खेडशीच्या स्वरूपानंद वसाहत जि. प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

खेडशी (ता. जि. रत्नागिरी) : उन्हाळी सुट्टीनंतर आज, १५ जून रोजी राज्यातील शाळा पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावातील गयाळवाडी येथील स्वामी स्वरूपानंद वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

फुगे, तोरणे आणि माळांनी शाळा सजवण्यात आली होती. शाळेच्या जवळच्या परिसरात मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर औक्षण करून, फूल देऊन मुलांचे शाळेत स्वागत करण्यात आले. मुलांना लाडू देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले. अंगणवाडीतून पहिलीत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर नव्या शाळेत आल्याचा आनंद आणि उत्सुकता दिसत होती.

या वेळी मुख्याध्यापिका मनाली नाखरेकर, उपशिक्षिका मीना आखाडे आणि विषयतज्ज्ञ देवयानी पवार उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरणही या वेळी करण्यात आले.

या वेळी देवयानी पवार म्हणाल्या, ‘जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण तर मिळतेच; पण इथे मुलांना आपुलकी मिळते. शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या गोष्टींची उजळणी पालकांनीही करून घेणे गरजेचे आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून मुले उत्तम ज्ञान प्राप्त करतात.’

मुख्याध्यापिका मनाली नाखरेकर यांनी सांगितले, ‘केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला अभ्यास पूर्ण करणे एवढेच आमचे उद्दिष्ट नाही. मुलांना सक्षम बनवणे, व्यावहारिक ज्ञान देणे हा शिक्षणाचा उद्देश आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गुणवान विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो या संस्थांमध्ये अभ्याससहलीसाठी नेले जाते. त्यासाठी आपले मूल निवडले गेले पाहिजे, असे उद्दिष्ट ठेवायला हवे.’

उपशिक्षिका मीना आखाडे यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच आभार मानले. या वेळी पहिली ते चौथीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्य, अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती होती.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply