द ब्लॅंक्ड इक्वेशन : अमेरिका-जपान युद्धाचा विषय

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अहिल्यानगर येथील नाट्य आराधना संस्थेने द ब्लॅंक्ड इक्वेशन हे अमेरिका-जपान युद्धावर आधारित नाटक सादर केले.

जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर केलेला हल्ला आणि त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमावर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याचा विषय ‘द ब्लॅन्क्ड इक्वेशन’ या नाटकात घेण्यात आला आहे. नाटकाचे लेखन चंद्रकांत चौधरी यांचे असून दिग्दर्शन तेजस अतितकर यांनी केले आहे.

पडदा उघडताच युद्धजन्य परिस्थती दिसते. जपानवर अमेरिकेकडून बॉम्ब हल्ले सुरू आहेत. अणुबॉम्ब टाकला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जपानी लोकांना काही सूचना दिल्या जात आहेत. सायरनचे आवाज, आकाशातून लढाऊ विमानांचे आवाज, प्रखर प्रकाश अशी युद्धभूमीच्या वातावरणात जेतो आणि हकुझो यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे, ती दोघे आणि त्यांची दोन नातवंडे एवढेच बचावले आहेत, जे मारले गेले त्यांच्याबद्दल शोक व्यक्त करत असतानाच दोन लष्करी अधिकारी सरकारचा संदेश घेऊन त्यांच्या घरी येतात व जेतो व हकुझो यांच्या नातवंडांना (चिओ व तनाका) सुरक्षित ठिकाणी म्हणून लष्करी तळावर घेऊन जायला येतात.

अण्वस्त्र निर्मितीचे फायदे की तोटे, ट्रिनिटी चाचणी केल्यानंतर अणुशास्त्रज्ञ रॉबर्ट ओपेनहायमर आपल्या प्रयोगशाळेत विचार करत बसले आहेत. त्यांना अणुबॉम्बची चाचणी केल्याचा पश्चात्ताप होतो, नताली ही त्यांची मैत्रीण अपघातामुळे चालु शकत नाही. तिला व्हीलचेअरची गरज भासते. रॉबर्टचे वडील तिला भेटतात. तिला चित्र भेट देतात. तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात. असे असूनही ती मात्र रॉबर्टच्या विचित्र वागण्यामुळे आपली मैत्री यापुढे आपण संपवू या, असे निर्वाणीचे सांगून निघून जाते.

इकडे जापानचे अणुशास्त्रज्ञ डॉ. निशिना यांच्यावर जपान सरकारचा दबाव वाढतच जात आहे. दोन वर्षे झाली तरी तुम्ही अणुबॉम्ब बनविण्याचे संशोधन अद्याप कसे पूर्ण करू शकत नाही, त्यांची सहकारी मासाको ही अॅटोमिक रिसर्च सेंटरमधील प्रयोगशाळेत त्यांच्या सोबत काम करत असते, मातासोशी बोलताना डॉ. निशिना अणुबॉम्ब बनवणे घातक आहे, त्याचे दूरगामी दुष्परिणाम आहेत, असे तिला सांगतात.

पुढे एका बसस्टॉपवरील प्रसंगामध्ये मासाको व तिचा मित्र तामिकी एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. मासाको एक कविता तामिकीला ऐकवते. येथे थांबणे धोक्याचे आहे. निघू या, असे म्हणून मासाको निघते. तोच तिच्यावर हल्ला होऊन ती मरण पावते.

इकडे रॉबर्टला त्याचे अंतर्मन म्हणजेच अणुऊर्जा संवाद साधते. त्यांच्यातील संवादातून रॉबर्टचा पश्चात्ताप अधिक गडद होत जातो. अणुसंशोधन मानवाच्या हिताकरिता की संहाराकरिता असा प्रश्न त्याला पडतो व तो यासाठी स्वतःला दोषी ठरवतो.

दुसऱ्या अंकात अणुबॉम्बमुळे उद्ध्वस्त झालेले शहर दाखवले आहे. मृत झालेले नागरिकही रंगमंचावर इतस्तः पडलेले दिसतात. सूर्यपूत्र म्हणजेच समुराई परंपरा अणुबॉम्बने उद्ध्वस्त झालेल्या हिरोशिमा शहराचा बदला अमेरिकेवर हल्ला करून घ्यायचाच, या सूडाने जापानी सरकारचे उपसरसेनापती डॉ. निशिना यांची भेट घेतात व लवकरात लवकर संशोधन पूर्ण करा, असे डॉ. निशिना यांना बजावले जाते. डॉ. निशिना त्यांना अणुबॉम्ब बनवणे सोपे नाही व तितकेच हितावह नाही त्याची क्षमता हजार सूर्यांच्या प्रकाशा एवढी आहे, असे सांगून अणुबॉम्ब बनविण्याची प्रक्रिया त्यांना समजावून सांगतात.

चिओ आणि तनाका ही लहान मुले सरकारच्या लष्करी तळावर असतात. ती युद्धबंदी होऊन आपल्या आजी-आजोबांच्या भेटीची आतुरतेने वाट पाहत असतात.

नाटकात मूकनाट्याद्वारे जपानमधील नागरिकांची मनःस्थिती, युद्धजन्य परिस्थिती, बुद्धाची शांतता इत्यादी प्रसंग दाखविले आहेत.

नाटकाची कथा अमेरिकेद्वारे जपानवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याने सुरू होते. त्यानंतर हिरोशिमा येथे झालेला नरसंहार, जपान हा शांततापूर्ण देश आता असला तरी त्यांची सामुराई परंपरा. एका जपानी कुटुंबाची बॉम्ब हल्ल्यामुळे झालेली वाताहत, दोन्ही देशांच्या लष्कराची फक्त जिंकण्याची खुमखुमी, लष्करी अधिकारी फक्त युद्धाची कशी भाषा करतात, ट्रिनिट चाचणीनंतर रॉबर्ट ओपेनहायमर यांना झालेला पश्चात्ताप आणि डॉ. निशिना यांचे अणुनिर्मितीसाठी केले गेलेले प्रयत्न, लष्कराने त्यांच्यावर टाकलेला दबाव यातून त्यांची झालेली घुसमट हे नाटकात सादर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. युद्ध नको, शांतता हवी, असा संदेश देणारे बुद्ध आणि गीतेतील तत्त्वज्ञान अधूनमधून सांगितले जाते.

नाटकाचा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावरील गंभीर विषय आहेय छोट्या छोट्या प्रसंगातून/संवादातून अणुऊर्जेचे संभाव्य फायदे आणि त्याचे विनाशकारी धोके लक्षात घेऊन शांतता आणि मानव कल्याणासाठीच त्याचा वापर व्हावा हे सांगण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.

श्रेयनामावली
‘द ब्लॅन्कड् इक्वेशन’
(दोन अंकी नाटक)
लेखक – चंद्रकांत चौधरी
दिग्दर्शक – तेजस अतितकर
प्रकाशयोजना – गणेश लिमकर
नेपथ्य – समीर पाठक
पार्श्वसंगीत – आशुतोष मेनसे
रंगभूषा – चंद्रकांत सैंदाणे
वेशभूषा – तेजा पाठक
रंगमंच व्यवस्था – विराज अडगटला, विशाल कुटे, रुद्र रसाळ, महादेव गाडे, श्लोक गाडे
सूत्रधार – लक्ष्मीकांत देशमुख

पात्रपरिचय
ओपनहायमर – चैतन्य खानवेलकर
ऊर्जा व नताली – अवंती गोले
डॉ. निशिना व हकुझो – तेजस अतितकर
मिस कावाबे व जेतो – तन्मयी भावे
मासाको – तेजा पाठक
तामिकी – देवदत्त चौसाळकर
चिओ – पद्मनाभ जांभळे
तनाका – ओजस्वी पाठक
लष्करी अधिकारी-१ – सुजित भावे
लष्करी अधिकारी-२ राहुल रसाळ
इतर कलावंत :
१) रेवती घोटणकर, २) देविका साळुंके, ३) ज्ञानेश्वरी झगडे, ४) सृष्टी गंधे, ५) दर्शना दंडवते, ६) स्नेहा विखे, ७) मानवी डेरे, ८) शुभांगी कुटे, ९) प्रतीक्षा रसाळ, १०) श्लोक गाडे, ११) तनया कुटे, १२) शुभ्रा अडगटला, १३) रुद्र रसाळ, १४) राज जोशी, १५) राहुल उजागरे, १६) प्राची जांभळे, १७) राजेंद्र कऱ्हाडकर, १८) त्रिशान तोडमल, १९) गौतम त्र्यंबके, २०) अनंत जोशी

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, 94201 55333)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply