चिपळूण : ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ असे बोधवाक्य घेऊन राज्यभरातील साहित्य रसिकांसमोर आलेले ‘बांधावरचे साहित्य संमेलन’ येत्या रविवारी (दि. ८) चिपळूणनजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयूराची’ शिवारात होत आहे.
शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, सातेरी माता म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वारुळांचे पूजन आणि पवित्र गंगेने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन, आरज लावून आणि भलरी गाऊन सकाळी ९.४५ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलन नावनोंदणी आणि अल्पोपाहार सकाळी ९.०० ते ९.४५ पर्यंत असेल. प्रा. सुहास बारटक्के हे संमेलनाचे अध्यक्ष तर शशिकांत मोदी स्वागताध्यक्ष आहेत. संमेलनाचे उद्घाटन डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार शेखर निकम, मसाप केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, वाशिष्ठी उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रशांत यादव उपस्थित असतील. स. ९.४५ ते १०.४५ पर्यंत चालणाऱ्या उद्घाटन सत्रास प्रमुख पाहुणे मसापचे कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, कोमसाप जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, केशवसुत स्मारकाचे विश्वस्त गजानन पाटील, स्प्रिंग क्लिनिकचे संचालक डॉ. यतीन जाधव, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे अध्यक्ष सुभाष लाड, मदन हजेरी (अध्यक्ष, मसाप राजापूर), विलास कुवळेकर (अध्यक्ष, मसाप लांजा), राजेंद्र आरेकर (अध्यक्ष, मसाप गुहागर), अरविंद कुलकर्णी (अध्यक्ष, मसाप देवरूख), कैलास गांधी (अध्यक्ष, मसाप दापोली) उपस्थित असतील. उद्घाटन सत्राचे संचालन प्रा. सोनाली खर्चे, धीरज वाटेकर करतील.
पहिले सत्र १०.४५ ते ११.४५ वाजता कविता तंत्र आणि मंत्र या विषयावर होईल. या विषयावरील कार्यशाळा ७५ पेक्षा अधिकवेळा घेणारे अभ्यासक विजय जोशी काव्यविवेचन करतील. सत्रसंचालन मनीषा दामले, प्रकाश घायाळकर पाहातील. ११.४५ ते १२.३० वाजताच्या दुसऱ्या कथाकथन सत्रात सत्र अध्यक्ष सुरेश देशपांडे (मुंबई) प्रमाण मराठी तर उज्ज्वला मांडवकर (संगमेश्वर – संगमेश्वरी बोली), अमोल पालये (रत्नागिरी – तिलोरी बोली), अतुफा होडेकर (रत्नागिरी – कोकणी बोली), ज्ञानेश्वर झगडे (गुहागर – खारवी बोली) सहभागी होतील. सत्रसंचालन संगीता जोशी, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे पाहातील. भोजनानंतरचे तिसरे ‘शेतीची गाणी’ सत्र दु. २.०० ते ३.०० या वेळेत होईल. सत्रसंचालन संध्या आठल्ये, विनायक ओक पाहतील. दु. ३.०० ते ३.४५ वाजता चौथे सत्र संमेलनाध्यक्ष प्रा. बारटक्के यांच्या मुलाखतीचे असेल. ही मुलाखत स्नेहल जोशी, मंगेश बापट घेतील. सत्रसंचालन स्नेहल कुलकर्णी, विलास महाडिक पाहतील.
चहापानादरम्यान शाकाहारी मोंगा-पोपटीचा आस्वाद घेता येईल. सायंकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात राष्ट्रपाल सावंत, कांता कानेटकर, संजय तांबे, मुझफ्फर सय्यद, केदार पाटणकर, मंदार ओक, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू (चिपळूण), सुनील कदम, सुदेश मालवणकर (दापोली), विनय माळी (खेड), दिपेश बारस्कर (मुंबई), विजय हटकर (लांजा), ज्ञानेश्वर पाटील, अरुण मौर्य, गुरु नांदगावकर (रत्नागिरी), राजेंद्र आरेकर, मोहन पाटील, ईश्वर हलगरे (गुहागर), दीपक लिंगायत, विनय होडे, बाळू घाणेकर (देवरूख), प्रकाश सकपाळ (राजापूर) सहभागी होतील. सूत्रसंचालन कैलास गांधी (दापोली) तर सत्रसंचालन संध्या साठे, अभिजित देशमाने करतील. संमेलनाचा समारोप सायंकाळी ५ वाजता होईल. सत्रसंचालन प्राची जोशी, अंजली बर्वे करतील.
साहित्याचा पहिला प्रसव कष्टाच्या घामातून आकाराला आला, तेव्हापासून त्याचे नाते लाल-काळ्या मातीशी एकरूप झालेले आहे. साहित्याचा कोणताही शब्द आशयरूप घेताना जेव्हा आकाशाच्या पांघरुणाखाली आणि निसर्गाच्या कुशीत खेळतो, बागडतो तेव्हा त्याला कोणत्याही कृत्रिम आवरणाची गरज भासत नाही. मग अशा शब्दप्रवाही खळाळत्या साहित्यिक मेळाव्याला मंडप, स्टेज, खुर्ची आदी बाबी हव्यात कशाला; हा विचार करून चिपळूणच्या साहित्यिक परिवाराने काजूच्या झाडांच्या घनदाट छायेतील रम्य वातावरणातील या संमेलनाचे आयोजन केले आहे. गाव आणि शहराच्या सीमा पुसून सर्व लिहित्या हातांना आणि गाणाऱ्या मनांना एकत्र आणणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असला तरीही मराठी बोलींच्या ओठी असलेल्या भावभावना प्रमाण मराठी भाषेच्या ओटीत घालाव्यात हा त्यातील मतितार्थ आहे. सातेरीच्या साक्षीने, खळाळत्या पाण्याच्या आश्रयाने आणि पक्ष्यांच्या नादमधुर गुंजारवाने जमिनीवर बैठक मारून अल्पोपाहार, चहापान, भोजन, मोंगा अगदी घरगुती ग्रामीण कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने साजरा होणारा हा साहित्याचा सोहळा मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग आहे.
संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेचे असून सहआयोजक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती या संस्था आहेत. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्राची जोशी, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर, सहकार्यवाह प्रा. सोनाली खर्चे, कोषाध्यक्ष प्रकाश घायाळकर, सदस्य मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे यांच्यासह विविध समिती सदस्य विलास महाडिक, विशाखा चितळे, विनायक ओक, अभिजित देशमाने, राम दांडेकर, राष्ट्रपाल सावंत, महम्मद झारे, सुनील खेडेकर, अनिल धोंड्ये, मेघा लोवलेकर, प्राजक्ता मराठे, उमेश घाडगे, वर्षा देशपांडे, वीणा परांजपे, समीर कोवळे, संगीता जोशी, संजय शिंदे, संध्या आठल्ये, संध्या साठे-जोशी, सुखदा परांजपे, सुनेत्रा आपटे, कैसर देसाई, स्वरदा कुलकर्णी, स्नेहल कुलकर्णी, स्नेहल जोशी, स्नेहल दीक्षित, स्नेहा ओतारी, स्नेहा वैशंपायन, नेहा सोमण, विद्या ओक, ऋचा भागवत, विजय कदम, भारती जठार, आराध्या यादव आदी प्रयत्नशील आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

