इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट लीगमध्ये रत्नागिरीचा झेंडा; अविराज गावडे करणार मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधित्व

रत्नागिरी : क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला, तरी भारताच्या कानाकोपऱ्यांमध्ये क्रिकेटचे चाहते आहेत. क्रिकेटचे प्रेम आता केवळ पाहण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. फक्त महानगरांमधीलच नव्हे, तर अनेक छोट्या गावांमधील किंवा छोट्या शहरांमधील खेळाडूही कष्ट आणि जिद्दीने क्रिकेटमध्ये झळकू लागले आहेत. यामध्ये रत्नागिरीकरही मागे नाहीत. रत्नागिरीचा युवा क्रिकेटपटू अविराज अनिल गावडे इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेत तो मिडलसेक्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

काउंटी लीग ही सर्व युरोपीय देशांची निवड चाचणी स्पर्धा असते. यातून प्रत्येक युरोपीय देशाच्या संघाची निवड केली जाते. अविराज मिडलसेक्सकडून प्रीमियर क्रिकेट लीगमध्येही सहभागी होणार आहे. एकूणच काउंटी क्रिकेट लीगमधील १६ आणि प्रीमियर क्रिकेट लीगमधील १४ असे ३० सामने तो १० मे ते ६ सप्टेंबर या कालावधीत खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या (केएसए) ए डिव्हिजन स्पर्धेत खेळताना प्रभावी लेगस्पिन फिरकी गोलंदाजी करून त्याने छाप पाडली. अविराज सध्या मेट्रो क्रिकेट क्लबमध्ये निरंजन गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)

व्यावसायिक क्रिकेटपटू असलेल्या २० वर्षीय अविराजने मधल्या फळीत खेळताना फिनिशरची भूमिका बजावली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एडीसीए) संघातून क्रिकेटला सुरुवात करताना त्याने आपली गुणवत्ता दाखवून दिली. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १४ व १६ वर्षांखालील क्रिकेट संघाचा कर्णधार असताना त्याची भारताच्या १६ वर्षांखालील पश्चिम विभाग क्रिकेट संघात निवड झाली. रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट इतिहासात प्रथमच अशी संधी रत्नागिरीच्या खेळाडूला मिळाली. वयाच्या पाचव्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवणाऱ्या अविराज याने खूप कमी वयात हे यश प्राप्त केले आहे.

अविराजने त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमएचसीए), बीसीसीआयची झोनल क्रिकेट अकॅडमी (झेडसीए) आणि बीसीसीआयची राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी (एनसीए) या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या लीग स्पर्धेत ८१ विकेट्स मिळवून त्याने विक्रम केला. ‘इन्व्हिटेशन लीग’ स्पर्धेत अविराजने ४० विकेट्स घेताना २०६ धावाही करून अष्टपैलू कामगिरी केली आहे. २०२२मध्ये झालेल्या एमसीए १६ वर्षांखालील आमंत्रित लीग स्पर्धेत (निवड चाचणी) एका डावात सहा आणि चार विकेट्स घेऊन घेत अविराजने निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा. टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply