डॉक्टरांच्या संपकाळात आयुषच्या दीड लाख डॉक्टरांनी राज्यभर पुरवली वैद्यकीय सेवा

ठाणे : गेल्या ११ डिसेंबर रोजी इंडियन मेडिकल असोसिएशनने संप पुकारला होता. या दिवशी आयुषचे राज्यातील दीड लाखाहून अधिक डॉक्टरांनी आपली सेवा सुरू ठेवली होती, अशी माहिती आयुष कृती समितीतर्फे निमा या संघटनेचे ठाणे शाखेचे सेक्रेटरी डॉ. प्रवीण जाधव यांनी दिली.

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या राजपत्राला विरोध करण्याकरिता ११ डिसेंबर रोजी संपाचे आवाहन केले होते. या राजपत्राचे स्वागत करण्याकरिता एनआयएमए केंद्रीय शाखेने आखलेल्या कार्यक्रमानुसार देशभरातील दीड लाख आयुष डॉक्टरांनी गुलाबी फीत लावून नियमित वैद्यकीय सेवा दिली. तसेच राजपत्र प्रकाशित केल्याबद्दल केंद्र शासनाचे व भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेचे अभिनंदन करणारे व पाठिंबा देणारे पत्र सर्व जिल्हाधिकारी व तहसीलदारांना आयुष कृती समितीतर्फे देण्यात आले.

भारतीय चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी एनआयएमए संघटनेने आवाहन केल्यानुसार आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी व युनानी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व प्रमुख संघटनांनी एकत्र येऊन आयुष कृती समिती या नावाने शिखर संघटनेची स्थापना केली आहे. आयुष कृती समितीच्या झेंड्याखाली सर्व संघटना आगामी काळात एकदिलाने काम करतील, असादेखील निर्णय करण्यात आला आहे.

या राजपत्रामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विहित अभ्यासक्रमानुसार शिक्षणादरम्यान मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारावर शस्त्रक्रिया करणाऱ्या शल्य व शालाक्यतंत्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या सेवेमधील कायदेशीर अडसर दूर झाला असून शस्त्रक्रियेसंबंधीची व्याप्ती अधिक सुस्पष्ट झाली आहे. या राजपत्रामुळे ग्रामीण व शहरांमधील आर्थिक दृष्टीने कमकुवत भागात कायद्याच्या चौकटीत तीन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या पदव्युत्तर डॉक्टरांचा कायदेशीर अधिकार अधिक अधोरेखित झाला आहे. आयुष कृती समितीने या राजपत्राचे स्वागत केले असून त्याला पाठिंबा दिला आहे. या राजपत्रामुळे आयुर्वेदाच्या विकासाला अधिक चालना मिळणार असून आयुर्वेदाला राजाश्रय मिळण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होणार आहे.

शस्त्रक्रियेचे पितामह म्हणून सुश्रुताचार्यांना सर्व चिकित्सा पद्धतींमध्ये ओळखले जाते. सुश्रुताचार्यांद्वारे वर्णित विविध शस्त्रक्रिया तसेच त्याचे पूर्वकर्म व पश्चातकर्म गेल्या ४० पेक्षा अधिक वर्षांपासून शल्य व शालाक्यतंत्रातील पदव्युत्तर शिक्षणामध्ये अंतर्भूत आहेत. इतकेच नव्हे तर काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आवश्यक ते बदल स्वीकारून त्या शस्त्रक्रिया देशातील आणि महाराष्ट्रातील विविध आयुर्वेदीय शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर यशस्वी रीतीने केल्या जातात. महाराष्ट्रामध्ये कायद्याने आयुर्वेदाच्या पदवीधरांना मिश्र चिकित्सा पद्धतीचा अधिकार प्राप्त झालेला असून त्यासंदर्भातदेखील गेल्या काळात इंडियन मेडिकल असोसिएशनने या कायद्यास स्थगिती देण्यासंबंधी उच्च न्यायालयात मागणी केली होती परंतु उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्याकरिता स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेदेखील याबाबतीत इंडियन मेडिकल असोसिएशनची याचिका फेटाळली आहे. ही वस्तुस्थिती असताना काहीतरी नव्याने परवानगी देण्यात आली आहे व या डॉक्टरांना कसे प्रशिक्षण मिळेल त्यांची गुणवत्ता काय असेल अशा पद्धतीचे प्रश्नचिन्ह निर्माण करुन सदर राजपत्राच्या बाबतीत ‘मिक्सोपॅथी’, ‘खिचडीफिकेशन” अशा शब्दांचा वापर करून नागरिकांना संभ्रमित करून आणि शस्त्रक्रियेच्या अधिकाराच्या बाबतीत व प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करून इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे शस्त्रक्रियेच्या बाबतीत एकाधिकारशाही निर्माण करण्याचा प्रयत्न दुर्दैवी म्हणावा लागेल. कोणत्याही शास्त्राच्या एकाधिकाराकरिता संघर्ष करण्याऐवजी भारतीय चिकित्सा पद्धतीसहित सर्व चिकित्सा पद्धतींचा सन्मान करावा आणि सामान्य माणसाला उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्याकरिता एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. तीच काळाची गरज आहे. यादृष्टीने सकारात्मक विचार करावा, असे आवाहन आयुष कृती समितीने इंडियन मेडिकल असोसिएशनला केले आहे.
(संपर्क – ९२२२०८८४९८)

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply