खानदानी : पूर्वजांच्या पोकळ गप्पा मारणे व्यर्थ

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साताऱ्याच्या पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्टने खानदानी हे नाटक सादर केले.

पूर्वी खेड्यातून खानदानी घराणी अस्तित्वात होती. घराण्यातील नवीन पिढी घराण्यांचा मोठेपणा सांगत आळशी, कर्जबाजारी, व्यसनी झाल्यामुळे त्यांच्या जमिनी, जागा, इस्टेटी नष्ट झाल्या. फक्त घराण्याचा रुबाब राहिला आणि ते कंगाल होत गेले. पोकळ रुबाब करणाऱ्यांची काय परिस्थिती होते, या वास्तवाची कथा छोट्या छोट्या प्रसंगातून या नाट्यकृतीत दाखवली गेली आहे.

पडदा उघडताच खेड्यामधल्या घरात धनु व शेजारची शिमी बोलत आहेत, धनु हा मोठमोठ्या गप्पा मारणारा व बर्गे-देशमुख खानदानाचा अभिमानी असलेला तरुण आहे. कर्तृत्व फारसे नाही. त्यातच त्याला फेसबुक व सोशल मीडियाचा नाद लागलेला आहे. गावाचा पुढारी आबासाहेब बांधत असलेल्या गावमंदिरासाठी धनूला त्यांनी खजिनदार केले आहे, त्या बदल्यात आबासाहेबांनी त्याला दुधाची डेअरी काढून देण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे तो गावभर वर्गणी मागत तो फिरत आहे.

धनूचा मोठा भाऊ किशोर अविवाहित आहे. त्याला लग्नाला मुलगी मिळत नाही. घरातील शेतीवाडी पाहतो. एकेकाळी गावातील मोठे जमीनदार असलेल्या, बाराखणी वाडा असलेल्या बर्गे-देशमुखांचे सर्व वैभव लयाला गेले आहे. मात्र अजूनही वागण्यात, बोलण्यात देशमुखी थाट कायम आहे.

धनू व किशोर यांची आई अक्का आपल्या मुलांच्या काळजीने ग्रासली आहे. शेजारच्या बापूंची लेक शिमी हिच्यासोबत किशोरचे लग्न लावून द्यावे, अशी तिची इच्छा आहे. पण त्याला धनू, आजी व स्वतः बापूंचा विरोध होतो. त्यामुळे ते शक्य होत नाही.
शिमीची आई तिला व बापूंना सोडून निघून गेलेली असते. त्यामुळे तिचेही लग्न जुळत नाही. ती आईला दोष देत असते. यावर अक्का म्हणते, दोष तिचा नाही. अक्काचा नवरा व बापू यांना एका बाईचा नाद लागलेला असतो. त्यामुळे बापू शिमीच्या आईला मारझोड करीत असे. जीव घेण्याचा प्रयत्न बापूने केला. त्यामुळे ती निघून गेली. मुलीच्या प्रेमासाठी ती एक-दोनदा आली. पण बापूने तिला हाकलून दिले. त्यामुळे बापूबद्दल शिमीच्या मनात संताप असतो.

किशोरसाठी अनिता नावाची मुलगी सांगून येते. मात्र ती अपंग आहे, म्हणून किशोर तिला नाकारतो. मात्र सगळ्यांच्या समजावण्यानंतर किशोरचे लग्न अनिताशी होते. पहिल्याच दिवशी किशोर अनिताला आपल्या खानदानाची महती सांगतो.

धनूला गैरवर्तनाबद्दल एका प्रकरणात मार पडतो. हे कारस्थान पुढाऱ्यानेच घडवून आणले आहे, असे बापू धनुला सांगतो, मंदिराच्या देणगीच्या रकमेवर पुढाऱ्याचा डोळा आहे. त्यामुळेच त्याने हे कारस्थान केल्याचे धनूला कळल्यावर धनूचे डोळे उघडतात.

धनूला खानदान, जात यांचा फोलपणा लक्षात येतो. महती सांगून काही साध्य होणार नाही. त्यासाठी काम केले पाहिजे. शिक्षणाची जोड हवी. गावात राहून हे शक्य नसल्याने तो शहरात जायचे ठरवतो. कष्ट करून, व्यवसाय शिक्षण घेऊन पुन्हा गावाकडे येईन व डेअरी व्यवसाय करीन, असे ठरवून तो बाहेर पडतो.

शिमीला तिच्या आईला भेटायची इच्छा असते. ती तिची चौकशी करत असताना ती शहरात राहत असल्याची माहिती तिला मिळते. त्यामुळे तीसुद्धा शहरात तिला शोधायला निघते. धनू व शिमी दोघे आपापले ठरवलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहराकडे प्रस्थान करतात. सगळे जण त्यांना आशीर्वाद देतात.

नेपथ्यातून गावाकडील गवताने शाकारलेले घर, घरासमोरील तुळशीवृंदावन, घराबाहेरची गवताची साठवण, पूर्वजांची समाधी, धान्याची रंगमंचावर पाखडणी इत्यादी दाखवून ग्रामीण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रकाशयोजनेद्वारे रंगमंचावर दोन बाजूंना् अक्का व धनू यांच्यातील तसेच बापू व शिमी यांच्या संवादांचे प्रसंग दाखविण्यात आले आहेत.

श्रेयनामावली
नाटक : खानदानी
संस्था : पुण्यशील सुमित्राराजे सांस्कृतिक ट्रस्ट, सातारा
लेखक : जगदीश पवार
दिग्दर्शन : शरद लिमये
प्रकाशयोजना – चैतन्य पाटेकर
सहायक – केदार यादव
संगीत – राजेश मोरे
रंगभूषा – गणेश सपकाळ
वेशभूषा – मानसी मोतलिंग
नेपथ्य सहायक – अभिषेक मुंद्रावळे

पात्रपरिचय
धनू – अक्षय काळभोर
शिमी – अनुश्री घाणेकर
आजी (म्हातारी) – अमृता क्षीरसागर
अक्का – पूनम मुसळे
किशोर – मुकुंद लोंढे
बापू – नशिकेत तांबेकर
अनिता – प्राची मोतलिंग

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply