कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा आज (१४ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरीत नागरी सत्कार आहे. त्या निमित्ताने त्यांच्यावरील एका विशेषांकाचे प्रकाशनही होणार आहे. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील विवेक भावे यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्याबद्दलची एक जुनी, हृद्य आठवण जागवली आहे. ती सोबत देत आहोत….
…………
‘साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये तुम्हाला लक्षात राहील असा एखादा प्रसंग सांगणार का,’ असे विचारताच मधु मंगेश कर्णिक क्षणभर थांबले व मग विचार करीत उद्गारले – खरे तर एक असा प्रसंग मी अनुभवला, की त्यामुळे निवडणुकीचा निर्णय लागण्याआधीच मला ‘अध्यक्षपद’ मिळाल्यासारखे कृतार्थ वाटले!
‘असा कृतार्थतेचा तो क्षण होता तरी कोणता?’ आम्ही विचारले.
‘ती एक स्वतःशीच ठेवावी अशी उत्कट, व्यक्तिगत, सुंदर आठवण आहे. तिचा जाहीर उच्चार करायचा म्हणजे…’ कर्णिक अडखळत म्हणाले.
‘तिला सार्वजनिक महत्त्व असेल तर ती इतरांना सांगायला हरकत नाही,’ असे सुचवताच कर्णिक सांगू लागले –
‘अनेक वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या एका वृत्तपत्रात मी वामनराव दात्ये या वाचकाचे पत्र वाचले. त्यांच्या कासारवेली या खेड्यातल्या एका विधवा कुणबी बाईची लहान मुलगी संगीता औषध-पाण्यावाचून आबाळ होऊन मृत्यू पावली. तिच्या दिवंगत पित्याचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे तिच्या आईला वेळेवर मिळाले असते तर, ती मुलगी वाचू शकली असती! अनेक प्रयत्न, प्रदीर्घ पत्रव्यवहार करूनही त्या गरीब बाईची दाद लाल फितीच्या कारभारात कोणी घेत नव्हते! कुणी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार त्या विधवा बाईचे हक्काचे पैसे मिळवून द्यायला मदत कराल का, असा जाहीर प्रश्न वामनराव दात्ये यांनी केला होता. ते पत्र वाचून माझे मन द्रवले. कोकणात कासारवेली काय किंवा माझे करूळ गाव काय, सर्वत्रच असे अनुभव गोरगरिबांना येतात, हे मी पाहिले होते. म्हणून कर्तव्यबुद्धीने मी त्या प्रकरणात लक्ष घातले. त्या बाईसाठी प्रॉव्हिडंट फंड कचेरीत खेटे घातले व महिनाभरात त्या विधवेची रक्कम तिला मिळवून दिली. वामनराव दात्ये ही गोष्ट विसरले नव्हते. मी मात्र ते सारे विसरून गेलो होतो; पण परवा अध्यक्षीय निवडणुकीच्या निमित्ताने मी रत्नागिरीला गेलो तेव्हा तेथील एक मतदार विवेक भावे यांना भेटलो. ते म्हणाले, ‘तुम्हाला भेटण्यासाठी माझे श्वशुर, कासारवेलीचे वामनराव दात्ये हे फार उत्सक आहेत. तुम्ही कधी काळी एका वृत्तपत्रातल्या त्यांच्या पत्रामुळे एका गरीब विधवेला कशी मदत केलीत, त्याची आठवण ते सांगतात ! म्हणून त्यांना तुम्हाला बघण्याची इच्छा आहे. त्यांना तुम्हाला भेटायला कधी आणू? ते आज पंच्याहत्तरीत पोचले आहेत.’ मी म्हणालो, ‘तसे असेल तर मीच वेळ काढून वामनरावांना भेटायला कासारवेलीला जाईन. दुसर्याच दिवशी मी विवेक भावे व सौ. सुखिता विवेक भावे असे कासारवेलीला गेलो. वामनराव दात्ये मला पाहून सद्गदित झाले. त्या कमरेत वाकलेल्या जर्जर विधवा बाईलाही त्यांनी बोलावले होते. तिच्या नवर्याची प्रॉव्हिडंट फंडाची सर्व रक्कम वामनरावांनी बँकेत गुंतवली होती. त्याचे व्याज त्या बाईला नियमित मिळत होते. त्या बाईच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञता मावत नव्हती. मग वामनराव दात्ये यांनी मला आपल्या देवघरात नेले. मोठा देव्हारा, नुकतीच पूजा झाली होती. ती पुष्पांकित कुलदेवता समईच्या स्निग्ध उजेडात अधिकच पवित्र भासत होती. वामनरावांनी मला देवासमोर पाटावर बसवले व घनगंभीर सुरात ‘ॐ नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या’ म्हणायला सुरुवात केली. श्री ज्ञानेश्वरीची एकामागून एक ओवी ते म्हणत होते आणि मी भारावून ऐकत होतो. मग त्यांनी गाभार्यातील अंगारा माझ्या कपाळावर टेकवला. माझ्या हाती प्रसादाचे श्रीफल दिले. शाल पांघरली आणि ते भक्तिभावाने उद्गारले, ‘तुम्ही कवी, लेखक म्हणून किती मोठे आहात मला ठाऊक नाही; पण गोरगरिबांच्या दुःखात त्यांना मदत करणारा एक माणूस म्हणून तुमच्यासाठी मी श्री ज्ञानदेवाकडे प्रार्थना केली आहे. तुम्ही या निवडणुकीत यशस्वी होणार आहात. माझ्या कुलदेवतेकडे व ज्ञानदेवाकडे मी केलेली प्रार्थना वाया जाणार नाही.’
माझे डोळे भरून आले. कंठ दाटून आला. विवेक, सुखिता यांनाही अश्रू आवरेनात. मला वाटले या प्रार्थनेपेक्षा, माणुसकीच्या या कृतज्ञ साक्षात्कारापेक्षा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मोठे आहे का? आता मी जरी हरलो, तरी जिंकलेलो आहे.‘
ही आठवण सांगतानाही कर्णिकांचे डोळ पाणावले होते!

