रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दिनांक १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी ही माहिती दिली. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे श्री. चवरे यांनी नमूद केले आहे.
एकविसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑक्टोबर २०२४ पासून विविध १० केंद्रांवर, तर बासष्टाव्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर पासून आयोजित करण्यात येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाइन सादर कराव्यात. विहित मुदतीनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशील भरला नसल्यास ऑनलाइन प्रवेशिका भरता येणार नाही.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरिता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल.
राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत आपला सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media

