, नाट्यछटा, गाणी, एकांकिका असे विविधांगी सादर करणार आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply