अऽय : सामाजिक समस्या आणि त्यावरील उपाय सांगणारे नाटक

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी अहिल्यानगर येथील नाट्यमल्हार प्रतिष्ठान संस्थेने अऽय हे बलात्काराच्या सामाजिक समस्येवरील नाटक सादर केले.

नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संदीप पोपट दंडवते यांनी केले आहे. एका बलात्कारित स्त्रीला तिच्या नवऱ्यापेक्षा बाप होऊन तिच्या समवेत उभे राहिले, तिला धीर दिला, उमेद दिली तर तिचा त्रास संपू शकतो, ती यातून बाहेर पडू शकते, पतीपत्नीचे नाते फुलू शकते असा विचार लेखक-दिग्दर्शकांनी थोडासा हसत खेळत, विनोदी अंगाने या नाटकात दिला आहे.

पडदा उघडताच गावातील होममिनिस्टर स्पर्धेतील खेळांची, बक्षीस वितरणांची उद्घोषणा सुरू आहे. वैशाली व आनंद हे नवविवाहित जोडपे त्या उ‌द्घोषणेप्रमाणे त्यांच्या चाळीतल्या घरात खेळ खेळत आहेत. या स्पर्धेत उखाणा म्हणावा लागतो आणि वैशाली मुकी असल्याने तिला भाग घेता आला नाही, अशी चर्चा शेजारी करत आहेत. तिचा नवरा आनंद हा बोबडा असून त्याची पत्नी वैशाली पूर्ण मुकी आहे. या दोघांच्या वयामध्ये बरेच अंतर असून आनंद वयाने मोठा आहे, नवविवाहित जोडपे असल्याने शेजाऱ्यांचे यांच्याकडे जरा जास्तच लक्ष असते. त्यात आनंद हा चाळीत सर्वांना उपयोगी पडणारा गृहस्थ असतो.

आनंदची पत्नी वैशाली घरात सारखी भेदरलेली, घाबरलेली अशी वावरत असते. काही घटनांतून नवरा आनंद तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी ती त्याच्यापासून सारखी दूर दूर जात असते. याचा आनंदला त्रास होतो. तो तिला समजावत असतो की, मी तुझ्याशी मुकी म्हणून लग्न केलेले नाही, मला तुझ्या कुबड्या नाही तर खांदा व्हायचे आहे. तुझे पूर्वायुष्यात काय घडले याचा तू विचार करू नको. आपण नव्याने संसार उभा करू. आनंद पती-पत्नी म्हणून नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो. पण वैशाली त्याला दूरच ठेवते, अनेकदा समजावून बदल घडत नसल्याने आनंद वैशालीच्या वडिलांना फोन करून, वैशालीला समजावा अन्यथा तुमच्याकडे घेऊन जा असे कळवतो.

वैशालीचे वडील येतात. तिला समजावतात, मात्र त्यांचीही पत्नी नसल्याने त्यांना काही गोष्टी समजावणे आवाक्याबाहेरचे वाटते. वैशालीच्या आईने या गोष्टी अधिक चांगल्या समजावल्या असत्या, असे त्यांना वाटते. तरीही ते आपल्या परीने समजावतात. संसार म्हणजे जेवणखाण, एकत्र राहणे एवढेच नव्हे तर एकमेकांचा विश्वास संपादन करणे, पत्नीची कर्तव्ये करणे, मुलेबाळे या सर्व गोष्टी असतात. आनंद हे भले गृहस्थ आहेत. तुझ्यावर विवाहापूर्वी अत्याचार झाल्याचे सांगूनही त्या घटनेकडे त्यांनी, “त्यात तिचा दोष काय?” अशी सकारात्मकता दाखवून तुला स्वीकारले आहे. तू त्यांचा स्वीकार कर. त्यांना प्रेम दे. म्हणजे सगळे ठीक होईल. पूर्वायुष्यात घडलेल्या घटना विसरून नवीन आयुष्य सुरू कर, अन्यथा तुला मला परत घरी न्यावे लागेल, असे ते सांगतात. त्या दोघांचे बोलणे आनंद बाहेरून ऐकत असतो. तिला परत न्यायची गोष्ट काढताच घरात येऊन सासऱ्यांना तो समजावतो. माझा संसार मी ठीक करीन, सावरीन, सांभाळीन तुम्ही आता निश्चिंत मनाने परत जा, असे तो सांगतो.

वडिलांसमोर आनंदने दाखविलेल्या विश्वासामुळे वैशालीचे वागणे हळूहळू बदलत जाते. जेवणाचा डबा देता-घेता, आंघोळीला जाताना, वैशालीचा हात भाजणे या वेळचे प्रसंग यातून हे कळते.

आनंदच्या घरात ‘डहाळेकाकू’ व त्यांचा मुलगा ‘छबू’ तसेच ‘सविस्तर’ नावाचा मंदबुद्धी, वेडसर मुलगा व भाजीवाला भय्या यांचे येणे-जाणे आहे. भाजीवाला भय्या भाजीच्या बदल्यात फुकटचा चहा पिण्यासाठी येतो, छबू मात्र वैशालीवर वाईट नजर ठेवून येतो, आनंद घरी नसताना तिच्या अंगचटीला जाण्याचाही प्रयत्न करत करतो. आनंदला याची कल्पना येते, त्यामुळे घराबाहेर जाताना तो सविस्तर वेडसर असला तरी त्याला वैशालीच्या सोबतीला बसवून बाहेर जातो.

सविस्तरला पेपरमधील कोडी सोडविण्याचा नाद असतो. त्यानिमित्ताने वैशालीकडे येऊन तो काही कोड्यातील शब्द विचारतो. त्यावरून तसेच भय्याच्या हिंदी बोलण्यातून तसेच डहाळेकाकूंच्या अचानक येण्याने व असंबद्ध बोलण्याने रंगमंचावर विनोद निर्मिती होते.

एकदा आनंद घरी नसल्याचे पाहून छबू त्याचे मैत्रिणीसोबतचे लग्न मोडल्याचे निमित्त काढून वैशालीकडे येतो. तिच्याशी चहाटळपणा करतो. त्याच वेळी तेथे सविस्तर येतो. वैशालीची त्यावेळी सुटका होते. हे आनंदला कळल्यावर तो वैशालीला म्हणतो, तू न घाबरता अशा प्रसंगाला तोंड दिले पाहिजे. तुझी लढाई तूच लढली पाहिजेस. ‘अऽय’ असे आवाज चढवून म्हणता आले पाहिजे, असे सांगतो. ती मुकी असली, तरी ‘अऽय’ एवढे शब्द उच्चारू शकते. त्याचाच उपयोग करून घ्यायचे तो पत्नीला सांगतो.

छबू आनंदची वरकरणी माफी मागतो, मात्र पुन्हा छबू वैशालीकडे येऊन अत्यंत अश्लील वर्तन करतो. तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र काही क्षणात वैशाली भानावर येते आणि छबूला धैर्याने दूर लोटते. तेथेच ‘अऽय’ असे त्याच्यावर ओरडते.

नाटकातील सविस्तरची भूमिका करणाऱ्या कलाकाराने विनोदी संवाद व भाबडेपणा छान दाखवला आहे. आनंदची भूमिका दिग्दर्शकाने स्वतःच केलेली आहे. त्यामुळे ती प्रभावी झाली आहे. बोबडेपणामुळे बोलतानाची धांदल त्याने चांगली पेश केली आहे. वैशालीने पुरुषांपासून भेदरलेली, घाबरलेली अशी व्यक्तिरेखा प्रभावी वठवली आहे. बाकीच्यांच्याही भूमिका यथायोग्य आहेत.

पूर्ण नाटकाची कथा आनंद-वैशालीच्या चाळीतल्या घरातच घडत असल्याने नेपथ्य त्या घराचेच आहे, चाळीतील लोक बाहेरील व्हरांड्यातून येत जात आहेत, अशी रचना केलेली आहे. घरात गॅस शेगडी, बिछाना, कपाट, बाथरूमबाहेर पाण्याचा ड्रम इत्यादी गोष्टी दाखवून परिणामकता साधली आहे.

श्रेयनामावली
नाटक – ‘अऽय’
संस्था – नाट्यमल्हार प्रतिष्ठान, अहिल्यानगर येथील
लेखन-दिग्दर्शन – संदीप पोपट दंडवते
प्रकाशयोजना – विनोद गरुड
नेपथ्य – प्रमोद जगताप
पार्श्वसंगीत – अंतरा वाडेकर, ऋषी सकट
वेषभूषा – गौरी देशपांडे

पात्रपरिचय
वैशाली – अश्विनी कुलकर्णी
आनंद – संदीप दंडवते,
छबू – प्रद्युम्न गायकवाड
सविस्तर – प्रदीप वाळके
डळाळेकाकू – प्रिया साबळे,
भैय्या – प्रतीक अंदुरे
वडील गणेश लिमकर
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply