रत्नागिरी : दिवाळीच्या सणानंतर रत्नागिरीकरांना नाटकांचा फराळ आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीतील स्वा. विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात २६ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
२६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या काळात रोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे.
रत्नागिरी केंद्रावर जिल्हाभरातील एकूण ९ संघांचा सहभाग असणार आहे. हे संघ आणि स्पर्धेचे वेळापत्रक असे –
२६ नोव्हेंबर – शिवाई सहकारी पतसंस्था येळवण निर्मित नाटक आजीचा बॉयफ्रेंड, २७ नोव्हेंबर – श्रीरंग, रत्नागिरी निर्मित नाटक – मॉर्फोसिस, २८ नोव्हेंबर – श्री लक्ष्मीपल्लीनाथ व इतर देवस्थान पाली निर्मित
अखेरचा सवाल, २९ नोव्हेंबर – संकल्प कलामंच निर्मित रुक्ष, ३० नोव्हेंबर – संगमेश्वर तालुका सांस्कृतिक कलामंच, देवरूख निर्मित जब वी मेट, १ डिसेंबर – प्रयोगिक थिएटर्स असोसिएशन, रत्नागिरी निर्मित महानायक, २ डिसेंबर – सहयोग, रत्नागिरी निर्मित चांदणी, ३ डिसेंबर – कोतवडे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघ कोतवडे, रत्नागिरी निर्मित कडीपत्ता, ४ डिसेंबर – खल्वायन, रत्नागिरी निर्मित नाटक – स्वप्नपक्षी.
राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक श्री. चवरे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी रत्नागिरी केंद्राचे समन्वयक नंदू जुवेकर (8329221797) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

