तीस जानेवारीपासून रिंगणे येथे अकरावे ग्रामीण साहित्य संमेलन

रत्नागिरी : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आरगाव, झर्ये ग्रामस्थांनी आयोजित केलेले अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रिंगणे (ता. लांजा) येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या काळात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

रत्नागिरीत इन्फिगो आयकेअर हॉस्पिटलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेला काशिनाथ चव्हाण, सौ. स्नेहल आयरे आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
                 
पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने यावर्षीचेअकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान सह्याद्रीचा पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील निसर्गरम्य रिंगणे गावाला दिला आहे. मुंबईत दादरच्या वीर कोतवाल उद्यानात ७२ वर्षांपूर्वी राजापूर आणि लांजा तालुक्यातील चाकरमान्यांनी आपल्या मायभूमीच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्ने साकार करण्यासाठी १९५३ मध्ये राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी संघाची स्थापना करण्यात रिंगणे गावच्या दूरदृष्टी असलेल्या सुपुत्रांचा विशेष पुढाकार होता. १९६० ते १९९० च्या साडेतीन दशकांमध्ये लांजा आणि राजापूर या दोन तालुक्यांमध्ये पक्के रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, कृषी क्षेत्रातील सुधारणा अशा मूलभूत प्रश्नांकरिता सरकार दरबारी कैफियत मांडणारी व त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणारी संस्था म्हणून संघाने नावलौकिक मिळविला. पुढे संघाने एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी बदलत्या समाजजीवनाबरोबर नवीन समस्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करताना नव्या पिढीला आवश्यक असणारे उपक्रम राबवायला सुरवात केली. त्यामध्ये प्रामुख्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी बक्षीस योजना, तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन शिबिरे, शैक्षणिक साहित्याचे वाटप, समाजहितासाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचागौरव, तसेच आपल्या भागातील साहित्याची आवड असणाऱ्यांसाठी, नवोदित साहित्यिकांसाठी व्यासपीठ मिळवून देणारे ग्रामीण साहित्य संमेलन भरवणे या उपक्रमांचा समावेश आहे. हे स्तुत्य उपक्रम राबवताना संघाला स्थानिक पातळीवर क्रियाशील कार्यकर्ते भेटत गेले. परिणामी संघाचे उपक्रम यशस्वी झाले. आज राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था आपल्या रचनात्मक कार्याने दोन्ही तालुक्यांमधील प्रत्येक गावात पोहोचली आहे.

संघाच्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे अकरावे वर्ष असून या संमेलनाचा कार्यक्रम ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या निसर्गसंपन्न रिंगणे या गावी ३० जानेवारी ते १  फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. लांज्यापासून ३० किलोमीटरवर नावेरीच्या काठावर दुतर्फा वसलेले रिंगणे गाव प्रगतिशील गाव म्हणून ओळखले जाते. सह्याद्रीच्या वर्तुळाकृती डोंगररांगांनी तयार झालेल्या रिंगणात गाव वसल्याने या गावाला रिंगणे असे सार्थ नाव पडले. लांजा तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेली झर्ये, कुरंग, कोंडगे, रिंगणे या गावांना नावेरी परिसर म्हणून संबोधले जाते. सोबत आरगाव, व्हेळ ही गावे गाडीरस्त्यामुळे या परिसराला जोडली गेली आहेत. परिसराच्या केंद्रस्थानी रिंगणे असून ग्रामदैवत श्री केदारलिंगाचे कृपाछत्र लाभलेले रिंगणे दिवसेंदिवस प्रगतीच्या दिशेने झेपावत आहे.

मराठी कामगार रंगभूमीवरील सशक्त नाटककार लाडकोजी कृष्णाजी आयरे याच रिंगणे गावचे सुपुत्र होत. या गावाला शतकोत्तर नाट्य परंपरा लाभली असून या गावचे कर्तृत्ववान सुपुत्र अनेक ठिकाणी उच्च पदे भूषवत असून विविध क्षेत्रात त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली आहे. रिंगणे परिसरात नव्याने उभारलेले श्री.केदारलिंग मंदिर, डोलारखिंड, नावाकडा, कोंडगे धरण, कुरंग येथील आसरा कोंड व सह्याद्रीतील ऐतिहासिक पाजा या प्रमुख पर्यटन स्थळांसह बारमाही खळखळ वाहणारी जीवनदायी नावेरी, तिच्या काठावरील आकर्षक पद्धतीने बांधलेली विविध ग्रामदैवतांची मंदिरे व विहार, टुमदार वाड्यावस्त्या हे सर्व अस्सल कोकणी समृद्ध जीवन आवर्जून पाहण्यासारखे आहे. यासोबतच सतीशिळा वीरगळ, भडकंबा, घरवंद यांसारखे ऐतिहासिक अवशेषही गावात पाहायला मिळतात. या संमेलनाच्या निमित्ताने रिंगणे परिसरातील समृद्ध इतिहास, निसर्ग, संस्कृती, लोककलांना नव्याने उजाळा मिळणार आहे.

साहित्य संमेलनाला नाटककार ला. कृ. आयरे साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे. संमेलनात नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम होणार आहे. क्रांतीज्योत, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम असलेले हे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जितके अधिक उठावदार होईल तेवढेच रिंगणे गाव व परिसर अधिक प्रकाशात येईल. यासाठी संघाचे मुंबईचे व स्थानिक कार्यकर्ते तसेच रिंगणे व परिसरातील गावातील ग्रामस्थ ही मेहनत घेत आहेत. संमेलनात साहित्यिक, कलाकार व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संमेलनात कोकण भूषण पुरस्कार मालवणमधील वराड गावचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांना दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक विदुर महाजन यांचे सतारवादन आणि मुलाखत हे संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.

संमेलनात चित्रकार विजयराज बोधनकर यांचे चित्र प्रदर्शन, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचे चित्रप्रदर्शन, निकेत  पावसकर यांचे अक्षरघर, सुनील कदम यांचे शस्त्रप्रदर्शन, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे पुस्तक प्रदर्शन, मुलांचे चित्र प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पाककला प्रदर्शन आणि दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरणार आहे. यशवंत माणके यांच्या ‘चौथरा’ या नाटकाचा प्रयोग तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या एकांकिकाही सादर होणार आहेत.

संमेलनातील विविध कार्यक्रम

सोमवार, २६ जानेवारी – कोंडगे, कुरंग गावातील नदी जलपूजन. क्रांती ज्योत

संमेलनपूर्व दिवसाचे कार्यक्रम
शुक्रवार, ३० जानेवारी
सकाळी ८ ते १० रांगोळी प्रदर्शन
१० ते १२ – पाककला स्पर्धा

संध्याकाळी ५ ते ७ – नदी जलपूजन रिंगणे, नावेरी नदी
रात्रौ ८ ते ११  नाटक चौथरा


शनिवार, ३१ जानेवारी
सकाळी ८ ते ९  ग्रंथदिंडी
१० वाजता  उद्घाटन समारंभ, स्मरणिका, पुस्तके प्रकाशन, संमेलनाध्यक्षांचे भाषण

दुपारी
२.०० ते ३.०० मुलांच्या एकांकिका
३.०० ते ४.०० मुलांचे कथाकथन व भाषणे

सायंकाळी
४ ते ५ – व्याख्यान – मराठी भाषा आणि तिचा इतिहास – वक्ते कृष्णाजी कुलकर्णी
५ ते ६  – परिसंवाद – कोकण संस्कृती
सहभाग १)  डॉ. निधी पटवर्धन, २. डॉ. पार्थ काळे, ३) ऋषीकांत राऊत, ४)  रामदास खरे

६ ते ७  शिवचरित्र-  सचिन कर्डे

७.३० ते ८.३० स्थानिक कविसंमेलन -अध्यक्ष- प्रकाश होळकर (उपाध्यक्ष -कुसुमाग्रज प्रतिष्ठान)
८.३० ते ९.३० निमंत्रितांचे काव्यसंमेलन

रात्री
१० ते ११.३०
  विदुर महाजन  यांचे  सतारवादन व मुलाखत – संवादक दिनेश मोरे


रविवार, १ फेब्रुवारी
सकाळी ९ वा. – मुलांच्या एकांकिका/फॅशन शो
पुरस्कार विजेत्यांचे आगमन
९० पार ज्येष्ठांचा सन्मान
प्रभाकर वाईरकर मुलाखत
सर्व पुरस्कारांचे वितरण
स्पर्धा बक्षीस वितरण (रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा)

नववधू सन्मान
मोफत दंत चिकित्सा सौजन्य डॉ. सायली दळवी आयरे
मोफत नेत्रचिकित्सा – सौजन्य इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल, रत्नागिरी


संमेलनातील आजवरचे अध्यक्ष
१) २०१५ – तळवडे-लांजा, अध्यक्ष – ॲड.विलास कुवळेकर
२) २०१६ पाचल-राजापूर, अध्यक्ष -राजाराम खाडे
३) २०१७ -लांजा, अध्यक्ष – सुरेश खटावकर
४) २०१८- ताम्हाणे-राजापूर, अध्यक्ष -नाटककार दशरथ राणे
५) २०१९- कोट -लांजा, अध्यक्ष -गजाभाऊ वाघदरे
६) २०२०- नाटे -राजापूर, अध्यक्ष -गंगाराम गवाणकर
७) २०२२ प्रभानवल्ली-लांजा, अध्यक्ष -अशोक लोटणकर
८) २०२३ तळवडे-राजापूर, अध्यक्ष -चंद्रकांत देशपांडे
९) २०२४ शिपोशी-लांजा, अध्यक्ष -विजय कुवळेकर
१०) २०२५ वाटूळ-राजापूर, अध्यक्ष – दिनकर गांगल
११) २०२६ रिंगणे-लांजा, अध्यक्ष – कुमार केतकर
…………

https://youtu.be/ylEDG4Mab2U

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply