रत्नागिरी : आपल्या बोटांच्या जादूने मनामनांवर अधिराज्य गाजवणारे संवादिनीगंधर्व अर्थात पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ २१ सप्टेंबरला रत्नागिरीत एका अनोख्या कार्यक्रमाने झाला. ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनिअम वादकांनी एकाच वेळी एकाच रंगमंचावर सादरीकरण करून गोविंदरावांना अनोखी आदरांजली वाहिली. सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात रंगमंच कलाकारांनी, तर सभागृह रसिकांनी ‘हाउसफुल’ झाले होते. (व्हिडिओ लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.)
पूर्वीच्या काळी केवळ एक साथीचे वाद्य म्हणून ओळख असलेल्या संवादिनीला पंडित गोविंदराव टेंबे यांनी मानाचे स्थान मिळवून दिले आणि पंडित गोविंदराव पटवर्धनांनी जादुई सादरीकरणातून संवादिनी घराघरात पोहोचवली. रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील अडूर या आपल्या आजोळी जन्मलेल्या पंडित गोविंदराव पटवर्धन यांनी संवादिनीवादनाचे कोणतेही रूढ शिक्षण घेतलेले नव्हते; मात्र त्यांनी जे करून दाखवले, ते अजरामर झाले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १० हजार नाटकांना ऑर्गनसाथ केली. त्यांनी पाच हजार मैफलींमध्ये अनेक दिग्गज गायकांना साथ केली आणि पेटी बोलू शकते याचा प्रत्यय रसिकांना दिला. गोविंदरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘शतायुषी गोविंदराव’ या संकल्पनेअंतर्गत वर्षभर विविध कार्यक्रम होणार असून, त्याची नांदी ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमाने झाली.
शतसंवादिनी या कार्यक्रमाची संकल्पना ठाण्यातील प्रसिद्ध हार्मोनिअमवादक अनंत जोशी यांची होती आणि संगीत दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. रत्नागिरीतील चैतन्यस्वर आणि सहयोग या संस्थांनी हा कार्यक्रम सादर केला. त्यात अनंत जोशी, चैतन्य पटवर्धन, विजय रानडे, संतोष आठवले, महेश दामले, हर्षल काटदरे, मंगेश मोरे, चंद्रशेखर बांबर्डेकर, श्रीधर पाटणकर हे नऊ गुरू आणि त्यांचे शिष्य अशा १००हून अधिक वादकांनी हार्मोनिअम सिंफनी सादर केली. त्यात रत्नागिरीतील वादकांची संख्या ७०हून अधिक होती आणि ठाण्यातील वादकांचाही सहभाग होता. पं. अजित कडकडे यांना अनेक वर्षे साथ केलेले ज्येष्ठ हार्मोनिअमवादक प्रकाश वगळ हेदेखील यात सहभागी झाले होते.
सिम्फनी ही मूळची पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतातील संकल्पना आहे; मात्र या कार्यक्रमात केरवा, भजनी, झपताल, तीनताल अशा अस्सल भारतीय संगीतातील तालांमध्ये ती सादर करण्यात आली. मुख्य वाद्य असलेल्या हार्मोनिअमवरच गिटार, व्हायब्रोफोन, व्हायोलीन अशा वाद्यांच्या अनुभूतीमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. शोभा गुर्टू यांचंही हे जन्मशताब्दी वर्ष असून, त्यांची प्रसिद्ध ठुमरीही यात सादर करण्यात आली. यात वादकांचे समूह आणि उपसमूह करण्यात आले होते आणि प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्याने कार्यक्रमाचे सादरीकरण उत्तम झाले. हार्मोनिअमवादक, साथसंगत करणारे कलाकार, निवेदक अशा सर्वांचे मिळून सुमारे ११८ माइक एकाच वेळी रंगमंचावर होते; मात्र उदयराज सावंत यांच्या उत्तम ध्वनिव्यवस्थेमुळे त्यात कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण न होता रसिकांना या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद घेता आला. आदित्य पानवलकर, प्रथमेश शहाणे, प्रणव दांडेकर, अद्वैत मोरे, शिवा पाटणकर यांनी हार्मोनिअमवादकांना साथसंगत केली.
या कार्यक्रमाविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अनंत जोशी म्हणाले, ‘गोविंदरावांसारखा वाद्याला पुढे नेणारा कलाकार शतकातून एखादाच होतो. त्यांनी हार्मोनिअमविषयी घराघरात जिव्हाळा निर्माण केला आणि शिकण्याची आवड निर्माण केली. त्यांच्यासारखी पेटी काही आम्ही वाजवू शकत नाही; पण त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी हार्मोनिअममधून काय काय वाजवता येऊ शकते, त्यात पुढे काय करता येऊ शकते, याबद्दल कुतूहल निर्माण करण्याकरिता हा वेगळ्या संकल्पनेचा कार्यक्रम केला.’
प्रसिद्ध रांगोळीकर राहुल कळंबटे यांनी कार्यक्रमस्थळी गोविंदरावांचे रांगोळीचित्र साकारले होते. तसेच, स्वतः हार्मोनिअमवादक असलेल्या अनुजा कानिटकर या तरुण चित्रकर्तीने मैफल सुरू असताना गोविंदरावांचे सुंदर चित्र रेखाटले. निबंध कानिटकर यांनी आपल्या निवेदनातून गोविंदरावांचे चरित्र उलगडले. तसेच, दीप्ती कानविंदे यांनी आपल्या निवेदनातून सिम्फनीबद्दलची माहिती रसिकांना दिली. विविध मान्यवर कलाकार, तसेच गोविंदरावांचा सहवास लाभलेल्या व्यक्तींच्या त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगणाऱ्या ध्वनिचित्रफिती या वेळी दाखवण्यात आल्या. तसेच, कौस्तुभ आठल्ये याने लिहिलेली आणि अनिल दांडेकर यांच्या आवाजातली डॉक्युमेंटरीही या वेळी दाखवण्यात आली.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉल करून कार्यक्रमासाठी सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. गोविंदरावांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करावी, अशी मागणी त्या वेळी त्यांच्याकडे करण्यात आली. कार्यक्रम संपण्याआधीच सामंत यांनी तशी मागणी करणारे पत्र सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लिहिल्याचे कळवले. त्यांनी लिहिलेले पत्र या वेळी वाचून दाखवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रायोजकांचा सत्कार करण्यात आला.

















कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

