रत्नागिरी : शेतकऱ्याच्या कुटुंबाचे चित्रण करणारे चांदणी नावाचे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीत सोमवारी, दि. २डिसेंबर रोजी सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ६३ व्या राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत सुरू आहे या स्पर्धेत सोमवारी सहयोग संस्थेने चांदणी नावाचे नाटक सादर केले.
शेतकरी वडील आणि तरुण मुलगा यांच्या विचारांमधील फरक आणि त्यातून उद्भवणारा संघर्ष तसेच त्या दोघांमध्ये दुवा म्हणून ठामपणे उभे राहणारी आई अशी नात्यांची गुंफण यांचे दर्शन या नाटकात घडते. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, पिकांना नसलेला भाव, महागाई यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडते आणि त्यातूनच आत्महत्येची मानसिकता निर्माण होते. अशाच एका कुटुंबातील त्यातही शेत गहाण ठेवलेल्या कुटुंबातील तरुणाला वडिलांच्या इच्छेमुळे पारंपरिक शेतीच्या व्यवसायातून बाहेर जाता येत नाही. त्याचे वडील त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करत असतात. या दोघांच्या संघर्षामध्ये तरुणाची आई महत्त्वाची भूमिका बजावते. ती पतीला धीर देते आणि मुलालाही आत्मविश्वास देते, असे साधारणपणे या नाटकाचे कथानक आहे.
नाटकामध्ये भरत्या (अजिंक्य केसरकर), बाप (दीपक माणगावकर) आणि आई (श्रुतिका अभय कदम) या तीनच पात्रांच्या भूमिका आहेत. लंगडा बाप दीपक माणगावकर यांनी उत्तम साकारला. जमिनीवरून मचाणावर शिडीवरून चढताना आणि उतरताना त्यांनी लंगड्याची भूमिका उत्तम साकारली आहे. नाटकातील बहुतेक प्रसंग शेतकऱ्यांच्या शेतातील मचाणावर झाले आहेत.
नाटकाचे लेखन रोहित पगारे यांचे तर दिग्दर्शन अजिंक्य केसरकर यांचे आहे. शेतकऱ्याच्या शेताचा आभास निर्माण करणारे उत्तम नेपथ्य विनायक चंद्रकांत अपकरे यांनी साकारले आहे. दोन प्रवेशांमधील जागा समर्पक संगीताने भरून काढण्यात शहाबाज शौकत गोलंदाज आणि विलास दाते यशस्वी ठरले. सौ. कश्मिरा सावंत-माणगावकर यांनी पार्श्वगायन केले आहे. प्रदीप पेडणेकर यांची वेशभूषा आणि तुषार गिरकर यांची रंगभूषाही अत्यंत साजेशी होती.
एवढ्या साऱ्या तांत्रिक बाजू चांगल्या असूनही नाटक अनेक बाबतीत अपुरे ठरले. स्पर्धेतील नाटक पंधरा मिनिटांपर्यंतच्या मध्यंतराच्या विश्रामासह किमान दोन तास सादर केले पाहिजे, पण हे नाटक दीड तासही झाले नाही. कितीतरी वेळ शिल्लक असताना नाटक संपले. नाटकात दुसऱ्या अंकाच्या शेवटच्या भागात भरत्याची आई म्हणजे शेतकऱ्याची पत्नी निधन पावते, असा केवळ उल्लेख बापाच्या तोंडी आहे. असंख्य अडचणींचा पाढा अनेक वेळा वाचला जाणाऱ्या या नाटकात एका व्यक्तीचे म्हणजे मध्यवर्ती भूमिका असलेल्या आईचे निधन कशामुळे झाले, याचा उलगडा झाला नाही. त्यासाठी कोणताही प्रवेश केला गेला नाही, ही फारच मोठी विसंगती नाटकात आढळली. लेखन आणि संवाद चांगले असले तरी शेतकरी कुटुंबातील वडील आणि मुलगा सातत्याने शिव्याच घालतात. ते अयोग्य आहे. शब्दाशब्दाला शिव्यांची काहीच गरज नाही. त्या शिव्या काढून टाकल्या असत्या तर नाटकाचा कालावधी दीड तासापेक्षाही कमी झाला असता, ही बाब वेगळीच. आईचे निधन, वाघाच्या हल्ल्यात झालेले वडिलांचे निधन या महत्त्वाच्या घटना अगदी अर्ध्या मिनिटापेक्षाही कमी वेळेत दाखविल्या गेल्या. अडचणींचा पाढा वाचण्यात वेळ घालविण्यापेक्षा या दोन प्रसंगांना अधिक वेळ दिला असता, तर नाटकाची समर्पकता आणखी वाढली असती. पार्श्वभूमीला पूर्ण चंद्र दाखविण्यात आला आहे. प्रत्येक प्रसंगात पूर्ण चंद्र दिसतो. म्हणजे केवळ पौर्णिमेच्या रात्रीच ते प्रसंग घडतात, असे वाटते. चंद्रकला वेगवेगळ्या दाखवायला हव्या होत्या. एखाद्या दिवशी अमावास्याही दाखवायला हरकत नव्हती. वेळेच्या निकषामुळे हे नाटक स्पर्धेत यशस्वी ठरणार नाही, अशी शक्यता वाटते.
प्रत्येकी १५ आणि १० रुपयांच्या एकूण ४९८ तिकिटांच्या विक्रीतून ६ हजार ९७० रुपयांचा गल्ला जमा झाला. ५४६ प्रेक्षकांनी नाटक पाहिले.




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

