महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जालन्याच्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेने टेक अ चान्स हे नाटक सादर केले. योगायोगाने व्हॅलेंटाइन डेला शाश्वत प्रेमाचे महत्त्व सांगणारे हे नाटक सादर झाले.
नाटकात नातेसंबंधांमध्ये समाजामध्ये होणाऱ्या बदलांवर विनोदी अंगाने प्रकाश टाकण्यात आला आहे. नाटक अंतर्मुख करायलाही लावते. पती-पत्नीच्या नात्याला पर्याय म्हणून आता लिव्ह इन रिलेशनकडे बघितले जाते. पाश्चात्य देशांमधील ही संकल्पना आपल्याकडेसुद्धा आता चांगलेच मूळ धरू लागली आहे. विविध नात्यांमध्ये वाढत असलेले सामाजिक अंतर, लैंगिक एकनिष्ठता आणि नव्या नात्यामुळे न टिकणारा विश्वास या महानगरांमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या समस्या आहेत. त्यामध्ये दोन वर्गांमधील फरक दाखवण्यात आला आहे. नवीन पिढी प्रेम, लग्न याकडे गांभार्याने पाहत नाही. जुनी पिढी मात्र त्या नात्यांना जपत असते. हा फरक दाखवायचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाते कोणतेही असो, या नात्यात विश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याच्या माध्यमातून विनोदी अंगाने हा विषय नाटकात मांडण्यात आला आहे. स्त्रीने फक्त पुरुषाला कधीही चुकीचे ठरवू नये. कुठलेही निर्णय कुठल्याही परिस्थितीत निर्णय एकट्याने घेऊ नयेत, असाही एक संदेश नाटकातून दिला आहे.
पडदा उघडताच मानसी ऑफिसचे काम लॅपटॉपवर करत आहे आणि रोहित झोपलाय, मानसी हाका मारून त्याला उठवते. मानसी व रोहित चांगले मित्र असून आयटी कंपनीत कामाला आहेत. सध्या ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. मानसीला आज प्रोजेक्ट आज पूर्ण करून सादर करावयाचा आहे, तिच्यासाठी हा ड्रीम प्रोजेक्ट असून तो मान्य झाल्यास तिला नोकरीत बढती, परदेशवारी, पगारवाढ इत्यादी अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
मानसीचा हा प्रोजेक्ट मंजूर होऊ नये, असे रोहितला वाटत असते. आहे ते आयुष्य सुखी आहे, शांततेचे आहे, गरजेपुरते सगळे आहे. प्रोजेक्ट मंजूर झाल्यास मानसीला दोन वर्षे रोहितपासून दूर जावे लागणार आहे, यासाठी तो तयार नाही.
मानसी ऑफिसमधून घरी येतेय रोहितला उत्सुकता असते प्रोजेक्टचे काय झाले याची. मानसीचा प्रोजेक्ट मंजूर झालेला असतो. तिला त्यासाठी दोन वर्षे अमेरिकेत जावे लागणार असते. तसे सांगून ती तयारीला लागते.
मानसी अमेरिकेमध्ये जाते. रोहितला तिच्याशिवाय राहणे अवघड होत जाते. रोज व्हिडीओ कॉलद्वारे त्यांचे बोलणे होते. पण तेही हळूहळू कमी होऊ लागते. तो एकटा पडतो. त्याच वेळी त्याच्या ऑफिसकडून त्याला नवीन प्रोजेक्ट दिला जातो. सहकारी म्हणून अनूची नेमणूक होते. अनू फार आधुनिक विचारांची मुलगी असते. तिला रोहित सभ्य व विश्वासू मित्र वाटत असतो. कामानिमित्ताने अनूचे वारंवार रोहितला भेटणे, त्याच्या घरीही येणे होते. त्या दोघांत मैत्री निर्माण होते. एकदा प्रोजेक्टवर्क करताना उशीर होतो. अनू कॅब बोलावते मात्र रोहित तिला “आज मला मानसीची आठवण येते आहे, एकटेपणा वाटत आहे, तू आज रात्री येथेच थांब”, असे सुचवितो. ती थांबते. गप्पा होतात. ड्रिंक्स घेतली जाता. अनू सकाळी निघून जाते.
मानसी एक वर्षाने परत येते. रोहित तिच्या येण्याचा छोटा समारंभ आयोजित करतो. आनंदात ड्रिंक्स अधिक घेतल्याने रोहितला अस्वस्थ वाटते व तो झोपतो. तितक्यात रोहितच्या फोनवर अनूचा फोन येतो. मानसी फोन उचलते, फोनवरून अनू “मी आता आई होणार आहे”, एवढेच सांगते आणि फोन बंद होतो, मानसी पुन्हा संपर्क करायचा प्रयत्न करते, पण फोन लागत नाही.
ही बातमी कळल्यापासून मानसी तणावाखाली असते. आपण एक वर्ष नसल्याच्या काळात, येथे काय काय घडले, याची माहिती ती रेखा व रोहितकडून काढून घेण्याचा प्रयत्न करते. घरकाम करणाऱ्या रेखाकडून अनू रोहितकडे येत असल्याची माहिती तिला मिळते. रोहितकडून या कालावधीत अनू त्याची चांगली मैत्रीण बनल्याचे कळते. त्यावरून मानसीच्या मनात संशय निर्माण होतो.
एखादी स्त्री ती आई होणार असल्याची बातमी बाळाच्या वडिलांनाच सांगणार. अनूचा तो फोन रोहितला आला म्हणजे रोहित-अनू यांच्यात काही संबंध निर्माण झाले आहेत काय? रोहितला ती याबद्दल विचारते. रोहित पुरेसे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. यावरून त्यांच्यात भांडण होते. मानसीचा संशय बळावतो व ती पुन्हा परदेशात जाण्याचे ठरवते. रोहित व मानसीमधील दुरावा न पाहवून रेखा मानसीला समजावते. मात्र मानसी तिचे काही ऐकून घेत नाही.
मानसी परदेशी निघणार असते. रोहित म्हणतो, “तू जाईपर्यंत आपण आपल्या आयुष्यातील फक्त चांगल्या गोष्टींवर बोलू व निरोप घेऊ.” मागील आठवणींच्या गप्पांमध्ये दोघे हरवून जातात, मध्येच रोहित मानसीला म्हणतो, “माझ्या झालेल्या चुका माफ करून आपण पुन्हा नव्याने एकत्र राहण्याचा चान्स घेऊया काय ?’ यावर मानसी ठाम नकार देते.
अचानक अनू येते व तिच्या लग्नाची पत्रिका रोहितला देते. यावर रोहित तिला मानसी व त्याच्यात झालेल्या गैरसमजाबद्दल सांगतो. ती त्याबद्दल माफी मागते व निघून जाते. मानसीला अनू आल्याचे कळते. रोहित तिला अनू लग्नपत्रिका द्यायला आल्याचे सांगतो. मानसीचा गैरसमज दूर करतो आणि म्हणतो, “हा फ्लॅट तुझा आहे, मला हा फ्लॅट नको आहे. तू इथेच राहा, मीच निघून जातो.”” मानसीला आपण रोहितवर दाखविलेल्या अविश्वासाबद्दल पश्चात्ताप होतो.
नेपथ्यात फ्लॅटची रंगसंगती, नीटनेटकेपणा यांची सुयोग्य मांडणी केली आहे. त्यात बेडरूम, हॉल, कीचन, गॅलरी यांची रचना असून ती प्रकाशयोजनेच्या मदतीने स्वतंत्र दाखवण्या प्रयत्न आहे. पार्श्वसंगीतही गरजेनुसार ठीक आहे. सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिका प्रसंगानुरूप यथायोग्य साकारल्या आहेत.
श्रेयनामावली
संस्था : ज्ञानज्योत शिक्षण संस्था, जालना
नाटक : टेक अ चान्स
लेखक : मनोज ठाकूर
दिग्दर्शक : रत्नदीप वाव्हळे
संगीत संयोजनः राहुल बोरडे
प्रकाशयोजना : वाल्मीक जाधव, प्रसाद वाघमारे
रंगभूषा व वेशभूषा : श्रुनी वानखेडे, उल्का कुलकर्णी
नेपथ्य : अमोल जाधव, राहूल बोरडे
रंगमंच साहाय्य : शुभम रॉय, प्रकाश ढेपले, किशोर थोरात, बाळू बटुळे, अर्जुन टाकरस, प्रशांत अवसरमोल, नितीन रसाळ, रणजित बायस
पात्रपरिचय
अंजली कुलकर्णी – मानसी
जगदीश जाधव – रोहित
गायत्री लांगडे – रेखा
अनू – श्रुती वानखेडे
पंढरी – आशीष झिने
मुलगी (छोटी) – सुकेशनी मकासरे
इव्हेंटवाला – सागर सोनवणे, अमोल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, अनिल मोरे
मानसी मैत्रीण – हर्षदा मंगलगी
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)




कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

