राजापूर : जुवाठी (ता. राजापूर) येथील माध्यमिक विद्यालयाचे क्रियाशील शिक्षक आणि अक्षरमित्र भानू केरू ऊर्फ के. गोंडाळ (वय ५३) यांचे बुधवारी मध्यरात्रीनंतर अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.
मूळचे शीळ गावचे रहिवासी असलेले बी. के. गोंडाळ यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले आणि नंतर अध्यपनाचे काम केले. प्रारंभी ते गोठणदोनिवडे हायस्कूलमध्ये शिक्षक होते. त्यानंतर ते जुवाठी हायस्कूलमध्ये रुजू झाले. जुवाठी हायस्कूलमधील एक उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख होती. माध्यमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षांची तयारी केली पाहिजे, या विचारातून त्यांनी स्वतःचे खास ग्रंथालय सुरू केले होते. त्याचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षा देऊन यश संपादन केले होते.
तालुका ग्रंथालय चळवळीतील ते अग्रणी कार्यकर्ते होते. त्यांना जिल्हास्तरिय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळाला शीळ गावात त्यांनी 1997 साली ज्ञानसागर वाचनालय सुरू केले. मुलांनी, तरुण पिढीने वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. अनेक शाळांमध्ये त्यांनी हस्ताक्षर सुधार उपक्रम राबविले. आपल्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी राजापूर तालुक्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाचनालये सुरू करून वाचन संस्कृती जपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
राष्ट्रसेवा दलाचेही ते सक्रिय कार्यकर्ते होते. विविध सामाजिक संघटनांमध्ये ते सक्रिय होते. नुकतीच त्यांची राजापूर नगर वाचनालयाचे संचालक म्हणून निवड झाली होती. राजापुरातील विविध सामाजिक संस्थांवरदेखील ते कार्यरत होते. दिशा परिवारच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. बी. के. या नावानेच ते सगळ्यांना परिचित होते. राजापूरमधील अक्षरमित्र चळवळीचे ते जनक होते.
बुधवारी, दि. ४ फेब्रुवारी रोजी रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडली व त्यातच मध्यरात्रीनंतर त्यांची प्राणज्योत मालावली. त्यानंतर त्यांचे पार्थिवर शीळ गावी नेण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी त्यांच्या शीळ येथील निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कै. गोंडाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, बहिणी पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी शीळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

