महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरू आहे. स्पर्धेत नाशिक येथील लोकहितवादी मंडळाने प्रतिषिद्ध हे तृतीयपंथीयांच्या जीवनावरील संघर्षाचे नाटक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सादर केले.
नालसा २०१४ कायद्यांतर्गत तृतीयपंथींना कायदेशीर मान्यता देण्याचे, सामाजिक कल्याणकारी लाभ देण्याचे आणि भेदभाव दूर करण्याचे निर्देश देण्यात आले होते या कायद्याचा तृतीयपंथींयांवर आणि समाजावर किती प्रभाव पडला, त्यांच्या समस्या, सुविधा, महाविद्यालयीन प्रवेश, व्यवसाय, नोकऱ्या यावर प्रतिषिद्ध नाटकात भाष्य करण्यात आले आहे.
डॉ. तन्मय भोळे लिखित व दिग्दर्शक-मुकेश काळे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या उत्स्फूर्त दाद दिली. नालसा कायद्याविषयी अभ्यासपूर्ण विवेचन तसेच समाजाने नाकारलेल्या, टाकलेल्या तृतीयपंथीयांच्या भावना, समस्या कलाकारांनी अभिनयातून रेखाटल्या.
समाजात आजही तृतीयपंथीयांना मिळावे तितके स्थान मिळत नाही. शासनाने कायदा केला परंतु त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का? हा मुद्दा नाटकात मांडण्यात आला आहे. एका प्रसिद्ध मीडियाचा पत्रकार कबीर कोटनीस याच्या लहानपणीचा जीवलग मित्र प्रकाश याला जबरदस्तीने तृतीयपंथी घेऊन जातात. प्रकाशमध्ये तृतीयपंथीय असल्याचा न्यूनगंड असतो. तो तेथे वाढतो, पण कबीरला हे शल्य बोचत असते. कबीरला तृतीयपंथीयांविषयीचा राग खूप अनावर होतो. पुढे कबीर एका मोठ्या वाहिनीचा पत्रकार होतो. नालसा कायद्याचा अभ्यास आणि कव्हरेज करत असतो, पण प्रकाशबाबतचे स्वप्न पडले की त्याच्या मनाची घालमेल होते. तृतीयपंथीयांविषयी तो वाईट बोलत असतो. एके दिवशी तृतीयपंथीआंच्या पाड्यात पत्रकार परिषद असते. इकडे नालसा कायद्याविषयी प्रत्येक वाहिनीवर चर्चा सुरू असते. या पत्रकार परिषदेला तो सहाय्यक पत्रकाराला पाठवतो. त्या पाड्यात सर्वच तृतीयपंथी शिक्षित असतात. कोण सीए, वकील, एमएसस्सी झालेले महिला-पुरुष असतात. पण समाजात वावरण्याच्या त्यांच्या प्रय़त्नाला यश येत नाही. नोकरीसाठी प्रयत्न केले, तर अत्याचारच त्यांच्या वाट्याला येतो. उच्च शिक्षण व शासकीय नोकरी मिळण्यासाठी केलेले त्यांचे प्रयत्न असफल होतात. पत्रकार कबीर मात्र त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कघीही पुढे येत नाही. तो त्यांना नपुसंक, समाजाला लागलेली कीड आहे, असे संबोधतो.
नालसा कायद्याअंतर्गत आरक्षण मिळावे, समाजात समान हक्क मिळावा यासाठी पाड्यातील तृतीयपंथी आंदोलन करतात. पोलीस त्यांना मारहाण करतात. हा विषय तेथे थांबतो, पण यावेळी पत्रकार कबीर कोटणीसला तृतीयपंथी बांधून ठेवतात. यावेळी मोठा झालेला महिला रूपातील प्रकाश तेथे असतो. तो त्याच्याजवळ येतो, पण कबीर त्यालाही जवळ करत नाही. शेवटी सर्वच शिक्षित तृतीयपंथी तेथे येतात. कबीरला समजावतात आमच्यावर अन्याय झाला. आम्ही समाजातील एक घटक आहोत. पण समाजाने नाकारलेले, टाकलेले प्रतिषिद्ध असल्याचे सांगतात आणि तृतीयपंथीयांना कुणाच्या इच्छेविरुद्ध पळवून नेण्याची परवानगी नाही, असे स्पष्ट करतात. कबीर कोटणीसवर त्यांच्या बोलण्याचा प्रभाव पडतो. अंतर्मनाला माहीत नसलेल्या सत्याचा शोध कबीरला लागतो आणि तो तृतीयपंथीची माफी मागतो. मोठा झालेला स्त्रीरूपातील प्रकाश या त्याच्या मित्राची भेट होते.
सूत्रधार आणि साह्य
लेखन : डॉ. तन्मय भोळे
दिग्दर्शन : मुकेश काळे
नेपथ्य : आदित्य किरण समेळ
नेपथ्य निर्मिती : मुक्ता शेपाळ, सई उपासनी, संहिता देशपांडे, युगा कुलकर्णी, ध्रुव शाह, अक्षता देवरे, आनंद कुलकर्णी
प्रकाशयोजना व गीत : सागर पाटील
पार्श्वसंगीत : प्रथमेश पाडवी, अमेय जोशी
संगीत संयोजन : सर्वेश साबळे
वेशभूषा : अपूर्वा शौचे
रंगभूषा: माणिक कानडे
नृत्यदिग्दर्शन : रोहिणी जोशी
निर्मितीप्रमुख : सुभाषा पाटील, किरण समेळ
रंगमंच साह्य : लोकहितवादी मंडळ, नाशिक.
पात्रपरिचय
लहान कबीर : विप्लव देशमुख
प्रकाश : आदित्य कटारे
कबीर : सागर संत
प्रज्ञा : रोहिणी जोशी
अनघा : वेदिका जांभोरे
मीनाक्षी : ईशान घोलप
मुनमुन : तेजस मोहिते
आर्या : देवगंधा भागवत
लक्ष्मी : डॉ. सायली आचार्य
रमा : ऋषिकेश पाटील
सुनंदा : अक्षता देवरे
अॅना : अथर्व सूर्यवंशी
इसाबेला : युगा कुलकर्णी
आयेशा : ध्रुव शाह
पुष्पा : अर्जुन भावसार
वल्लरी : संहिता देशपांडे
देशमुख : डॉ. सम्राट देशमुख
मिस कालेलकर : मानसी भावसार
पोलीस : आदित्य किरण समेळ
वेटर : मानस पाटील
नृत्य कलावंत : संदीप पाचांगे, सई उपासनी




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

