रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत सांगलीतील लोकरंगभूमी शांतिनिकेतन संस्थेने हे नाटक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सादर केले.
आदर्श राजकीय व्यवस्था राबविण्याच्या नादात सत्तेचा आलेला कैफ आणि त्या विरोधात सर्वसामान्यांचा संघर्ष चित्रित करणारे युटोपिया हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावरील अंतिम स्पर्धेत सादर करण्यात आले. नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन इरफान मुजावर यांनी केले आहे.
‘लॉन्ग लिव्ह युटोपिया, गॉड सेव्ह युटोपिया, गॉड सेव्ह द किंग’ या गाण्याने (टायटल साँगने) नाटकाची सुरुवात होते आणि हेच गाणे नाटकात बऱ्याचवेळा वाजविण्यात आले आहे. जुन्या संस्कृतीच्या बदलाने प्रेरित होऊन युटोपियाचा राजा किंग याने सत्ताप्राप्ती केलेली असते. त्याला युटोपिया समृद्ध देश बनवायचा असतो. मात्र तो कायदेकानूंचा अतिरेकी वापर करून हुकूमशाही पद्धतीने आणि त्याच्या विरोधात असलेली जनता, विरोधी गटांना ‘मिरामी’ समाज किंवा समूह असे वारंवार संबोधतो आणि त्यांचा छळ करतो.
याच ‘मिरामी’ समूहांना राजा किंगने बंदीवान बनवलेले असते आणि अशाच एका स्त्रियांच्या छळछावणीतील (त्याच्या दृष्टीने सुधारगृहातील) घडणाऱ्या घटनांचे हे एक नाटक आहे. या नाटकात बऱ्याच बंदीवान स्त्रिया आहेत. फ्यूचर, लिओ, डोरा इत्यादी, यामधील एक चेरी तृतीयपंथी आहे. त्यामुळे ती पुरुषांच्या व स्त्रियांच्या सुधारगृहात प्रवेश करू शकते. ती एक प्रकारची राजा किंगच्या गुप्तहेराचे काम करत असल्याने बंदीवान स्त्रियांच्या मनातील धूसफूस, पळून जायचे त्यांचे प्रयत्न, राजाविषयी नाराजी, बंदीवानगृहातून गुप्तपणे पाठवलेली पत्रे इत्यादी त्या बंदीवानगृहाचा प्रमुख लॉर्डला सांगून त्याच्याकडून होणारा अन्याय, अत्याचारापासून स्वतःची सुटका करून घेत असतो. मात्र त्याला त्याच्या लैंगिक छळाला त्याला सामोरे जावे लागते.
राजा किंग रंगमंचावर प्रत्यक्षात दाखविलेला नाही. मात्र त्याचा प्रधान स्पून दोन-तीन वेळा बंदीवान स्त्रियांच्या विरोधात त्यांना त्रास देण्यासाठी ऑर्डर सोडताना दाखविला आहे. एका ‘मिरामी’ला त्याने कुत्रा बनवून आपल्यासोबत फिरवतानाही दाखवले आहे, अशी हीन वागणूक किंगच्या विरोधात वागणाऱ्या, बोलणाऱ्या, कृती करणाऱ्या ‘मिरामीं’सोबत घडताना दिसते. प्रधान स्पूनद्वारे एका बंदीवान स्त्रीचा तिने छळछावणीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने गॅसचेंबरमध्ये घालून मृत्यू घडवून आणला. तिचा मृतदेह सर्वांदेखत ओढून नेऊन अन्य बंदीवानांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्नही केला.
एका प्रसंगात लॉर्ड युटोपियातील घरांघरांतून झडती घेत असतो. एका कुटुंबातील पर्ल (छोटी मुलगी), तिची आई ग्लोरी, काका जॉन व काकी यांच्या घरी जातो. तेथे काकाकडून होणारा विरोध पाहाता काकाला तेथेच गोळी मारून ठार करतो. ग्लोरी, तिची मुलगी पर्ल यांना बंदीवानगृहात चलण्याची आज्ञा करतो, प्रसंगाचे गांभीर्य ओळखून ग्लोरी तिची लहान मुलगी पर्ल हिला हा एक खेळ असून आपणास यांच्यासोबत जावे लागेल, त्यात तू विजयी झालीस तर तुला रणगाडा मिळेल असे सांगून लॉर्डबरोबर छळछावणीत दाखल होते.
तेथील अनेक प्रसंगांमध्ये राजा किंगविरोधाचा सूर सतत आळवला गेला आहे. छोट्या पर्लच्या जिवाशीसुद्धा प्रसंग आला असता ‘चेरी’ या तृतीयपंथीने तिला त्यातून सोडविले. चेरीला ग्लोरीने व इतर बंदिवान स्त्रियांनी तू असे का केले, असे विचारले असता, ती म्हणते, मी माझ्या वडिलांच्या व आईच्या बरोबर झालेले अत्याचार पाहून सामंजस्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी व एकट्याने जुलमी राजा किंगच्या, प्रधान स्पून व लॉर्ड यांच्या राजवटीविरोधात काही करू शकत नसल्यामुळे हे धोरण स्वीकारल्याचे सांगते. आता सर्वांनीच उठाव करावयाला हवा, असे चेरी सांगते व ती राजा किंगचा प्रधान स्पून याला गोळ्या घालते. हे कळल्यावर लॉर्ड चेरीला गोळी घालून ठार करतो.
दरम्यान युटोपिया राज्याच्या आजूबाजूच्या राज्यातून युटोपियावर आक्रमणाच्या बातम्या येत असतात. त्याच वेळी अनेक बंदीवान स्त्रिया गुप्तमार्गाचा अवलंब करून पळून जातात, काहींना लॉर्ड गाठतो व गोळी मारून ठार करतो.
छळछावणीतून बाहेर पडलेली ग्लोरी व पर्लसुद्धा पळून आलेले असतात. मात्र प्रसंगावधान राखून ग्लोरी जड अंतःकरणाने छोट्या पर्लला एका पेटीमध्ये दडवून ठेवते आणि दुसऱ्या सकाळी सगळीकडे शांतता झाल्यावर तू या पेटीतून बाहेर पड, अन्यथा पडू नकोस असे बजावते. तेथून ती निघायचा प्रयत्न करते तेवढ्यात लॉर्ड तेथे येतो आणि तिला गोळी घालतो. किंग राजाला विरोध करणाऱ्या सगळ्यांना लॉर्डला ठार करायचे असतात. तो पर्ललाही शोधण्याचा प्रयत्न करतो ग्लोरीपाशी चौकशी करतो पण ती दाद लागू देत नाही.
सगळ्या विरोधकांना ठार केल्यावर लॉर्ड आपल्या छळछावणीत येतो तर त्याला राज्यात शेजारील राष्ट्रांकडून आक्रमण झाल्याचे समजते. त्यांच्याहाती जाण्यापेक्षा स्वतःवर गोळी झाडून मरण स्वीकारतो.
इकडे दुसरा दिवस उजाडतो. सगळीकडे शांतता झालेली असते. पर्ल पेटाऱ्यातून बाहेर पडते. तोच तिला एक रणगाडा येताना दिसतो. तू जिंकलीस, तर तुला रणगाडा बक्षीस मिळेल, हे तिची आई ग्लोरीने सांगितलेले वाक्य तिला आठवते. रणगाडा चालक तिला रणगाड्यावर बोलावतो. येथेच नाटक संपते.
हुकूमशाही, भ्रष्टाचार, निष्ठाहीन वागणे इत्यादींवर भाष्य करणारे हे नाटक आहे. नेपथ्यरचनेमध्ये बंदीवानांसाठीची खोली ही तळघरासारखी दाखवलेली वाटते. तेथील प्रमुख लॉर्डचे छोटेखानी कार्यालय तेथेच आहे. बंदिवानगृहातील प्रवेश उंचावरून पायऱ्या उतरून यावे लागते असा आहे. प्रवाहीपणा नाटकात नसल्याने तुटक तुटक प्रसंगांची पेरणी असल्याने कथानकाची संगती लावणे कठीण जाते, त्यातच रंगमंचावर बरीच पात्रे असल्याने अवघड जाते.
नाटकाचे संगीत लाइव्ह म्हणजे प्रत्यक्ष तबला, पेटी, गायक, ड्रम यांचा वापर केल्यामुळे प्रभावी वाटते. आवश्यक अशी परिणामकारकता साधते. विविध प्रसंगांच्या पात्रांच्या आवश्यकतेनुसार योग्य प्रकाशयोजना नाटकाची जमेची बाजू आहे. नाटकातील नेपथ्य, प्रकाशयोजना, सर्वच पात्रांचे संवाद अचूक आणि योग्य होते. कैद्यांच्या वेशातील सर्व महिलांचे कामही चांगले झाले.
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)
युटोपिया
लेखक/दिग्दर्शक – इरफान मुजावर
प्रकाशयोजना – श्याम चव्हाण
नेपथ्य – संजय सुतार आणि मयूर पाटील
पार्श्वसंगीत/संगीत निर्मिती – आशुतोष वाघमारे
ध्वनी – प्रीतीश खंडागळे
रंगभूषा – प्रसाद गद्रे
वेशभूषा – वैष्णवी शेटे
संगीत साथ – हार्मोनियम – विशाल पारदे
तालवाद्य – सुजित गायकवाड
गायिका – प्रिया दूनघव
सूत्रधार – साईकलाम कोरबू
रंगमंच व्यवस्थापन – आकाश कदम
पात्रपरिचय
पर्ल : स्वरा मेंडगुले
ग्लोरी : हर्षाली बेलवलकर
क्युबा : वैष्णवी शेटे
चेरी : इरफान मुजावर
लॉर्ड : मयूर पाटील
फॉक्स : अमर शिंदे
फ्युचर : प्रणिता भिंताडे
लीओ : मनीषा काळे
पॅपिलॉन : तनुजा रणखांबे
डोरा : मधु शिंदे तोरस्कर
पिकॉक : पूजा देशमुख
अनामिका : संवेदना राठोड
काका/जॉन : आकाश कदम
काकी : विशाखा भोसले
डॉ. स्नेक : साईकलाम कोरबू
स्पून : देवांतक पाटील
कुत्रा : मौर्य बेलवलकर
शेजारी : प्रणव कोळी
सैनिक : प्रणव गुरव, प्रशांत जगताप





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

