रत्नागिरी : कोल्हापूर येथे आज, २२ सप्टेंबर रोजी झालेल्या कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित KSC लोहपुरुष ट्रायथलॉन आणि ड्युओथलॉन स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि टीम कोकण कोस्टल मॅरेथॉनमधील ९ जण सहभागी झाले आणि सर्वांनी आपल्या कामगिरीची छाप स्पर्धेवर पाडली.
ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन म्हणजे ६ तासात १.५ किमी पोहणे, ४० किमी सायकल चालवणे आणि १० किमी धावणे, तर हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉन म्हणजे १० तासात १ किमी पोहणे, ९० किमी सायकल चालवणे आणि २१ किमी धावणे अशी ही स्पर्धा असते. त्यामध्ये विनायक पावसकर, अमित कवितके आणि यतिन धुरत यांनी यशस्वीरीत्या हाफ आयर्नमॅन डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण केली. डॉ. नितीन सनगर, आरती दामले यांनी यशस्वीरीत्या ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण केली.
डॉ. राज कवडे यांनी ऑलिम्पिक डिस्टन्स ड्युऑथलॉनमध्ये अप्रतिम फिनिश केला. चंद्रशेखर शिंदे आणि श्रीलेश शिंदे यांनी स्प्रिंट ड्युऑथलॉनमध्ये सुंदर कामगिरी केली. मयूर देसाई यांनी ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन पूर्ण करण्याचा चांगला प्रयत्न केला.
कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरचे पेसिंग करण्याच्या निमित्ताने रेग्युलर रनिंग सुरू करणाऱ्या आरती दामले या रत्नागिरी जिल्ह्यामधून या स्पर्धेत सहभागी होऊन जिंकणाऱ्या पहिल्या महिला ट्रायथलिट ठरल्या आहेत. आरती दामले यांनी त्यांच्या वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून रत्नागिरीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला. आपल्या यशाबद्दल त्या म्हणाल्या की, सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून होणाऱ्या नियमित सायकल राइड, कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या नियमित प्रॅक्टिस रन यामुळे ट्रायथलॉन करण्याची प्रेरणा मिळाली. कधीही मी आयुष्यात धावेन असं वाटलं नव्हतं. पण कोकण कोस्टल मॅरेथॉन पूर्ण केल्यामुळे एक आत्मविश्वास मिळाला.
विनायक पावसकर यांनी याच महिन्यात सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशात पूर्ण केली होती. आज त्यांनी हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्यावर डॉ. नितीन सनगर यांचे विशेष आभार मानले. डॉ. नितीन यांनी स्वत: यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण करतानाच सहभागी स्पर्धकांची डाएट तसेच स्पर्धेआधीची मानसिक तयारीसुद्धा करून घेतली, असे श्री. पावसकर म्हणाले. चिपळूण येथील अहमदली शेख यांनीसुद्धा हाफ आयर्नमॅन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अप्रतिम पद्धतीने स्पर्धा पूर्ण केलीय.
गेल्या दोन वर्षांत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून शहर आणि आजूबाजूच्या परिसरात सायकलविषयक विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे सायकल संस्कृती वाढायला मदत झाली आहे. गेल्या वर्षीपासून त्याला कोकण कोस्टल मॅरेथॉनची जोड मिळाली आहे. कोकणवासीय या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून सायकलिंग आणि रनिंगकडे वळले असून आरोग्याच्या दृष्टीने सजग झाले आहेत.



कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

