खाद्यसंस्कृतीची शाब्दिक मेजवानी!

रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक कोकण मीडियाचा हा दशकमहोत्सवी दीपोत्सव विशेषांक आहे कोकणातील विविध विषयांशी संबंधित संकल्पनेवर आधारित लेख आणि स्पर्धा कोकण मीडियातर्फे दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेतली जाते. कोकण मीडियाने गेल्या नऊ वर्षांमध्ये कोकणातील वास्तुसौंदर्य, जलवैभव, उत्सव, बोलीभाषा, आठवणीतील कोकण, ग्रामदैवते अशा विविध विषयांना वाहिलेले दिवाळी विशेषांक प्रसिद्ध केले आहेत. या वर्षी कोकणाची खाद्यसंस्कृती असा विषय अंकासाठीसाठी निवडण्यात आला होता.
कोकणी माणूस मुळातच रसिक. त्यामुळेच तो काव्यातील (कला-साहित्य) नवरसांमध्ये रमतो आणि आहारातील सहा रसांमध्येही रस घेतो. इथल्या जैवविविधतेमुळे हा प्रदेश निसर्गसंपन्न तर आहेच; पण त्या जैवविविधतेमुळेच कोकणातील खाद्यसंस्कृतीतही प्रचंड विविधता आहे. शाकाहार, मत्स्याहार आणि मांसाहार या तिन्ही प्रकारांच्या कोकणात केल्या जाणाऱ्या पाककृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते. हे पदार्थ तयार करण्यासाठी विशिष्ट साहित्य गोळा करण्यापासून त्याची पाककृती सिद्ध करण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष खाण्यापर्यंतचे सर्व टप्पे केवळ उदरभरणाचा नव्हे, तर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि अनुभूती देणारे असतात. त्यांच्याशी निगडित असलेल्या अनेक आठवणीही असतात. अनेक पदार्थांचे आणि कोकणातील सणवारांचे घट्ट नाते आहे; मात्र सध्याच्या ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात पंजाबी पदार्थांपासून चायनीज, काँटिनेंटलपर्यंत सगळे पदार्थ आपल्याला कोकणातही कोणत्याही हॉटेलात सहज खायला मिळतात. जुने कोकणी पदार्थ मात्र सहज उपलब्ध होत नाहीत. अनेक जुने कोकणी पदार्थ घरी करण्याचे प्रमाणही आता खूप कमी झाले आहे. या जुन्या कोकणी खाद्यसंस्कृतीच्या जतनासाठी थोडा हातभार लागावा, या उद्देशाने खाद्यसंस्कृती हा या वर्षीच्या दिवाळी अंकाचा विषय आहे.
कोकणाच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. त्याकरिता वाकडा फणस, पाचांबा, कोठीची राई अशी स्थानिक प्रचलित नावे असलेल्या अनेक खाणाखुणा गडप झाल्या आहेत. लक्षावधी दुर्मीळ आणि कोकणाची ओळख असलेली झाडे भुईसपाट झाली आहेत. दुसरीकडे, ग्रामीण कोकणाचा चेहरामोहराही पूर्णपणे बदलून गेला आहे. कोकणातील जुनी घरे हळूहळू लुप्त होत आहेत. जुन्या पिढीतील माणसेही कमी होत चालली आहेत. साहजिकच खाद्यसंस्कृतीही बदलत चालली आहे. अनेक भौतिक खाणाखुणा नष्ट होत असल्या, तरी वैचारिक खजिना, आठवणी जतन करता येऊ शकतील. कोकणातील खाद्यसंस्कृती हाही असाच एक विषय आहे. या पार्श्वभूमीवर, खासकरून खाद्यसंस्कृतीविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याच्या उद्देशाने विशेषांकाची जुळणी करण्यात आली आहे. त्याबाबत केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यातील बहुतेक खाद्यपदार्थांची माहिती अंकात देण्यात आली आहे; पण तरीही बरेच काही निसटले आहे. ते पुन्हा आठवण्याची, जुन्या मंडळींकडून जाणून घेण्याची आणि ते पदार्थ तयार करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची उत्सुकता अंकाच्या निमित्ताने निर्माण झाली, तरी खूप काही साध्य होईल. रील्सच्या आजच्या जमान्यात खाद्यपदार्थांच्या कृतींविषयीचे व्हिडिओ मात्र स्पर्धेकरिता अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत.
मराठीतील दिवाळी अंकांची ११५ वर्षांची परंपरा आपल्या परीने जोपासण्याचा एक प्रयत्न म्हणून प्रसिद्ध केलेला कोकणातील खाद्यसंस्कृतीविषयीचा हा अंक वाचकांना कोकणातील वेगळे खाद्यपदार्थ तयार करायला प्रवृत्त करणारा, तशी शाब्दिक मेजवानी देणारा ठरेल, असे वाटते. अंकासाठी साहित्य पाठविणारे लेखक, ती माहिती संकलित करून अंक प्रकाशित करण्यासाठी साह्यभूत ठरलेले जाहिरातदार, वाचक, अंकाचे वितरक या साऱ्यांसह सर्वांनाच दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १७ ऑक्टोबर २०२५)
    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply