कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्वर्यु अरुण नेरूरकर यांचे ७ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली.
………
अरुण नेरूरकर यांचं नाव आणि कर्तृत्व प्रथम समजलं ते ‘रत्नागिरी एक्स्प्रेस’मध्ये डॉ. वि. म. शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून. विद्यार्थिदशा पूर्ण करून नोकरीनिमित्त पुण्यास गेलो तेव्हा ‘नगर वाचनालया’चा एक माजी वाचक बनलो होतो, परंतु त्या संस्थेशी जवळून संबंधित असलेल्या नेरूरकर साहेबांबद्दल माहिती नव्हती. तेरा वर्षांनी परत आल्यावर हळूहळू सर्व जाणत्या व्यक्तींच्या ओळखी झाल्या त्यांत ते पहिल्या श्रेणीत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळजवळचं नेरूर हे नेरूरकरांचं मूलस्थान, परंतु अरुण नेरूरकर यांचं मूळ गाव वेंगुर्ले. वडील प्राध्यापक, त्यामुळे बदलीची नोकरी. तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील बोर्डी या गावच्या ‘बेसिक ट्रेनिंग कॉलेज’मध्ये नेरूरकर यांचे वडील प्राध्यापक होते. पहिली बालवाडी सुरू करणाऱ्या अनुताई वाघ यांच्या सामाजिक कार्यामुळे ते गाव प्रसिद्धी पावलं होतं. बोर्डी या गावी अरुण यांचा जन्म झाला आणि बालपण व्यतीत झालं. भारतीय स्वातंत्र्याच्या सूर्योदयाचं ध्वजवंदन त्यांनी तिथेच केलं.
बोर्डीमध्ये ‘शारदाश्रम’ हे बोर्डिंग स्कूल होतं. चांगले संस्कार होण्यासाठी मोठमोठे धनिक आपल्या मुलांना तिथे ठेवत. योगायोगाने अरुण साहेबांचं लहानपण त्याच केंद्राच्या छायेत पार पडलं. गांधीजींचे अनुयायी आचार्य भिसे तिथेच राहत. ‘मुले म्हणजे देवघरची फुले’ म्हणत मुलांच्यात रमणारे साने गुरुजी अधूनमधून तिथे येत. अरुण नेरूरकर यांच्या सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागण्याच्या स्वभावाचा विकास अशा वातावरणात झाला होता. त्यांच्या वडिलांची रत्नागिरीस बदली झाल्यावर ते कुटुंब इथेच स्थायिक झालं. यथावकाश नेरूरकर शासकीय सेवेत रुजू झाले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सांख्यिकी विभागातून निवृत्त झाले.
शासकीय सेवेत असताना आणि निवृत्तीनंतरही त्यांनी सार्वजनिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे त्यांचं कार्यक्षेत्र बनलं. १८२८ साली स्थापन झालेल्या या ऐतिहासिक संस्थेचे ते कार्यवाह होते. १९९० मध्ये रत्नागिरी शहरात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात याच संस्थेचा पुढाकार होता. संमेलनाच्या आयोजनात नेरूरकर साहेबांची भूमिका महत्त्वाची होती. ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’ची बीजं याच संमेलनात रुजली. नेरूरकर साहेब तिचे विश्वस्त बनले.
‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याशी नेरूरकर मंडळींचा परिचय कसा झाला त्याची हकीकत रंजक आहे. त्यांचे चिरंजीव योगीश शालेय विद्यार्थी असताना मराठीच्या पुस्तकात मधुभाईंचा एक धडा होता. तेव्हा त्यांची नियुक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्यालय शहरात होती. एकदा ते मुलांसह मोटारीतून करूळ गावाजवळून जात असता दुसऱ्या मोटारीत मधुभाई आहेत असं वाटलं. नेरूरकर साहेबांनी गाडी थांबवली नि खाली उतरून मधुभाईंच्या मोटारीला हात केला, ते थांबले. मुलाच्या पुस्तकातील धड्याचा संदर्भ देत साहेबांनी मधुभाईंशी ओळख करून घेतली. तेव्हापासून या दोघांचा स्नेह जडला तो शब्दांनी वर्णन करण्यापलीकडचा!
‘कोमसाप’च्या विश्वस्त मंडळात सदस्य असताना त्यांचं वर्तन सर्वांशी सौजन्याचं होतं. पदाधिकाऱ्यांच्या वर्तुळात नेरूरकर साहेबांची वागणूक उठून दिसत असे. माणसांची पारख त्यांना चांगली होती, पण एखाद्याची स्तुती आणि दुसऱ्याचा पाणउतारा असं त्यांनी कधीच केलं नाही. त्यांचं कोणत्याही गोष्टीबद्दलचं मतप्रदर्शनही अत्यंत संयमित शब्दांत होत असे. ‘कोमसाप’ ही संस्था जेव्हा उत्कर्षाच्या शिखराकडे वाटचाल करत होती तेव्हा तिचा एक महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून नेरूरकर साहेब कधी तोऱ्यात वावरले नाहीत. अशी माणसं दुर्मिळ असतात. म्हणूनच, बारातेरा वर्षांपूर्वी रत्नागिरीस झालेल्या ‘कोमसाप’च्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात या पतिपत्नीचा सत्कार झाला तेव्हा माझ्यासारख्या सामान्य माणसाला समाधान वाटलं. त्याच संमेलनात डॉ. वि. म. शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. तेही विश्वस्त होते. रत्नागिरीतील अनेक गुणवंतांकडे साहित्य चळवळीतील उच्चपदस्थांनी दुर्लक्ष केलं. या दोन्ही सच्छील व्यक्तींचा त्यावेळी गौरव झाल्याने ही चूक काही अंशी भरून निघाल्यासारखं वाटलं.
नेरूरकर साहेब कुटुंबवत्सल होते आणि आपल्या चांगल्या वृत्तीचा वारसा त्यांनी मुलांच्या रूपाने मागे ठेवला आहे. त्यांच्या जुन्या घरात काही भेटी झाल्या. तिथे झालेला एक पुस्तक प्रकाशन समारंभ आठवणीत राहिलाय. रत्नागिरीचेच दिल्लीनिवासी सुपुत्र दिलीप साळवी यांच्या हस्ते स्वप्नजा मोहिते यांच्या पुस्तकाचं तेव्हा अनावरण झालं. नेरूरकर दाम्पत्याकडे असलेली सौन्दर्यदृष्टी तेव्हा जाणवली. छोटंसं चाळवजा घर, समोरच्या नैसर्गिक उतारावर पायऱ्या बांधून लावलेली फुलझाडं. कालांतराने शेजारीच नवीन बंगला बांधला, त्यासमोर छोटासा पूल आहे, वास्तु सौन्दर्याचा अभ्यास करणाऱ्या माझ्या मोठ्या मुलाला तो ‘पूल’ फार आकर्षक वाटला.
नवीन बंगला झाल्यावर नेरूरकर दाम्पत्य आणि त्यांची मुलं पूर्वी होती तशीच राहिली. डास येऊ नयेत म्हणून बंद करून ठेवण्याच्या जाळीच्या दारामागचा मुख्य दरवाजा आजही उघडाच असतो. मी सपत्नीक त्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा किती आवडीने त्यांनी घर दाखवलं! पण आता ते तिथे असणार नाहीत, हे सत्य स्वीकारणं कठीण आहे!
- राजेंद्रप्रसाद स. मसुरकर, रत्नागिरी
९९६०२४५६९१

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

