नागपूर/रत्नागिरी : नागपूर येथील लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांची कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या प्रभारी कुलगुरूपदी निुयक्ती करण्यात आली आहे.
कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे गेल्या २३ ऑगस्ट रोजी पत्नीसह मध्य प्रदेशात अपघाती निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर डॉ. वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा आदेश राजभवनाकडून जारी करण्यात आला. डॉ. वैद्य नीरीचे संचालक म्हणून निवृत्त झाले आणि त्यानंतर त्यांनी लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. वैद्य यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर पदवी आणि मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून पीएच् डी. प्राप्त केली आहे. त्यांना ३४ वर्षांचा संशोधनाचा अनुभव असून, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन अशा विषयांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे. अध्यापन, संशोधन आणि प्रशासन या तिन्ही आघाड्यांवर त्यांचे कर्तृत्व प्रख्यात आहे. नीरीचे संचालक म्हणून त्यांचा कार्यकाळ विशेष दखलपात्र ठरला आहे.
अत्यंत साधे, निगर्वी, कामसू, प्रशासनकौशल्य असलेले आणि शैक्षणिक संस्थांच्या जडणघडणीचा विकासाचा ध्यास घेऊन त्यासाठी दूरदृष्टी ठेवून योजना कार्यान्वित करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरण क्षेत्रासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान केले आहे. पर्यावरण क्षेत्राशी संबंधित २०० हून अधिक प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. ८० हून अधिक संशोधन लेख विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. १२ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी प्राप्त केली आहे.
विश्वविद्यालयाचे कुलसचिव, सर्व अधिष्ठाता व संवैधानिक अधिकारी व कर्मयोगी यांनी डॉ. अतुल वैद्य यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

